ETV Bharat / state

परिचारिका भगिनींच्या सेवेची मानवतेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल - अजित पवार

author img

By

Published : May 12, 2020, 2:31 PM IST

अजित पवार
ajit pawar wishes international nurses day

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जागतिक ‘परिचारिका’ दिनानिमित्त समस्त परिचारक बंधू-भगिनींना शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई - कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या आणि जोखीम पत्करुन रुग्णांची सेवासुश्रूषा करणाऱ्या 'परिचारिका’ भगिनींच्या सेवाकार्याची नोंद मानवतेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी होईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जागतिक ‘परिचारिका’ दिनानिमित्त समस्त परिचारक बंधू-भगिनींना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच कोरोनाविरुद्धची लढाई आपण जिंकणार असून या विजयात परिचारिकांचा वाटा सर्वात मोठा असेल, असेही ते म्हणाले.


आज जगावर कोरोनाचे संकट असताना असंख्य परिचारिका भगिनी देवदूत बनून रुग्णांची सेवा करत आहेत. उपचारांच्या बरोबरीने रुग्णांना धीर, विश्वास, आत्मबळ देत आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत याच परिचारिकांची भूमिका मुख्य असून या लढाईत त्याच मुख्य सैनिक आहेत. स्वत:च्या जीवाची जोखीम पत्करुन, कुटुंबाचा विचार बाजूला ठेवून असंख्य परिचारिका भगिनी आज दिवसरात्र रुग्णसेवा करीत आहेत. शहरी, ग्रामीण, दुर्गम भागात कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या सेवाकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यास शब्द अपुरे आहेत, अशा शब्दांत आपल्या भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या.


'कोरोना'वर सध्यातरी कोणतेही हमखास औषध नसल्याने रुग्णांची योग्य काळजी आणि शुश्रूषा हीच आरोग्य संजीवनी ठरत आहे. हे काम परिचारिका भगिनी अत्यंत सेवाभावाने, तन्मयतेने करत आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील 'कोरोना'बाधित रुग्णांचे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण चांगले आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत समस्त परिचारक बंधू-भगिनींचे हे योगदान कोणीही विसरू शकणार नाही. साथीचे आजार, इतर दुर्धर आजार, सध्याचे कोरोनाचे संकट अशा अनेक संकटांचा सामना या परिचारिका भगिनी करीत असतात. त्यांच्या सेवाकार्याची नोंद घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांचे मनोबल वाढवणे, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे असेही अजित पवार म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.