ETV Bharat / state

चंद्रकांत पाटील यांनी घेतली राज्यपालांची भेट; तर्कवितर्कांना उधाण

author img

By

Published : Nov 7, 2020, 9:09 PM IST

chandrakant patil meets governor
चंद्रकांत पाटील यांनी घेतली राज्यपालांची भेट

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची अचानक भेट घेतली. या भेटीने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. राज्यातील महाविकास आघाडीतील पक्षांच्या राज्यपाल नियुक्त प्रत्येकी चार जागा अशा एकूण १२ जागांचा प्रस्ताव शुक्रवारी राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. त्याबाबत ही भेट झाली असल्याची चर्चा व्यक्त करण्यात येत आहे

मुंबई - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची अचानक भेट घेतली. या भेटीमुळे अनेक राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. शुक्रवारीच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या यादीचा प्रस्ताव दिल्यानंतर पाटील यांनी आज घेतलेली ही भेट नेमकी कोणत्या विषयावर होती, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे या भेटीवर राजकीय तज्ज्ञांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

चंद्रकांत पाटील यांनी आज(शनिवारी) दुपारी राज्यपालांची अचानक भेट घेतली. या त्यांच्या भेटीचा कार्यक्रम नियोजित नव्हता. त्यामुळे नेमकी भेट कशासाठी होती, याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. मागील दोन दिवसांपासून रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना केलेल्या अटकेच्या नंतर भाजपाकडून राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर आज झालेल्या न्यायालयातील सुनावणीनंतर अर्णव यांना फार मोठा दिलासा मिळाला नाही. त्यामुळे या एकूणच प्रकरणात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांच्याकडून राज्यपालांकडे करण्यात आली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांना मदत आणि आचारसंहितेबाबत चर्चा-

दुसरीकडे सोमवारपासून राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पिकांच्या आणि इतर नुकसानी संदर्भातील मदत देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. मात्र अद्यापही या मदती संदर्भात प्रशासकीय पातळीवर प्रचंड मोठा गोंधळ आहे. तर दुसरीकडे शिक्षक-पदवीधरांच्या निवडणुकीची आचारसंहिता राज्यात सुरू असल्याने ही मदत देण्यासाठी अडचणी उभ्या राहिल्या आहेत. या पार्श्वभूमीवरही चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल सोबत चर्चा केली असल्याचे सांगितले जाते.

राज्यपाल नियुक्त जागांवर आडकाठी?


सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज्यातील महाविकास आघाडीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पक्षांकडून राज्यपाल नियुक्त प्रत्येकी चार जागा अशा एकूण १२ जागांचा प्रस्ताव शुक्रवारी राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. नेमकी या प्रस्तावातील नावे काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आणि त्यावर आडकाठी आणण्यासाठी पाटील यांचीही भेट होती काय, असा प्रश्नही राजकीय विश्लेषकांनी मध्ये उपस्थित केला जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.