ETV Bharat / state

Ajit Pawar in Vajramuth Sabha : ...म्हणून हे सरकार निवडणूक घ्यायला घाबरते; अजित पवारांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

author img

By

Published : May 1, 2023, 9:17 PM IST

Updated : May 1, 2023, 10:39 PM IST

मुंबईत सोमवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत विरोधी पक्षनेते अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच त्यांनेी शिवसेना व बाळासाहेब ठाकरेंची प्रशंसा यावेळी केली. शिंदे सरकारला निवडणुकीत पराभवाची भीती आहे, म्हणून हे सरकार निवडणुका जाहीर करत नाही, अशी टीका अजित पवार यांनी यावेळी केली. तर शिवसेनेमुळेच मुंबईत मराठी माणूस टिकला, असे ते यावेळी म्हणाले.

Ajit Pawar
अजित पवार

अजित पवार

मुंबई : महाविकास आघाडीची आज मुंबईत वज्रमुठ सभा झाली. या सभेत बोलताना विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी राज्यातील शिंदे - फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.

'शिवसेनेमुळे मुंबई टिकली' : यावेळी बोलताना अजित पवार यांनी मुंबईचे मराठीपण टिकवण्यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे सर्वाधिक योगदान आहे असे म्हटले. अजित पवार म्हणाले की, 'मुंबई महाराष्ट्राला सहजासहजी मिळाली नाही. तिच्यासाठी खूप लोकांनी बलिदान दिले. त्यानंतर शिवसेनेमुळे मुंबई टिकली. शिवसेनेमुळे मुंबईत मराठी माणूस टिकला. मात्र हे काही लोकांना खुपले. त्यामुळेच त्यांनी शिवसेनेसोबत अशाप्रकारे गद्दारी केली'

'सरकार निवडणूक घ्यायला घाबरते' : अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, 'हे सरकार येऊन 10 महिने झाले तरी यांनी आणखी निवडणुका जाहीर केल्या नाहीत. यांना कशाची भीती आहे. निवडणूका जाहीर झाल्यावर जनता सरकारला जागा दाखवेल अशी भीती यांच्या मनात आहे. सध्या पावसाळा नाही मात्र तरीही हे सरकार मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर करत नाही. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. पिके उद्ध्वस्त झाली आहेत. मात्र तरीही सरकार शेतकऱ्यांना मदत करत नाही. हे सरकार शेतकऱ्यांसाठी काय करत आहेत. राज्यात कायद्याचा बोजवारा उडाला आहे, याला जबाबदार कोण?', असा हल्लाबोल अजित पवार यांनी यावेळी केला.

'हे गद्दारी करून आलेलं सरकार' : सरकारवर टीका करताना अजित पवार म्हणाले की, 'हे सरकार गद्दारी करून आलेलं आहे. एकीकडे महागाई प्रचंड वाढली आहे, तर दुसरीकडे सरकार जाहीरातबाजी करण्यात पैसा खर्च करते आहे. महाराष्ट्रात बेरोजगारी वाढली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला नपुंसक म्हटलं तरी यांना लाज वाटत नाही. राज्यातील दंगली थांबवण्याची हिंमत सरकारमध्ये नाही. मुख्यमंत्री घोटाळा करूनच सत्तेत आले आहेत. त्यांना आता त्यांची जागा दाखवण्याची गरज आहे'.

'सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार' : यावेळी टीका करताना अजित पवार यांनी सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरु असल्याचे म्हटले. ते म्हणाले की, राजू शेट्टींनी सांगितले आहे की राज्यात बदल्यांचे दर ठरले आहेत. प्रत्येक महापालिकेतील टेंडर मंत्रालयातून हालत आहे. आर्थिक पाणी अहवालामध्ये महाराष्ट्राचा नंबर घसरला, मात्र प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरु आहे. जनतेच्या पैशावर सरकारचा उदोउदो चालू आहे. महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी यांनी 150 पेक्षा जास्त बैठका घेतल्या. अशाने लोकशाही जिवंत कशी राहणार? या सरकारला मराठी भाषेची पण अडचण आहे. हे सरकार जाणीवपूर्वक जाती - पंथात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे, असे अजित पवार यावेळी म्हणाले.

हेही वाचा : Uddhav Thackeray in Vajramuth Sabha :..तर मिंदे हे गद्दारी करुन मुख्यमंत्री झाले नसते - उद्धव ठाकरे

Last Updated : May 1, 2023, 10:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.