ETV Bharat / state

Excise Duty Income : दारुच्या महापुराने सरकारचाही खिसा गरम, उत्पादन शुल्क विभागाच्या उत्पन्नात 4000 कोटींची वाढ

author img

By

Published : Apr 1, 2023, 7:15 PM IST

Updated : Apr 1, 2023, 7:25 PM IST

Shambhuraj Desai On State Revenue
राज्य उत्पादन शुल्क विभाग

राज्य शासनाला महसुली उत्पन्न मिळवून देण्यात मोठा वाटा असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने यंदा जोरदार कमाई केली आहे गतवर्षाच्या तुलनेत यंदा या विभागाला चार हजार कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यात यश आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.

मुंबई: राज्य शासनाच्या महसुली उत्पन्नामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा वाटा असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने यावर्षी जोरदार कमाई करत आपल्या उत्पन्नात 25 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा या विभागाला चार हजार कोटी रुपयांचे अधिक उत्पन्न झाले आहे.


विभागाचे यश: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने मध्यार्क असलेली उत्पादने आणि अंमली पदार्थ यावर उत्पादन शुल्क आकारले जाते. तसेच दारू निर्मिती आणि दारू वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी या विभागाच्या माध्यमातून जबाबदारी उचलली जाते. तसेच या संदर्भातील गुन्ह्यांची उकलही विभागाच्या माध्यमातून केली जात आहे. या विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर महसूल वाढीसाठी आपण सातत्याने प्रयत्न केले आहेत. गेल्या नऊ महिन्यांत महसूलवाढी बाबत विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन बनावट मद्य निर्मिती रोखण्यासाठी तसेच बेकायदेशीर मद्य वाहतुकीला आळा घालण्यासाठी विशेष अभियान राबवले असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. यामुळेच महसुली उद्दिष्ट पूर्ण करण्याबरोबरच अतिरिक्त महसूल मिळवण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले.


परिश्रम घेतल्याने उत्पन्नात वाढ : गतवर्षी राज्य सरकारला 17500 कोटी रुपये इतके उत्पन्न मिळाले होते. यंदा या उत्पन्नात वाढ होऊन विभागाने 21 हजार 500 कोटी रुपये इतका विक्रमी महसूल गोळा केला आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीत अतिरिक्त 4000 कोटी रुपयांची भर पडली आहे. हिवाळी अधिवेशन आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात व्यस्त असूनही आपण जातीने या उत्पादन वाढीकडे लक्ष दिल्यामुळे आतापर्यंतचा सगळ्यात जास्त महसूल गोळा झाल्याचे विभागाचे मंत्री देसाई यांनी सांगितले. तसेच पुन्हा एकदा कोरोना बाधित झाल्यामुळे आपण राहत्या घरी विलगीकरणात असतानाही अधिकाऱ्यांच्या संपर्कात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राहून याबाबत अधिक जोरकसपणे काम करण्याविषयी सांगितले होते. आपण विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना दिल्यामुळे ही वाढ दिसत असून एकूण वर्षभरातील ही वाढ 25 टक्के इतकी असल्याचे देसाई यांनी सांगितले.

हेही वाचा: Sai Temple Donation : रामनवमी उत्सव काळात साईचरणी तब्बल 4 कोटींची देणणी; लाखो भक्तांनी घेतले दर्शन

Last Updated :Apr 1, 2023, 7:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.