ETV Bharat / state

Mission Thackeray Failed: शिंदेंच्या आडून भाजपचे 'मिशन ठाकरे' फेल.. भाजपने पाठवले केंद्रीय नेतृत्वाला पत्र

author img

By

Published : Mar 22, 2023, 1:25 PM IST

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करून भाजप- शिवसेना युती करत उद्धव ठाकरेंना शह देण्याचा भाजपचा प्रयत्न उलटा पडल्याचे दिसत आहे. शिंदेंच्या आडून भाजपचे मिशन यशस्वी होताना दिसत नसल्याने भाजपने आता त्यांच्या केंद्रीय नेतृत्त्वाला पत्र पाठवले आहे.

BJP's 'Mission Thackeray' fails under Shinde's cover BJP sent letter to central leadership
शिंदेंच्या आडून भाजपचे 'मिशन ठाकरे' फेल.. भाजपने पाठवले केंद्रीय नेतृत्वाला पत्र

मुंबई : राज्यात शिवसेनेच्या चाळीस आमदारांना फोडून भाजपने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. महाराष्ट्रातून ठाकरेंचे राजकीय अस्तित्व संपेल असा अंदाज यामागे बांधण्यात आला. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात ठाकरेंची क्रेझ कायम असल्याने भाजपने शिंदेंच्या आडून राबवलेले मिशन ठाकरे सपशेल फेल ठरले आहे. आगामी निवडणुकीत याचा फटका बसेल या भीतीने आता भाजपने आता प्लॅन बी तयार केला आहे. लोकसभा आणि विधानसभासोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित घेण्याची हालचाली सुरू केल्या आहेत. केंद्रीय नेतृत्वाला तसा प्रस्ताव पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली.



भाजपवरच प्लॅन बुमरँग: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत गेल्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा सोडला असे वातावरण तयार करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हाताशी धरत भाजपने ठाकरेंचे चाळीस आमदार गळाला लावले. इतकेच नव्हे तर १३ खासदारांनी देखील ठाकरे यांची साथ सोडत शिंदे यांना पाठिंबा दिला. राज्यातील बहुतांश माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचे वाट धरली. मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंना सोडल्यामुळे महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी पक्ष असलेल्या दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्व संपेल असा कयास लावला. मिशन ठाकरे हा प्लॅन भाजपवर बुमरँग झाल्याचे बोलले जाते.


केंद्राला पाठवलं पत्र: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अवघ्या देशातील नागरिकांच्या मनावर गारुड आहे. मोदींमुळे भाजपला लोकसभा असो किंवा विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळत आले आहे. ठाकरेंचे राजकीय अस्तित्व आणि नामोनिशान मिटवण्यासाठी केलेल्या कारनाम्यामुळे महाराष्ट्रात भाजप विरोधात प्रचंड नाराजीची लाट आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी प्रगत आणि पुरोगामी महाराष्ट्रात घेतलेली भूमिका जनतेच्या आजही पचनी पडलेली नाही. उलट शिंदेंसेनेवेर गद्दारीचा शिक्का बसला आहे. तर पक्ष संपवायला निघालेल्या भाजप विरोधात जनतेमध्ये संतप्त प्रतिक्रिया आहेत. अशातच महाविकास आघाडी असल्याने आगामी निवडणूक जड जाईल, अशी भीती भाजपला आहे. केंद्रातील नेतृत्वाला महाराष्ट्र भाजपने पत्रव्यवहार करत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचा प्रस्ताव पाठवला असल्याचे समजते.



एकत्र निवडणुकीचा फायदा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक देश एक निवडणूक ही संकल्पना मांडली आहे. संसदेत त्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला असला तरी भाजपने ती राबवण्याबाबत विचारविनिमय केला जातो आहे. महाराष्ट्रातील नेत्यांनीही याबाबत आग्रह धरला आहे. महाराष्ट्र विधानसभेची आगामी निवडणूक ऑक्टोबर २०२४ मध्ये प्रस्तावित आहे. मात्र ही निवडणूक लोकसभा निवडणुकीसोबतच घेण्यात यावी अशी विनंती केंद्रीय भाजप नेत्यांना करण्यात आली आहे. शिंदे यांनी शिवसेना फोडली असली तरी त्याचा फरक महाराष्ट्रात अपेक्षित प्रमाणे दिसून येत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा घेतल्यास महाविकास आघाडीतील जागा वाटपात वाद होतील अन त्याचा फायदा भाजपला होईल, असे या पत्रात नमूद केले आहे.



महाविकास आघाडी ठरणार वरचढ: मुंबई उद्धव ठाकरेंची मोठी ताकद आहे. काँग्रेसने देखील चांगला जम बसवला आहे. महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे बालेकिल्ले आहेत. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने महाराष्ट्रात ही आपला दबदबा कायम ठेवला आहे. महाविकास आघाडी म्हणून हे तिन्ही पक्ष एकत्र लढल्यास उमेदवार वरचढ ठरतील. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेतल्यास जागा वाटपात मतभेद निर्माण होतील. त्याचा परिणाम निवडणुकीवर होऊन भाजपला जागा निवडणूक आणण्याची संधी उपलब्ध होईल. त्यामुळे ऑक्टोबर ऐवजी एप्रिल - मे २०२४ मध्ये या निवडणुका होतील, असे नियोजन करावे अशी विनंती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा: गुढीपाडव्यानिमित्त शिर्डीत साईबाबांची केली खास पूजा, पहा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.