ETV Bharat / state

Third Wave: जुलै अखेरीस येणार तिसरी लाट, दुसऱ्या लाटेच्या दुप्पट राहतील रुग्ण -टास्क फोर्स

author img

By

Published : Jun 16, 2021, 10:15 PM IST

Updated : Jun 18, 2021, 1:01 PM IST

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून राज्य शासनाने आधीच पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून आवश्यक त्या औषधी, वैद्यकीय उपकरणे यांची उपलब्धता राहिल तसेच ग्रामीण भागातही याचा पुरेसा साठा राहिल हे पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या.

Maharashtra govt gears up for third COVID-19 wave; Uddhav Thackeray meets with doctors, senior officials of task force
तिसऱ्या लाटेसाठी सज्ज रहा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुंबई - कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून राज्य शासनाने आधीच पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून आवश्यक त्या औषधी, वैद्यकीय उपकरणे यांची उपलब्धता राहिल तसेच ग्रामीण भागातही याचा पुरेसा साठा राहिल हे पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या. टास्क फोर्समधील डॉक्टर्स, वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेतच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी राज्यभर सिरो सर्व्हेक्षण करणे, मोठ्या प्रमाणावर लसीकरण पूर्ण करणे यावर भर देताना निर्बंधांचे पालन काटेकोरपणे होणे गरजेचे आहे, असे सांगितले. गर्दी वाढली आणि आरोग्याचे नियम पाळले गेले नाहीत तर दुसऱ्या लाटेतून सावरता सावरता आपण महिन्या दोन महिन्यात तिसऱ्या लाटेलाही सामोरे जाऊ, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, प्रधान सचिव वित्त राजगोपाल देवरा, प्रधान सचिव आरोग्य डॉ. प्रदिप व्यास, डॉ. रामास्वामी, डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. तात्याराव लहाने यांची यावेळी उपस्थिती होती.

औषधे, आरोग्य सुविधा, बेड्स, ऑक्सिजन उपलब्धता याकडे लक्ष केंद्रित करा
पहिल्या लाटेच्या वेळेस आपल्याकडे सुविधांची कमी होती, त्यात आपण वाढ करीत गेलो, दुसऱ्या लाटेने देखील आपल्याला बरेच काही शिकविले. ही लाट ओसरत असून त्यातील अनुभवातून आपल्याला आवश्यक ती औषधी, आरोग्य सुविधा, बेड्स, ऑक्सिजन उपलब्धता या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करावे लागेल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, ऑगस्ट- सप्टेंबरपासून देशाला ४२ कोटी लसी मिळताहेत अशी माहिती मिळते आहे. त्यामुळे लसीकरण वेगाने सुरु होऊन महाराष्ट्रालाही त्याचा फायदा होईल. लसीकरण हा या लढाईत महत्वाचा भाग असला तरी आरोग्य विषयक नियमांचे पालन करणे, मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे हे अत्यावश्यक आहे. बैठकीत पुढच्या काळात लागणारी संभाव्य औषधे, त्यांची खरेदी, त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद, आरटीपीसीआर कीट, मास्क, पीपीई किट्स अशा बाबींवर विस्तृत चर्चा झाली, मुख्यमंत्र्यांनी सर्व सबंधित यंत्रणांनी समन्वयाने हे उपलब्ध राहिल, असेही सांगितले.

तिसऱ्या लाटेत रुग्ण संख्या वाढू शकते
पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अतिशय कमी कालवधीत रुग्ण संख्या दुप्पट झाली. नव्या डेल्टा प्लस व्हेरीयंटचाही धोका असल्याने तिसरी लाट आल्यास राज्यात रुग्ण संख्या परत दुपट्टीने वाढू शकते. पहिल्या लाटेत १९ लाख रुग्ण होते. दुसऱ्या लाटेत ही संख्या ४० लाखापेक्षा जास्त झाली होती. सक्रिय रुग्णांची संख्याही ८ लाख होऊ शकते. तसेच १० टक्यांच्या आसपास संसर्गग्रस्त मुलांची संख्या असू शकते, असे आरोग्य विभागाने सादरीकरणात सांगितले.

सर्वाधिक मृत्यू एप्रिलमध्ये
१७ सप्टेंबर २०२० रोजी पहिल्या लाटेत सर्वाधिक म्हणजे ३ लाख १ हजार ७५२ रुग्ण होते. तर २२ एप्रिल २०२१ मध्ये दुसऱ्या लाटेत सर्वोच्च रुग्ण संख्या ६ लाख ९९ हजार ८५८ होती. १३ सप्टेंबर २०२० रोजी सर्वांधिक ५१७ मृत्यू झाले होते. दुसऱ्या लाटेत २६ एप्रिल २०२१ रोजी सर्वाधिक १११० मृत्यू झाले. साप्ताहिक पॉझिटीव्हिटी ९ सप्टेंबर २०२० रोजी सर्वाधिक म्हणजे २३.५३ टक्के होती. तर दुसऱ्या लाटेत ८ एप्रिल २०२१ रोजी २४.९६ टक्के पॉझिटीव्हिटी दर होता. युके व इतर काही देशांत परत विषाणूचा संसर्ग वाढून निर्बंध कडक करण्याची वेळ येते आहे याकडेही टास्क फोर्सने लक्ष वेधले.

हेही वाचा - ...अन् त्याने किन्नरसोबत केली सुखी संसाराची सुरुवात, कुटुंबीयांनी दिले आशीर्वाद

हेही वाचा - शिवसेना नेत्या श्रद्धा जाधव यांच्यासह सहा जणांवर माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Last Updated : Jun 18, 2021, 1:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.