ETV Bharat / state

BMC Budget 2023 : मुंबईकरांच्या आरोग्यावर विशेष लक्ष, 'आरोग्यम् कुटुंबम' कार्यक्रम राबवला जाणार

author img

By

Published : Feb 4, 2023, 6:04 PM IST

मुंबई महानगरपालिकेचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प एकीकडे वाढला असताना पालिकेच्या शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या तरतुदी मागील वर्षापेक्षा कमी झाल्याचे समोर आले आहे. यंदा आरोग्य विभागासाठी ६३०९.३८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईमधील नागरिकांच्या आरोग्यासाठी 'आरोग्यम् कुटुंबम' हा कार्यक्रम राबवला जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली.

BMC Budget 2023
बृहन्मुंबई महानगरपालिका अर्थसंकल्प 2023

मुंबई : राज्याच्या राजधानीत प्रत्येक ५ व्यक्तींमागे एकाला उच्च रक्तदाब तर प्रत्येक ४ पैकी एकाला मधुमेह आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या स्टेप्स सर्व्हेक्षणानुसार मुंबईतील ३४ टक्के लोकांना उच्च रक्तदाब तर १८ टक्के लोकांना मधुमेह आहे. यामुळे अकाली मृत्यूचा धोका, हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोग, पक्षाघात, मूत्रपिंडाचे आजार, डोळ्यांच्या समस्या वाढू शकतात. असंसर्गजन्य रोगाच्या वाढत्या धोक्याला तोंड देण्यासाठी 'आरोग्यम् कुटुंबम' हा कार्यक्रम नियोजित केला आहे. असंसर्गजन्य रोगामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी १२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मोठी व उपनगरीय रुग्णालय, प्रसूतिगृह, वसतिगृह यावर लक्ष केंद्रित करण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली.


प्रगतीपथावरील कामे : दंत महाविद्यालयाच्या ११ मजली विस्तारित इमारतीचे बांधकाम पूर्ण होत आहे. या इमारतीमधील ७ ते ११ व्या मजल्यावरील वसतिगृहाचे काम पूर्ण होत आले आहे. विलेपार्ले येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. नायर रुग्णालयातील वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी हाजी अली येथील वसतिगृह इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सायन रुग्णालयात नर्सिंग कॉलेज, नर्सिंग व निवासी वैद्यकीय अधिकारी सेवा निवासस्थाने बांधकाम तसेच सायन कोळीवाडा येथे सेवा निवासस्थान बांधकाम पूर्ण झाले. एक्वर्थ रुग्णालयाच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधकाम सुरू आहे. नायर रुग्णालय येथे लिनियर एक्सलीएटर व पेट स्कॅनच्या उभारणीसाठी एल आकाराची इमारत बांधकाम सुरू आहे. मुलुंड येथील एम टी अग्रवाल, गोवंडी येथील शताब्दी, विक्रोळी पार्क साईट येथील मोकळ्या भूखंडावर ३० खाटांचे रुग्णालय, वांद्रे भाभा रुग्णालयाचे विस्तारीकरण ही कामे या आर्थिक वर्षांत पूर्ण होतील, अशी माहिती आयुक्तांनी दिली.


प्रसूतिगृहांचा विकास : शिवाजी नगर प्रसूती रुग्णालयात १२ खाटांचे नवजात शिशूंसाठी अतिदक्षता विभाग बाह्यस्त्रोतद्वारे सुरू केले जाणार आहे. मालवणी येथे ४९ खाटांची मौलाना अब्दुल कलाम आझाद प्रसूती रुग्णालयाचा पुनर्विकास करण्यात येत आहे. दादर येथील जाखादेवी मंदिराजवळ बहू विशिष्ट रुग्णालय उभारले जाणार आहे. आशेवर येथे १५२ खाटांच्या प्रसूतिगृहाच्या इमारतीचे काम सुरू आहे. कामाठीपुरा येथील नेत्र रुग्णालयाचा पुनर्विकास येत आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली.


आपला दवाखाना : प्राथमिक आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केले आहेत. यात २ लाख ५४ हजार ९८४ नागरिकांनी लाभ घेतला आहे. ३१ मार्च २०२३ पर्यंत १८ अतिरिक्त पॉलिक्लिनिक व डायग्नोस्टिक सेंटर्स आणि १३१ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केले जाणार आहे. २०२२-२३ मध्ये यासाठी ७५ कोटी तर २०२३-२४ मध्ये ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.


शिव योग केंद्र : मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर हृदयविकारांसारख्या जीवनशैली निगडीत आजारांवर प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी १३५ शिव योग्य केंद्रांची स्थापना केली आहे. दररोज यातून ६ हजार नागरिक लाभ घेत आहेत. यासाठी ५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.


पालिका रुग्णालयात नवीन अभ्यासक्रम : पालिकेच्या ४ वैद्यकीय महाविद्यालये आणि १ दंत महाविद्यालयात वैद्यकीय दंत आणि पॅरामेडिकल अभ्यासक्रम शिकवले जातात. वैद्यकीय क्षेत्रातील विविध तंत्रज्ञांसाठी विद्यापीठ मान्यताप्राप्त अभ्यासक्रम आणि वैद्यकीय पदवीधरांसाठी प्रगत वैद्यकीय कौशल्यांसाठी पोस्ट डॉक्टरल फेलोशिप हे अभ्यासक्रम तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने मान्यता दिलेले PHD अभ्यासक्रम राबवण्यात येत आहेत. नर्सिंग कौन्सिल ऑफ इंडियाने अनिवार्य केल्याप्रमाणे Bsc आणि Msc हे अभ्यासक्रम राबवले जाणार आहेत. उपनगरीय रुग्णालयांमध्ये DNB अभ्यासक्रम राबवले जाणार आहे. यावर ७० ते ८० टक्के खर्च होणार आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यातून होणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली.


इतर तरतुदी : कोविड सारख्या महामारीचा मुकाबला करण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयात मेट्रोपॉलिटीन सर्व्हिलन्स युनिटची स्थापना करण्यात येणार आहे. मुंबईमधील १२ पारंपारिक स्मशानभूमीच्या सुशोभीकरण आणि PNG मध्ये रूपांतर करण्यासाठी १.४० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दास उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्यासाठी कीटकनाशके व फॉगिंग मशीनचा पुरेसा साठा उपलब्ध कारण्यासाठी ३५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.


पालिकेचा अर्थसंकल्प वाढला : देशातील सर्वांत मोठी महानगर पालिका असलेल्या मुंबई महानगर पालिकेचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प मागील वर्षापेक्षा ७ हजार कोटी रुपयांची वाढलेला आहे. यंदा ५२ हजार ६१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. २०२२- 2३ चा ४५ हजार ९४९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. मागील वर्षापेक्षा यंदाच्या अर्थसंकल्पात सुमारे १४.५० टक्के इतकी वाढ झाली आहे. आरोग्यासाठी गेल्या वर्षी ६९३३.७५ कोटींची तरतूद करण्यात आली होती. यंदा ६३०९.३८ कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे.

हेही वाचा : MNS Will Disrupt KCR Meeting : मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची नांदेड येथील सभा उधळून लावणार - मनसे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.