ETV Bharat / state

Kirit Somaiya Protest In Ministry : ठाकरेंच्या बंगल्याची माहिती देण्यास टाळाटाळ; मंत्रालयात किरीट सोमैयांचे आंदोलन

author img

By

Published : Apr 22, 2023, 7:46 AM IST

Updated : Apr 22, 2023, 8:29 AM IST

Kirit Somaiya Protest In Ministry
मंत्रालयात किरीट सोमय्यांचे आंदोलन

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर कोर्लई या गावात 19 बंगले असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला होता. मात्र याबाबतची माहिती महसूल विभागाकडून मिळत नसल्याने किरीट सोमैया यांनी मंत्रालयात आंदोलन केले.

मुंबई : महसूल विभागाच्या कार्यालयाबाहेर भाजप नेते किरीट सोमैया यांनी मौन आंदोलन सुरू केले होते. कोर्लई येथील ठाकरे कुटुंबाच्या १९ बंगल्यांची माहिती महसूल विभागाकडून मिळत नसल्याने किरीट सोमैया यांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे किरीट सोमैया यांना थेट मंत्रालयातील पहिल्या मजल्यावरील महसूल विभागाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करावे लागले. मात्र भाजपची सत्ता असतानाही किरीट सोमय्या यांना आंदोलन करावे लागल्याने याबाबत बऱ्याच उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या 19 बंगल्याप्रकरणी पळवाट काढण्याचा प्रयत्न केला होता. 15 जानेवारी 2021 ला मुख्यमंत्र्यांची नोटिंग असल्याची माहिती किरीट सोमैयांनी दिली. याबाबतचे आरोप माध्यमातून करण्यात आल्याने कोकण विभागाने संबंधित ठिकाणी भेटी देऊन तेथील वस्तुस्थितीचा अहवाल सादर केला. त्या ठिकाणच्या सध्याच्या परिस्थितीतील छायाचित्रांच्या प्रतिदेखील अहवालासोबत जोडून मुख्यमंत्र्यांनी सगळे तयार केल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला. पत्नीच्या घोटाळ्याची चौकशी करताना प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोपही किरीट सोमैया यांनी केला. त्यामुळेच माहिती देण्यास महसूल विभाग टाळाटाळ करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महसूल विभागाचे अधिकारी देत नव्हते माहिती : किरीट सोमैया यांनी याबाबतची माहिती मागवली होती. मात्र महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे. त्यामुळे माहिती अधिकाराच्या कायद्यानुसार दोन दिवसापूर्वी माहितीची पाहणी करून परीक्षण केले. त्याची प्रत मला द्यावी तशी मागणी मी केली होती, मात्र महसूल विभागाचे अधिकारी देत नसल्याचेही किरीट सोमैया यांनी यावेळी स्पष्ट केले. आता त्यांनी मला उत्तर दिलेले असून आपण ज्या फाईलची पाहणी केली, त्याची ओरिजनल फाईल 2 फेब्रुवारी 2021 रोजी मुख्यमंत्र्यांकडे अवलोकनासाठी पाठवण्यात आली होती. तथापि सदर फाईल कार्यालयात परत आलेली नसल्याने ते मला देत नव्हते, अशी माहितीही किरीट सोमैया यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या बंगल्यांची फाईल गेली कुठे : किरीट सोमैया यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या 19 बंगल्याच्या फाईलची मागणी केली. मात्र त्यांना ही फाईल देण्यात आली नाही. मुख्य फाईल नसेल तर त्याच्या झेरॉक्स देऊ शकता, अशी मागणीही किरीट सोमैया यांनी केली. त्यामुळे महसूल विभागाने झेरॉक्स उपलब्ध करून दिल्याचे किरीट सोमैया यांनी स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या 19 बंगल्यांची फाईल गेली कुठे याची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात मी अर्ज दिल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. रश्मी ठाकरे यांनी 19 बंगल्याची घरपट्टी भरली. मात्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात 19 बंगले नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे बंगले नाहीत, तर मग बंगल्याची फाईल गेली कुठे असा प्रश्न पडत असल्याचेही सोमैया यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा - NCP In Karnataka Polls : कर्नाटक निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून नऊ उमेदवारांची घोषणा, भाजपच्या माजी आमदारालाही दिले तिकीट

Last Updated :Apr 22, 2023, 8:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.