ETV Bharat / state

Invite Journalists For Tea : पत्रकारांना चहापाण्याला बोलवा; बावनकुळेंचा कार्यकर्त्यांना सल्ला, राणे म्हणतात त्यात काय चुकलं

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2023, 2:38 PM IST

चंद्रशेखर बावनकुळे
चंद्रशेखर बावनकुळे

Invite Journalists For Tea : पत्रकारांना चहापाण्याला बोलवा असा, भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना सल्ला दिल्याची कथित क्लिप व्हायरल होत आहे. त्यावर भाजपा आमदार नितेश राणे यांनी त्यात काय चुकलं असं सांगून त्यांचा सन्मान केला पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई Invite Journalists For Tea - लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या मीडियाला राजकीय नेते किती गंभीरपणे घेतात याचं ताजं उदाहरण म्हणजे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगरमध्ये केलेलं वक्तव्य आहे. राज्यात लोकसभेसाठी मिशन ४५ अंतर्गत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यभर दौरा करत आहेत. याच दरम्यान काल नगरमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी पत्रकारांना महिन्यातून एकदा चहापाण्याला बोलवा व चहा पाण्याला बोलवायचा अर्थ तुम्हाला समजलाच असेल, असे ते म्हणाल्याची कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. यावरून आता विरोधकांनी सुद्धा त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. तर भाजपा आमदार नितेश राणे यांनी बावनकुळे यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे.


चहापाण्याला बोलवा याचा अर्थ समजला असेल - भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची एक व्हिडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली आहे. भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांच्या मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना बावनकुळे यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुका होईपर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी येता कामा नये. याकरता पत्रकारांना प्रत्येक महिन्याला चहापाण्याला बोलवा असं त्यांनी सांगितलं आहे. बावनकुळे इतकचं बोलून थांबले नाहीत, तर चहापाण्याला बोलवा याचा अर्थ तुम्हाला चांगला समजला असेल असेही ते म्हणाल्याचं कथित ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येतं. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने मिशन ४५ चं टारगेट ठेवलं असून या अभियानांतर्गत बावनकुळे राज्यभर दौरा करत आहेत.

पत्रकारांशी चांगले संबंध ठेवावेत - बावनकुळे यांनी कथित क्लिपमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं आहे की, भाजपाच्या बूथ लेव्हलच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागातील पत्रकारांशी चांगले संबंध ठेवावेत. आपल्या भागामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, तसंच स्वतःचे पोर्टल चालवणारे पत्रकार कोण-कोण आहेत याचीही माहिती त्यांनी ठेवावी. २०२४ च्या लोकसभा निवडणुका होईपर्यंत आपल्या विरोधामध्ये एकही बातमी येणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या बाबत सकारात्मक बातम्या आल्या पाहिजेत. कार्यकर्त्यांनी बुथवर लक्ष ठेवावे. राज्यात किंवा केंद्रात काय सुरू आहे, याचा विचार त्यांनी करू नये. यासाठी वरिष्ठ स्तरावर योग्य ती कामं सुरू असून कार्यकर्त्यांनी फक्त आपापल्या बुथवर जास्त प्रमाणात लक्ष द्यावे असंही त्यांनी सांगितलं आहे.

ढाब्यावर छान जेवण मिळते - बावनकुळे यांच्या वक्त्यावर बोलताना भाजपा आमदार नितेश राणे म्हणाले आहेत की, जर बावनकुळे यांच्या वक्तव्याने एखाद्या पत्रकाराचं पोट भरत असेल, त्यांच्या चहाची तहान भागत असेल तर त्यात वाईट काय आहे. सर्व गोष्टी चुकीच्या चौकटीत का बघता. ढाब्यावर किती चांगलं जेवण मिळतं, जर पत्रकारांना ते जेवण नको असेल तर त्यांच्या मनात काहीतरी वेगळं आहे का? त्यांचा मेनू काही दुसरा आहे का? असे सांगत याबाबतीत बावनकुळे यांचं अभिनंदन करायला पाहिजे असंही राणे म्हणाले. तर पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत, त्यांच्याशी सन्मानानं वागा असा सल्ला दिल्याचं सांगून त्यात काय वावगं आहे, असं बावनकुळे यांनी स्पष्ट केल्याचं वृत्त आहे.

हेही वाचा...

  1. Bawankule On Narvekar : पडळकरांच्या वतीनं अजित पवारांची मी माफी मागतो, तर नार्वेकर कायद्याला धरूनच निकाल देतील - चंद्रशेखर बावनकुळे
  2. Bawankule Criticize INDIA : विरोधकांची आघाडी बारुद नसलेला बॉम्ब; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.