ETV Bharat / state

प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल, ही आरोग्याची आणीबाणी - मुख्यमंत्री

author img

By

Published : Apr 10, 2021, 9:34 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर, काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे, असे बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुंबई - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, अमित देशमुख, तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदींनी सहभाग घेऊन आपल्या सूचना मांडल्या. प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी कोविड परिस्थिती आणि निर्माण झालेल्या आव्हानाला शासन कसे तोंड देत आहे, त्याची माहिती दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत मांडलेले मुद्दे

कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर, काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे, असे बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

तसेच विरोधी पक्ष नेत्यांनी दिलेल्या सूचनांवर निश्चितपणे गांभीर्याने विचार केला जाईल, त्यांनी चांगल्या सूचना मांडल्या आहेत. विशेषत: रेमडीसिव्हीर उपलब्धता, चाचण्यांचे अहवाल लवकर मिळणे, प्रयोगशाळांना यासाठी सूचना देणे, ऑक्सिजन उपलब्ध व्हावा म्हणून काटेकोर नियोजन, अशा त्यांच्या सूचनांवर शासन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मात्र, या क्षणाला वेगाने वाढणारी रुग्णवाढ थांबवायची कशी? हा प्रश्न सरकारसमोर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या वर्षी टाळेबंदीमध्ये लोक घरी होते. त्यामुळे रुग्ण व रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे सोपे होते. पण आता जेव्हा सर्व बाबी खुल्या झाल्या आहेत, तेव्हा यात व्यावहारिक अडचणी येतात ते केंद्राने समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले. एकीकडे लसीकरण वाढविण्याची खूप गरज आहे. युकेने दोन महिने कडक लॉकडाऊन केला. पण, त्या काळात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवून नागरिकांना संरक्षित केले. आज युवा पिढीला लस देण्याची गरज आहे. फायझर कंपनी तर १२ ते १५ गटातील मुलांना लस देण्याचे नियोजन करतेय, अशी माहिती बैठकीत दिली.

सर्व पक्षांनी जनजागृती करण्याचे आवाहन

कडक निर्बंध लावताना गरीब, श्रमिक, हातावर पोट असणाऱ्या वर्गाला त्रास होऊ नये, ही सर्वांचीच भूमिका आहे. त्यादृष्टीने जरूर विचार झाला पाहिजे. पण, दररोज झपाट्याने वाढणारा संसर्ग आणि रुग्णवाढ काहीही करून प्रथम रोखणे अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे त्या दिशेने पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे एकमुखाने निर्णय घेऊन या संकटावर मात कशी करावी ते ठरविले पाहिजे. यासाठी लोकांमध्ये आपण सर्व पक्षांनी जागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले.

रुग्णसंख्या इतक्या वेगाने वाढते आहे की, आज आपण लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला नाही तर उद्या आपोआपच लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवेल, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. कोरोना सर्वानांच टार्गेट करीत आहे. त्यात सगळे आले. हातावर पोट असलेला वर्ग सगळ्या विभागात आणि क्षेत्राचा विचार करावा लागणार आहे. आज परिस्थिती बिकट बनत चालली आहे. कृती दलाच्या तज्ञांचे म्हणणे देखील आम्ही सातत्याने विचारात घेतली जाते. एका बाजूला जनभावना आहे. पण, दुसऱ्या बाजूला कोरोनाचा उद्रेक आहे, अशा परिस्थितीत ही लढाई जिंकायची असेल तर थोडी कळ सोसावीच लागेल, म्हणत मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊनचे संकेत यावेळी देण्यात आले. तसेच याबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध क्षेत्रातील लोक आणि खासगी रुग्णालयांच्या संचालकांशी पण बोलणे झाले असून त्यांनी राज्य शासनाला सहकार्य करण्याची तयारी दर्शवली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्यसरकार राज्यातील जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन जो काही निर्णय घेईल त्याला विरोधी पक्षासहित सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.