ETV Bharat / state

Bridge Work Mumbai : रेल्वेच्या ढिसाळ नियोजनामुळे आर्मीची मेहनत वाया, खर्चही गेला फुकट, वाचा सविस्तर

author img

By

Published : Mar 27, 2023, 9:30 PM IST

Bridge Work Mumbai
भारतीय सैन्य दलाने बनवलेला पूल

रेल्वेच्या पुलांवर होणारी प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी केंद्र सरकार आणि रेल्वे प्रशासनाने तीन ठिकाणी भारतीय सैन्य दलाच्या माध्यमातून नवे पूल बांधले. मात्र, हे पुल प्रवाशांच्या सोयीच्या ठिकाणी बांधण्यात आले नसल्याने त्याचा प्रवाशांना फायदा होत नाही.

रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता माहिती देताना

मुंबई : शहरात २०१७ मध्ये एल्फिस्टन रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन 23 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेमुळे रेल्वेच्या पुलांवर होणारी प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी केंद्र सरकार आणि रेल्वे प्रशासनाने तीन ठिकाणी भारतीय सैन्य दलाच्या माध्यमातून नवे पूल बांधले. मात्र हे पुल प्रवाशांच्या सोयीच्या ठिकाणी बांधण्यात आले नसल्याने त्याचा प्रवाशांना फायदा होत नाही. त्यामुळे आर्मीची मेहनत आणि रेल्वेने केलेला खर्च दोनीही वाया गेले आहेत.

चेंगराचेंगरीत 23 प्रवाशांचा मृत्यू : मध्य रेल्वेवरील परेल आणि पश्चिम रेल्वेवर असलेल्या एल्फिस्टन या स्थानकांना जोडणारा पूल 1972 मध्ये बांधण्यात आला होता. हा आपुला बांधताना त्या वेळी असलेल्या प्रवाशांच्या संख्येच्या नुसार बांधण्यात आला होता. परेल आणि एल्फिस्टन ही स्थानके गार्दीची स्थानके म्हणून ओळखली जातात. गेल्या काही वर्षात येथे व्यावसायीक केंद्र उभी राहिल्याने गर्दी आणखी वाढली आहे. याच गर्दीमुळे 29 सप्टेंबर 2017 रोजी या पुलावर चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत 39 प्रवासी जखमी झाले तर 23 प्रवाशांचा मृत्यू झाला.

आर्मीने बांधले तीन नवे पूल : चेंगराचेंगरीच्या घटनेची दखल घेत रेल्वे प्रशासनाने एल्फिस्टन, करीरोड आणि आंबिवली या स्थानकात 3 पुल भारतीय सैन्य दल म्हणजेच आर्मीकडून बांधण्याचा निर्णय घेतला. परेल एलफिन्स्टन रेल्वे स्थानकात 10.44 कोटी रुपये खर्चून 240 फूट लांब 8 टन वजनाचा पुल बांधण्यात आला. करीरोड स्थानकात 30 मीटरचा पुल उभारण्यात आला आहे. त्यासाठी 3 कोटी रुपये, तर आंबिवली स्थानकात 20 मीटर लांबीचा पुल उभारण्यात आला आहे त्यासाठी 2.70 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. केवळ 4 महिन्यात हे पूल बांधण्यात आले आहेत.


प्रवाशांना फायदा नाही : एल्फिन्स्टन व परेल स्थानकातून रोज तीन ते साडे तीन लाख प्रवासी प्रवास करतात. हे प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाजूला असलेल्या पुलाचा वापर करतात. त्यामुळे आर्मीकडून दादर बाजूस बांधण्यात आलेल्या पुलाचा वापर प्रवाशांकडून केला जात नाही. करीरोड स्थानकात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाजूस आर्मीकडून पूल बांधण्यात आला आहे. या पूलाचा वापर सुद्धा प्रवाशांना होत नाही. यामुळे या दोन्ही पुलांवर करण्यात आलेला खर्च आणि आर्मीच्या जवानांची मेहनत वाया गेली आहे.



प्रवाशांच्या सुविधा लक्षात घ्याव्यात : रेल्वे प्रशासनाने परेल एल्फिस्टन आणि करीरोड येथे बांधलेले पूल प्रवाशांची गरज लक्षात घेऊन बांधलेले नाहीत. यामुळे त्याचा वापर होत नाही. पूल, प्लॅटफॉर्म, एक्सलेटर आदी सुविधा उपलब्ध करून देताना त्याचा वापर प्रवाशांना होणार आहे का याचा विचार करून त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी केली आहे. रेल्वे मंत्री आणि रेल्वे प्रशासन यांनी याबाबत लक्ष घालायची मागणीही गुप्ता यांनी केली आहे.

हेही वाचा : Pune Crime: मोहोळ यांच्या नावाने मागितली तब्बल 3 कोटींची खंडणी; दोघांविरुद्ध गुन्हा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.