ETV Bharat / state

काँग्रेसचा १४ ते १९ नोव्हेंबरपर्यंत जनजागरण सप्ताह; महागाई, इंधनदरवाढ विरोधात करणार जनजागृती

author img

By

Published : Nov 10, 2021, 5:50 PM IST

congress awareness campaign from 14 to 19 nov on inflation, petrol diesel rate hike
काँग्रेसचा १४ ते १९ नोव्हेंबरपर्यंत जनजागरण सप्ताह

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सातत्याने इंधनाचे दर आणि महागाई वाढवून देशातील गरीब मध्यमवर्गीय जनतेची लूट करत आहे. गेल्या एका वर्षात खाद्य तेलाच्या किंमती दुप्पट वाढल्या आहेत. इंधनाच्या किंमतीत एका वर्षात प्रति लिटर जवळपास ३५ रूपयांची वाढ सरकारने केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत असताना देशात मात्र त्या दररोज वाढत आहेत.

मुंबई - केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून गरिबांना लुटायचे आणि उद्योगमंत्र्यांचे खिसे भरायचे हा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. याचाच परिणाम म्हणून देशात इंधनाचे दर गगनाला भिडले असून महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. एका बाजूला दरवाढ, महागाई आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड प्रमाणात वाढलेली बेरोजगारी व केंद्राचे शेतकरीविरोधी धोरण यामुळे गरीब, शेतकरी व सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. मोदी सरकारने कृत्रिमरित्या महागाई वाढवून देशातील जनतेची लूट चालवली आहे. याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने १४ ते १९ नोव्हेंबरपर्यंत जनजागरण सप्ताह अभियान राबविण्यात येणार असून जेलभरो आंदोलनही करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांना दिली.

जनतेचे आर्थिक शोषण -

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सातत्याने इंधनाचे दर आणि महागाई वाढवून देशातील गरीब मध्यमवर्गीय जनतेची लूट करत आहे. गेल्या एका वर्षात खाद्य तेलाच्या किंमती दुप्पट वाढल्या आहेत. इंधनाच्या किंमतीत एका वर्षात प्रति लिटर जवळपास ३५ रूपयांची वाढ सरकारने केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत असताना देशात मात्र त्या दररोज वाढत आहेत. युपीए सरकारवेळी ४४० रुपयांना मिळणारा एलपीजी गॅस आता ९५० रुपयांपर्यंत महाग झाला आहे. उज्ज्वला योजनेच्या नावाखालीही गरिबांची थट्टा केली जात आहे. उज्ज्वला योजनेत मोफत गॅसच्या नावाखाली गरिबांचे केरोसिन बंद केले आणि आता गॅस ९५० रुपयांपर्यंत महाग केला. गेल्या ८ महिन्यात केंद्र सरकारने जवळपास ७५ वेळा इंधन दरवाढ केली. पेट्रोल ११० रुपये, डिझेल ९६ रुपये लिटर असून गॅसच्या किंमतीही सातत्याने वाढवून इंधनावरील कररुपाने मोदी सरकारने सात वर्षात तब्बल २५ लाख कोटी रुपयांची नफेखारी करून जनतेचे आर्थिक शोषण चालवले असल्याची टीका यावेळी नाना पटोले यांनी केली.

हेही वाचा - नवाब मलिक-देवेंद्र फडणवीसांनी एकमेकांवर केलेले आरोप गंभीर; याप्रकरणी सखोल चौकशी करावी - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

लोकप्रतिनिधी खेड्यापाड्यांत जाणार -

या कृत्रिम दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाने वारंवार रस्त्यावर उतरून आंदोलने केली. मात्र, जनतेचे रक्त शोषून उद्योगपती मित्रांचे खिसे भरण्यात केंद्र सरकार मग्न असलेल्याची टीका नाना पटोले यांनी यावेळी केली. सरकारच्या या लोकविरोधी धोरणाबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती दिनापासून म्हणजेच १४ ते १९ नोव्हेंबरपर्यंत जनजागरण अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियाना अंतर्गत काँग्रेस पक्षाचे नेते, मंत्री, आमदार, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी कार्यकर्ते प्रत्येक शहरात आणि गाव खेड्यात लोकांच्या घरी जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन गावात मुक्काम करून लोकांशी संवाद साधतील. केंद्र सरकारने इंधनदरवाढ करून महागाई कशी वाढवली आहे, याची माहिती लोकांना दिली जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.