ETV Bharat / state

'लेटर बॉम्ब' प्रकरणावर महाराष्ट्र काँग्रेस दिल्लीच्या हाय कमांडला पाठवणार अहवाल

author img

By

Published : Mar 22, 2021, 12:18 PM IST

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून मुंबई ते दिल्ली पर्यंत बैठकीचे सत्र सुरू झालेले आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना सत्तेत असून सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांवर मोठ्याप्रमाणात आरोप होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस दिल्लीच्या हाय कमांडला अहवाल पाठवणार आहे.

काँग्रेस दिल्लीच्या हाय कमांडला पाठवणार अहवाल
काँग्रेस दिल्लीच्या हाय कमांडला पाठवणार अहवाल

मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रानंतर महाविकास आघाडी सरकारवर अनेक प्रकारचे आरोप केले जात आहेत. थेट गृहमंत्री यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून मागणी केली जात आहे. त्यामुळेच महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेला कुठेतरी धक्का पोहोचला आहे. त्यामुळे या संदर्भाचा अहवाल दिल्लीच्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाकडून मागवला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून मुंबई ते दिल्ली पर्यंत बैठकीचे सत्र सुरू झालेले आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना सत्तेत असून सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांवर मोठ्याप्रमाणात आरोप होताना दिसत आहेत. विरोधी पक्ष या सर्व प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मागत आहेत.

या सर्व प्रकरणावर काँग्रेसचा बारीक लक्ष असून काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला आपला अहवाल द्यायला सांगितला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील हे लवकरच महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी या प्रकरणावर चर्चा करणार आहेत. त्यानंतर एक अहवाल तयार करणार करून तो अहवाल दिल्लीला पाठवण्यात येणार आहे.

काँग्रेसकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी-

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या नेत्यांवर मोठ्या प्रमाणात आरोप होत असल्याने सरकारची प्रतिमा कुठे ना कुठे मलिन झालेली आहे. त्यामुळे यासंदर्भात अहवाल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने महाराष्ट्रातून मागवला आहे. मात्र त्यादरम्यानच काँग्रेसचे दिल्लीतले नेते राशिद अल्वी यांनीही परमविर सिंह यांनी लिहिलेल्या पत्रानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे या अहवालानंतर काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार याकडे देखील सर्वांचे लक्ष असणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.