ETV Bharat / state

महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून फूट? तिघांचाही मुख्यमंत्री पदावर दावा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2023, 5:45 PM IST

Split in Mahayuti over post of CM
Split in Mahayuti over post of CM

Split in Mahayuti over post of CM : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील असं वक्तव्य कलं होतं. त्यामुळं महायुतीत मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून धुसफूस सुरू झाल्याची चर्चा सुरू आहे.

मुंबई Split in Mahayuti over post of CM : भारतीय जनता पक्ष (भाजपा)चे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भंडारा येथील सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे भावी मुख्यमंत्री असतील असं वक्तव्य केलं होतं. तसंच त्यांचा शपथविधी मुंबईती वानखेडे स्टेडियमवर करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळं निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार? याबाबत महायुतीत संभ्रम निर्माण झाला आहे.

महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाची रस्सीखेच : देवेंद्र फडणवीस यांना नाईलाजानं सर्वाधिक आमदार असूनही उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावं लागलं होतं. त्यामुळं आगामी निवडणुकीत भाजपाचं लक्ष मुख्यमंत्रीपदावर असणार आहे. त्यासाठी पक्षाच्या वतीनं कसून तयारी सुरू आहे. तर एकनाथ शिंदे देखील मुख्यमंत्री पदासाठी महत्त्वाकांक्षी आहेत. आगामी विधानसभा निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढल्यास मुख्यमंत्रीपदाचा चेहरा शिंदेच राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडं अजित पवार यांची मुख्यमंत्रिपदाची इच्छा लपून राहिलेली नाही. मात्र महायुतीमध्ये जागावाटपापूर्वीच मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांना राजकीय रंग आला आहे.

फडणवीसचं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा : या संदर्भात बोलताना भाजपा प्रवक्ते विनोद वाघ म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकून मुख्यमंत्रीपदी आपला नेता असावा, अशी पक्ष, कार्यकर्त्यांची इच्छा असते. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत. आगामी निवडणुकीत केंद्रीय नेतृत्व जे म्हणेल ते आम्ही मान्य करू. मात्र जास्तीत जास्त जागा जिंकून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री कसे होतील, याची तयारी करू, असं वाघ म्हणाले. त्यामुळं आगामी निवडणुकांसाठी भाजपाच्या वतीनं देवेंद्र फडणवीसचं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचे दावेदार : या संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते प्राध्यापक अरुण सावंत यांना विचारलं असता ते म्हणाले की, या आगोदर राज्यात फक्त दोनच वाघ होऊन गेले आहेत. एक म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे धर्मवीर आनंद दिघे. त्यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात एकमेव वाघ आहेत. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली आहे. तसंच आगामी निवडणुकीबाबत बावनकुळे काय बोलतात याचा विचार करण्याची गरज नाहीये. याबाबत भाजपाचं केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवतील. त्यामुळं आगामी निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील यात शंका नाही, असं सावंत म्हणाले.

राष्ट्रवादीकडून अजित पवारांना पसंती : यासंदर्भात प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्ही अजित पवार यांच्याकडं मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून पाहत आहोत. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जास्तीत जास्त आमदार निवडून आणून अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदी बसविण्याची तयारी सुरू आहे. आम्ही सर्व कार्यकर्त्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून अजित पवारांकडं पाहतोय.

हेही वाचा -

  1. “अन्यथा हिंदुत्वाचा प्रचार करू”, उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा
  2. 'नसेल झेपत तर राजीनामे द्या...' पदाधिकाऱ्यांकडून पदवीधर मतदार नोंदणी न झाल्याने राज ठाकरे यांचा संताप
  3. 8 डिसेंबरला मुंबईत सर्व धर्मीय शांती सभेचे आयोजन - प्रकाश आंबेडकर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.