ETV Bharat / state

शिवसेना शिंदे गटाचे लक्ष्य वरळी; स्थानिक आमदार म्हणतात, आधी निवडणुका घ्या

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 6, 2024, 9:40 PM IST

Aaditya Thackeray Vs CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray Vs CM Eknath Shinde : आगामी विधानसभा निवडणुकीची रणनिती आखायला सत्ताधारी पक्षांनी सुरुवात केली आहे. शिवसेना शिंदे गटाने आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघावर लक्ष्य केंद्रित केलं आहे. मात्र, कुणी कितीही प्रयत्न केला तरी या मतदारसंघात फरक पडणार नाही, आधी निवडणुका घेऊन दाखवा असं प्रतिआव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या स्थानिक आमदारांनी दिलं आहे.

मुंबई Aaditya Thackeray Vs CM Eknath Shinde : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने विविध मतदार संघांमध्ये हातपाय पसरायला सुरुवात केली. सर्वात पहिले लक्ष शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघावर केंद्रित केलं आहे. तर आदित्य ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न शिवसेना शिंदे गटाकडून सुरू आहे.


पालकमंत्र्यांवर दिली जबाबदारी : मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यावर या मतदारसंघाची जबाबदारी दिली असून, त्यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातील विकास कामांच्या बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. या मतदारसंघातील रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी शासकीय यंत्रणा आणि महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सरकारच्या माध्यमातून विविध योजना आणि विकास कामे या मतदारसंघात सुरू करून स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांकडून केला जात आहे.

केसरकर यांनी दिले निर्देश : वरळी कोळी वाड्यातील रहिवाशांच्या सोयीसाठी मुंबई महापालिका, मत्स्य व्यवसाय विभाग, बंदरे विभाग, मेरीटाईम बोर्ड आणि अन्य यंत्रणांमार्फत जी विकास कामे करण्यात येत आहेत, ती तातडीने आणि दर्जेदाररीत्या पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्री केसरकर यांनी दिले आहेत. यासाठी त्यांनी एक विशेष अधिकारी समन्वय साधण्याकरिता नेमला आहे.

महिला सक्षमीकरण करण्यावर भर : या संदर्भात बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, वरळी येथील लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या 'गोल्फा देवी' यात्रेपूर्वी येथील रस्त्याचं काम पूर्ण करण्यात येईल. इथल्या कोळी बांधवांच्या खाद्य संस्कृतीच्या प्रसार व्हावा, याबरोबरच महिला सक्षमीकरण करण्यावर भर आहे. त्या अनुषंगाने कोळीवाडा येथे फूड कोर्टचं काम तातडीनं सुरू करण्याचा मानस आहे. तसेच जेटीवर समुद्राच्या लाटांपासून बचाव करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या, भिंतीचं कामही सात दिवसात सुरू करण्याचं आदेश दिलं आहेत. वरळी किल्ल्याजवळील परिसर सुशोभित करून तेथील नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मतदारसंघातील मैदानांचा विकास करून खेळण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देशही यंत्रणेला दिलं असल्याचं केसरकर यांनी सांगितलंय.


आधी निवडणुका घ्या : यासंदर्भात बोलताना आमदार सुनील शिंदे म्हणाले की, पालकमंत्री या नात्याने दीपक केसरकर यांना कोणत्याही विभागात जाऊन काम करण्याची मुभा आहे. त्यांनी केवळ वरळी विधानसभा मतदारसंघाकडेच लक्ष न देता संपूर्ण मुंबई शहराकडे लक्ष देणं अपेक्षित आहे. मात्र तरीही जर ते या एकाच मतदारसंघात वारंवार येऊन काम करणार असतील तर आम्हाला त्याचा आनंद आहे. त्यांच्या या कामांमध्ये काहीच फरक पडणार नाही. आमचे कार्यकर्त्यांचे जाळे तळागाळात पसरले आहे. अनेक वर्षांपासून लोकांचा आमचा संपर्क आणि विश्वास आहे. जर सरकारची हिंमत असेल तर त्यांनी आधी निवडणुका घ्याव्यात आणि जनतेचा कौल कोणाच्या बाजूने आहे हे जाणून घ्यावे, असं प्रतिआव्हान शिंदे यांनी दिलं आहे.

हेही वाचा -

  1. लोकसभा निवडणूक २०२४ : पुढील पंधरा दिवसात महाविकास आघाडीत कोण कुठून लढणार ते स्पष्ट होईल - सुप्रिया सुळे
  2. भारत जोडोनंतर आता राहुल गांधींची 'भारत न्याय यात्रा'; कॉंग्रेस फुंकणार लोकसभेचं रणशिंग
  3. पायाखालची वाळू घसरलेल्या आव्हाडांची वक्तव्य कपोल कल्पित- भाजपा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.