ETV Bharat / state

Monsoon Session 2023 : 13 दिवसांत 17 विधेयके मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मांडला कामकाजाचा लेखाजोखा

author img

By

Published : Aug 4, 2023, 10:49 PM IST

Eknath Shinde
एकनाथ शिंदे

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी कामकाजाचा लेखाजोखा मांडला. अधिवेशनाच्या 13 दिवसांत एकूण 27 विधेयके सभागृहात मांडण्यात आली. त्यातील 17 विधेयके मंजूर करण्यात आली आहेत.

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची आज सांगता झाली. अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांसमोर अधिवेशन काळात झालेल्या सर्व कामांचा लेखाजोखा मांडला. अधिवेशन काळात मांडलेली विधेयके, पुरवणी मागण्या, मंजूर झालेली विधेयके, विरोधी पक्षाची संपूर्ण अधिवेशन काळातील भूमिका या सर्व बाबींवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. सोबतच विरोधी पक्षावर देखील टीका केली.

13 दिवसांमध्ये 27 विधेयके मांडली : यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 'आज पावसाळी अधिवेशनाची सांगता झाली. हे संपूर्ण अधिवेशन व्यवस्थित पार पडले. सभागृहात चर्चेच्या वेळी कोणताही गोंधळ झाला नाही. तसेच सभागृह तहकूब करण्याचीही वेळ आली नाही. 13 दिवस सभागृहाचे कामकाज चाललं. या 13 दिवसांमध्ये एकूण 27 विधेयके सभागृहात मांडण्यात आली. त्यातील 17 विधेयके मंजूर करण्यात आली आहेत. विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच 41 हजार 243 कोटी 21 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या होत्या. ही रक्कम आतापर्यंतची सर्वात मोठी आहे, असे ते म्हणाले.

'चर्चेच्या वेळी सर्व मंत्री सभागृहात उपस्थित' : पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'आजच्या अंतिम आठवडा प्रस्तावात विरोधकांच्या सर्वात जास्त मागण्या मंजूर करण्यात आल्या. या अंतिम आठवडा प्रस्तावाकडे राज्यातील संपूर्ण जनतेचे लक्ष असते. अंतिम आठवडा प्रस्ताव जनतेच्या हिताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. या संपूर्ण अधिवेशन काळात प्रत्येक मतदारसंघाला न्याय कसा देता येईल याचा विचार आम्ही केला. प्रत्येक मतदारसंघातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. सर्व आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील मुद्दे सभागृहात मांडले. महत्त्वाचं म्हणजे यावेळी सभागृहात प्रश्नांना उत्तर द्यायला मंत्री उपस्थित नाहीत म्हणून सभागृहाचे कामकाज बंद पडलं नाही. सर्व मंत्री चर्चेच्या वेळी सभागृहात उपस्थित होते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

विरोधीपक्ष गोंधळलेला : 'सभागृहाच्या सर्व आयोगांचा वापर करून या अधिवेशनात चर्चा झाली. मात्र, या काळात विरोधी पक्ष काहीसा गोंधळलेला आणि आत्मविश्वास गमावलेला दिसला. संपूर्ण अधिवेशन काळात महत्त्वाच्या आणि धोरणात्मक मुद्द्यांवर सभागृहात चर्चा झाली', अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

हेही वाचा :

  1. Eknath Shinde : उद्धव ठाकरेंचं प्रेम फक्त पैशांवरच, एकनाथ शिंदेंचा टोला
  2. Aaditya Thackeray : श्वेतपत्रिका व्हाईट पेपर की वाईट पेपर? - आदित्य ठाकरे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.