ETV Bharat / state

Mahaparinirvana Day: महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महापालिका सेवा सुविधांसह सज्ज

author img

By

Published : Dec 3, 2022, 10:58 AM IST

Mahaparinirvana Day
Mahaparinirvana Day

Mahaparinirvana Day: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्‍या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईत येणा-या लाखो अनुयायांकरीता मुंबई महापालिका सज्ज झाली आहे.

मुंबई: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्‍या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईत येणा-या लाखो अनुयायांकरीता मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. चैत्‍यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क), डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्‍थान राजगृह यासह आवश्यक त्या विविध ठिकाणी सुसज्‍ज नागरी सेवा- सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्याचबरोबर चैत्यभूमीतील आदरांजलीचे मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. समाजमाध्यमांद्वारे देखील थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, अशी माहिती उप आयुक्त रमाकांत बिरादार यांनी दिली आहे.

दादर शिवाजी पार्क येथे तात्‍पुरत्‍या निवा-याची सोय: महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांच्या मार्गदर्शनानुसार महापरिनिर्वाण दिनानिमित्त तात्पुरता निवारा, शामियाना, व्ही.आय.पी. कक्ष, नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये, स्नानगृहे, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे, विद्युत व्यवस्थेसह भ्रमणध्वनी चार्जिंग सुविधा इत्यादी सोयी- सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्‍यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्‍मारकाच्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी देशभरातून येणा-या अनुयायांना काही काळ विश्रांती घेता यावी. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे तात्पुरता निवारा, शामियाना उभारण्यात येत आहे. तसेच आपत्‍कालीन परिस्थितीत तात्‍पुरत्‍या निवा-याची सोय म्‍हणून सदर परिसरातील महानगरपालिकेच्‍या ६ शाळा निश्चित करण्‍यात आल्‍या आहेत. या शाळांमध्ये देखील आवश्‍यक त्‍या सर्व नागरी सेवा-सुविधा सुसज्‍ज ठेवण्‍यात आल्‍या आहेत.

अन्नदान करणाऱ्या संस्थांनी संपर्क साधावा: अनुयायांना अनेक इच्छुक विविध सामाजिक संस्थांमार्फत खाद्य वितरण करण्यात येते. सदर इच्छुक संघटना, संस्था, व्यक्ती यांचेतर्फे प्राचार्य एम. एम. पिंगे चौक, राजाबढे चौक लगत, ट्रॉफिमा हॉटेलच्या बाजुला छत्रपती शिवाजी महाराज मैदान, एस. एच. परळकर मार्ग विष्णू निवासजवळ आणि पद्माबाई ठक्कर, वेस्ट साईडच्या मागे अनुयायांना खाद्यपदार्थ वितरण करणार आहे. संबंधित संघटना, संस्था, व्यक्तींनी महानगरपालिकेच्या जी उत्तर विभाग (सहायक अभियंता परिरक्षण) व छत्रपती शिवाजी महाराज मैदान, पोलिस ठाणे (मुंबई) यांना दिनांक ४ डिसेंबर २०२२ पूर्वी लेखी स्वरुपात अवगत करावे. जेणेकरुन सदर कामाच्या दरम्यान अन्न सुनियंत्रित पद्धतीने वितरण करणे, वितरणाकरीता येणा-या वाहनांचे नियंत्रण करणे, तसेच सुयोग्यप्रकारे कचरा संकलन करणे, इत्यादी बाबींचे उचितप्रकारे नियोजन करणे व त्यानुसार अंमलबजावणी करणे शक्य होईल, असे देखील जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी आवाहन केले आहे.

दादर शिवाजी पार्क येथे या सुविधा: चैत्‍यभूमी येथे शामियाना व व्‍ही.आय.पी. कक्षासह नियंत्रण कक्षाची व्‍यवस्‍था, चैत्‍यभूमी प्रवेशद्वाराजवळ व सूर्यवंशी सभागृह मार्ग या ३ ठिकाणी रुग्‍णवाहिकेसहीत आरोग्‍यसेवा, १ लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्‍या मंडपात तात्‍पुरता निवारा, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) व परिसरात पुरेशा संख्येतील फ‍िरती शौचालये, रांगेत असणा-या अनुयायांसाठी पुरेशा संख्येतील फ‍िरती शौचालये, पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या नळांची व्‍यवस्‍था, पिण्‍याचे पाणी असणा-या टँकर्संचीही व्यवस्था, संपूर्ण परिसरात विद्युत व्‍यवस्‍था, अग्निशमन दलामार्फत आवश्‍यक ती सेवा, चौपाटीवर सुरक्षारक्षकासहीत बोटीची संपूर्ण परिसरात व्‍यवस्‍था, मोठ्या पडद्यांवर थेट प्रक्षेपण, फेसबुक, व्टीटर, यूट्यूब या समाजमाध्यमांवर असणा-या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत खात्यांद्वारे दि. ६ डिसेंबर रोजी थेट प्रक्षेपणाची व्यवस्था, विचारप्रवर्तक पुस्तकांसह वैविध्यपूर्ण बाबींच्या विक्रीसाठी स्‍टॉल्‍सची रचना, दादर (पश्चिम) रेल्‍वे स्‍थानकाजवळ आणि एफ उत्तर, चैत्‍यभूमी व छत्रपती शिवाजी महाराज मैदान.

दादर शिवाजी पार्क या सुविधा दादर (पूर्व) स्‍वामिनारायण मंदिराजवळ नियंत्रण कक्ष व माहिती कक्ष, राजगृह येथे नियंत्रण कक्ष आणि वैद्यकीय कक्ष, स्‍काऊट गाईड हॉल येथे भिक्‍कू निवासाची व्‍यवस्‍था, मैदानात धुळीचा त्रास रोखण्‍यासाठी पायवाटांवर आच्छादनाची व्‍यवस्‍था, अनुयायांना मार्गदर्शनाकरीता १०० फूट उंचीचे चैत्‍यभूमी परिसर येथे निदर्शक फुग्‍याची व्‍यवस्‍था, भ्रमणध्वनी चार्जिंगकरीता शिवाजी पार्क येथे पॉइंटची व्‍यवस्‍था, फायबरच्‍या तात्‍पुरत्‍या स्‍नानगृहाची व तात्‍पुरत्‍या शौचालयांची पुरेशा संख्येने व्‍यवस्‍था, रांगेतील अनुयायांसाठी तात्‍पुरते छत असलेल्‍या बाकड्यांची व्‍यवस्‍था, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) व्‍यतिरिक्‍त डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, वडाळा आणि लोकमान्‍य टिळक टर्मिनस (कुर्ला टर्मिनस) येथे देखील तात्‍पुरत्‍या निवा-यांसह पुरेशा संख्येने फि‍रती शौचालये, स्‍नानगृहे व पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था इत्यादी करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.