ETV Bharat / state

पत्नीच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाचा जामीन

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 15, 2023, 5:20 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

Crime News : पत्नीचा खून करून आत्महत्येचा बनाव केल्याप्रकरणी दत्तात्रय नागटिळक यांना सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावर न्यायालयानं सुनावणी घेत त्यांना पुराव्याअभावी जामीन मंजूर केलाय.

नागराज शिंदे, माहिती देताना

मुंबई Crime News : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात 2018 मध्ये पतीनं पत्नीचा खून करून आत्महत्या केल्याचा खोटा दावा केल्याचा आरोप होता. दत्तात्रय नागटिळक असं या आरोपीचं नाव आहे. त्यानंतर आरोपीला सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला आरोपीनं उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. यावर न्यायालयानं पुराव्याअभावी दत्तात्रय नागटिळक यांना जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती मोहिते डेरे, न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठानं नागटिळक यांना जामीन मंजूर केलाय.

"पत्नीचा खून करून आत्महत्येचा बनाव केल्याचा आरोप दत्तात्रय नागटिळक यांच्यावर होता. तसंच नागटिळकवर 302 अन्वये गुन्हा दाखल केला होता. सत्र न्यायालयानं नागटिळक यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. त्यावेळी साक्षीदार, एफआयआर, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये विसंगती असल्याचं समोर आलं. - नागराज शिंदे, वकील

पत्नीनं आत्महत्या केल्याचा बनाव : मयत पत्नी मनीषा दत्तात्रय नागटिळक यांचा भाऊ भूषण मोहिते यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली होती. 27 डिसेंबर 2018 रोजी मनीषानं आत्महत्या केली, असं नागटिळक यांनी सांगितलं होतं. त्यामुळं ही आत्महत्या नसून हत्या असल्याची तक्रार भूषण मोहिते यांनी पोलिसांकडं केली होती.


जिल्हा न्यायालयानं सुनावली जन्मठेपेची शिक्षा : सोलापूर जिल्ह्याच्या सत्र न्यायालयात हा खटला सुरू होता. त्या ठिकाणी सरकारी पक्षाच्या वतीनं आरोपीने पत्नीची हत्या केल्याचा दावा केला होता. शवविच्छेदन अहवाल, पुराव्याच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध खून, पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयानं आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आरोपी दत्तात्रय नागटिळक पाच वर्ष तुरुंगात होता.



जन्मठेपेच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान : सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर आरोपीनं उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आरोपीच्या वतीनं वकील नागराज शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे, न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठानं अखेर पुराव्याअभावी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी दत्तात्रय नागटिळक याला जामीन मंजूर केलाय.

हेही वाचा -

  1. शिवसेना आमदार अपात्र प्रकरण; निर्णय घेण्यासाठी राहुल नार्वेकरांना मुदतवाढ, वाचा नवीन तारीख काय
  2. देशपातळीवर विरोधकांची इंडिया आघाडी! मात्र पुण्याच्या जागेबाबत आघाडीत बिघाडी, तर महायुतीत देखील अनेक दावेदार
  3. विधिमंडळ अधिवेशन 2023 : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी तळली भजी, बेरोजगारीकडं वेधलं लक्ष
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.