ETV Bharat / state

कॅन्सरपेक्षाही म्युकरमायकोसिस घातक; नागरिकांनी काळजी घेण्याची डॉक्टरांची कळकळीची विनंती

author img

By

Published : May 26, 2021, 5:13 PM IST

म्युकरमायकोसिस हा आजार कॅन्सरपेक्षाही घातक आहे. त्यामुळे, कोरोना आणि म्युकरमायकोसिस होऊच नये, या दृष्टीने काळजी घ्या, अशी कळकळीची विनंती आता डॉक्टरांकडून केली जात आहे. कोरोनाचे नियम पाळा, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा, पौष्टिक आहार घ्या आणि व्यायाम करा, असा सल्लाही ते देत आहेत.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

मुंबई - कोरोनाच्या संकटाशी सामना सुरू असतानाच आता म्युकरमायकोसिसचे संकट उभे ठाकले आहे. त्यात या आजाराचा रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून मोठ्या संख्येने रुग्ण गंभीर होत आहेत. तर, या आजाराचा मृत्यूदर 60 ते 70 टक्के आहे. त्यात या आजारावरील इंजेक्शन पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही आहेत. एकूणच ही परिस्थिती गंभीर असून हा आजार कॅन्सरपेक्षाही घातक आहे. त्यामुळे, कोरोना आणि म्युकरमायकोसिस होऊच नये, या दृष्टीने काळजी घ्या, अशी कळकळीची विनंती आता डॉक्टरांकडून केली जात आहे. कोरोनाचे नियम पाळा, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा, पौष्टिक आहार घ्या आणि व्यायाम करा, असा सल्लाही ते देत आहेत.

नागरिकांची बेफिकीरी कारणीभूत?

देशात कोरोना महामारीला सुरू होऊन सव्वा वर्षे झाले असून यात आतापर्यंत लाखो लोक दगावले आहेत. तर, कित्येक कुटुंबे उदध्वस्त झाली आहेत. मात्र, त्यानंतरही नागरिकांना या आजाराचे गांभीर्य कळताना दिसत नाही. मास्क हे कोरोनावरील लस आहे, हे माहीत असतानाही मोठ्या संख्येने लोकं मास्क वापरत नाहीत. वापरला तर तो योग्य प्रकारे वापरत नाहीत. त्यात आजही लोकं मोठ्या संख्येने एकत्र येतात, पार्टी, लग्न, इतर सोहळे करतात. परिणामी कोरोनाचा संसर्ग वाढताच आहे. तर, याच कोरोनातून पुढे अनेक रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण होत आहे. कोरोनाचे नियम पाळले जात नाहीत, त्यात म्युकरमायकोसिससारखे आजार होऊ नये या दृष्टीने घ्यायची काळजीही घेतली जात नाही. त्यामुळेच, आज रुग्णसंख्या वाढत असून रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण अधिक असल्याची माहिती डॉ. हेतल मारफातिया, विभाग प्रमुख, नाक-कान-घसा विभाग, केईएम रुग्णालय यांनी दिली.

हेही वाचा - पहिल्याच दिवशी आर्थिक मदतीसाठी २२ हजार रिक्षा चालकांचे अर्ज

कोरोनाचा मृत्यूदर 1 ते 2 टक्के असतानाही राज्यात परिस्थिती गंभीर आहे. रुग्णांना वाचवण्यासाठी आम्हाला शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. 95 टक्के रुग्ण बरे होत आहेत. तरीही डॉक्टर हतबल झाले आहेत, थकले आहेत. त्यात आता म्युकरमायकोसिससारखा 70 टक्के मृत्यदर असलेला आजार हातपाय पसरत आहे. रुग्ण वाढत आहेत. रुग्णांची अवस्था बिकट आहे, पुरेशी औषध मिळत नाही. वेळेत उपचार मिळाले तरी रुग्णाचे नाक, डोळे, टाळू जात आहेत. पुढे संसर्ग वाढत त्याच्या जिवाला धोका निर्माण होत आहे. आज राज्यभरात जे रुग्ण उपचार घेत आहेत, त्यातील 70 टक्के रुग्ण गंभीर आहेत, त्यामुळे आता नागरिकांनीच काळजी घेण्याची गरज असल्याचे डॉ. हेतल सांगतात.

काळी, पांढरी, पिवळी बुरशी याकडे लक्ष देऊ नका

ज्या कोरोनामुक्त रुग्णांच्या शरीरातील साखर प्रचंड वाढत आहे आणि ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत आहे, त्यांना म्युकरमायकोसिसचा धोका वाढत आहे. हा बुरशीजन्य आजार आहे. याला काळी बुरशी अर्थात ब्लॅक फंगस म्हटले जाते. तर, आता पांढरी बुरशी आणि त्यापाठोपाठ पिवळ्या बुरशीची चर्चा आहे. काळी, पांढरी, पिवळी बुरशी हे म्युकरमायकोसिसचे प्रकार आहेत, स्ट्रेन आहेत. नागरिकांनी या काळी, पांढरी, पिवळी बुरशी यात पडू नये. हा म्युकरमायकोसिस आहे आणि तो कॅन्सरपेक्षा घातक आहे, हे नागरिकांनी लक्षात घ्यावे, असेही डॉ. हेतल सांगतात.

अँटी फंगस उपचार देत 4 ते 6 आठवड्यांत रुग्णांना बरे करण्याचे आव्हान आमच्या समोर आहे. पण, मुळात रुग्ण गंभीर होऊनच येत आहेत व आल्यानंतर गंभीर होत आहेत. त्यामुळे, रंगांची चर्चा न करता कोरोना आणि त्यानंतर होणाऱ्या म्युकरमायकोसिससारख्या आजरांना कसे टाळता येईल, याकडे लक्ष द्या, असेही डॉ. हेतल सांगतात.

औषधीचा तुटवडा कायम

म्युकरमायकोसिसचा मृत्यूदर 70 टक्के आहे. तर, उपचार न मिळाल्यास 100 टक्के मृत्यूदर आहे. अशात या आजारावरील अ‌ॅम्फोटेरेसिन इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा आहे. हे इंजेक्शन उपलब्ध झाले तर जे रुग्ण बऱ्या अवस्थेत आहेत त्यांना वाचवता येईल. पण, औषधच उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्णांना उपचार मिळत नसल्याची परिस्थिती आहे, अशी माहिती डॉ. मिलींद नवलाखे, नाक-कान-घसा तज्ज्ञ, ग्लोबल हॉस्पिटल यांनी दिली. औषध उपलब्ध करून देण्याची मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत, पण अजूनतरी औषध उपलब्ध होत नाही आहेत. त्यामुळे, साहजिकच उपचारात अडचणी येत असल्याचेही डॉ. नवलाखे यांनी सांगितले.

पौष्टिक आहार करा

कोरोना घातक आहेच, पण त्यातही म्युकरमायकोसिस त्यापेक्षाही अधिक अगदी कॅन्सरपेक्षाही घातक आहे. त्यामुळे, कोरोना आणि म्युकरमायकोसिस होऊ नये यासाठी योग्य काळजी घ्या, असे आवाहन डॉ. हेतल यांनी केले. डबल मास्क वापरा, बाहेर पडल्यास योग्य अंतर राखा, हात स्वच्छ धुवा. कोरोना झाला तर त्यात मधुमेह होणार नाही आणि झालाच तर तो नियंत्रणात राहील याकडे डॉक्टर-रुग्णांनी लक्ष द्यावे. स्टिरॉयडचा वापर डॉक्टरांनी टाळावा. तर, रुग्णांनी आणि नागरिकांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पौष्टिक आहार घ्यावा, नियमित व्यायाम करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

हेही वाचा - पावसासाठी मुंबई सज्ज! नालेसफाईची 80-90 टक्के कामे पूर्ण झाल्याचा पालिकेचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.