ETV Bharat / state

Uddhav Thackeray in Vajramuth Sabha : मुंबई तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे तुकडे करू; उद्धव ठाकरेंचा इशारा, 'बारसू'वर केले भाष्य

author img

By

Published : May 1, 2023, 8:59 PM IST

Updated : May 1, 2023, 10:40 PM IST

महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा सोमवारी मुंबईत झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारसह मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुंबईची हत्या करण्याचा डाव भाजप करत आहे. पण, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न केला तरी त्याचे आम्ही तुकडे करू, अशा गर्भीत इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजपसह शिंदे सरकारला दिला आहे. तसेच मी 6 मे रोजी बारसूला जाणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

thackeray
उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांचे वज्रमूठ सभेतील भाषण

मुंबई - महाविकास आघाडीच्या मुंबईतील वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवरून मोदी सरकार, शिंदे सरकारवर टीका केली आहे. तसेच बारसू रिफायनरीवरून देखील उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे. मी सहा मे रोजी बारसूला जाणार आहे. बारसू हे पाकिस्तान नाही, त्यामुळे मी तिथे जाणारच असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. मुंबईची लूट, महारष्ट्राची लूट सुरू आहे. बाळासाहेबांचे विचार असते तर मिंदेंनी गद्दारी केली नसती, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

नारायण राणेंना आव्हान - मी येत्या 6 तारखेला बारसूला जाणार आणि त्या ठिकाणी बोलणार, मला कोण अडवणारे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. बारसूतल्या लोकांना मी भेटणार आणि त्यांच्याशी बोलणार, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आव्हान स्वीकारले आहे. मी बारसूसाठी जागा सुचवली होती पण लोकांवर अन्याय करायला मी नाही सांगितला, असे ठाकरे यावेळी म्हणाले. मी ती जागा सूचवली होती, पण त्याठिकाणी पोलिसांना पाठवा, लाठीमार करा असे लिहिले होते का? सर्वमान्यता मिळाली तरच बारसूत रिफायनरी होणार असे मी त्यावेळी सांगितले होते, असे स्पष्टीकरण उद्धव ठाकरे यांनी बारसू विषयावर दिले आहे.

ठाकरे कुटुंबावर खालच्या पातळीवर भाष्य - कर्नाटकमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की त्यांना काँग्रेसने 91 वेळा शिव्या दिल्या. पण तुमचे लोक मला, आदित्य ठाकरेंना, माझ्या कुटुंबीयांना कोणत्या भाषेत शिव्या देतात त्याकडे लक्ष द्या. आतापर्यंत मी गप्प बसलो होतो. पण यापुढे शिव्या द्याल तर त्याच भाषेत उत्तर दिले जाईल. हीच शिकवण तुमच्या रामभाऊ म्हाळगी संस्थेत शिकवता का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हे मान्य आहे का? असा सवालही उद्धव ठाकरे यानी विचारला आहे.

खुर्चीचा उपयोग फक्त बुड टेकायला - १ मेच्या मध्यरात्री मी हुतात्मा चौकात गेलो होतो. आम्ही पोहचलो तोपर्यंत कुणीही तिथे पोहचले नव्हते. आज सकाळी गेले असतील मिंधे तिथे. क्रियाकर्म करायचे म्हणून जायचे आणि मानवंदना देऊन यायचे. गेलेच असतील जाणार कुठे? मात्र मिंध्यांना मला एक सांगायचे आहे की या लोकांनी लढा दिला नसता तर गद्दारी करून का होईना तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाला नसता. तसेच गद्दारी करुन मिळालेल्या खुर्चीचा उपयोग फक्त बुड टेकायला करु नका, महाराष्ट्रावरचा अत्याचार सहन करू नका, असे म्हणत एकनाथ शिंदेंना खडेबोल उद्धव ठाकरे यांनी सुनावले आहेत.

..तर तुकडे करू - महाराष्ट्रातून उद्योग बाहेर नेले जात आहेत. बुलेट ट्रेनने कोण प्रवास करणार आहे? मुंबई महाराष्ट्रापासून तोडता येत नाही म्हटल्यावर मुंबईची हत्या केली जात आहे. मुंबईतून अनेक प्रकल्प हे गुजरातला नेले. या आधी बाळासाहेबांनीही इशारा दिला होता, आता मीही सांगतो, कुणीही असो, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न केला तर तुमचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

भाजपने आपल्याच लोकांना पक्षाबाहेर काढले - भ्रष्टाचाराचे आरोप करत एकनाथ खडसे यांना भाजपने मंत्रीपदावरून बाजूला केले. लाठीकाठी खाऊन एकनाथ खडसे, गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष गावपातळीवर वाढवला. पण आताच्या भाजपने कट्ट्र कार्यकर्त्यांना पक्षाबाहेर काढले. एकनाथ खडसे यांच्यावर आरोप केले व नंतर त्यांना पक्षातून बाहेर कसे काढता येईल याचा कट रचण्यात आला होता, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

हेही वाचा - Sanjay Raut in Vajramuth Sabha : मुंबई आमच्या बापाची, कोणीही महाराष्ट्रपासून तोडू शकणार नाही; संजय राऊतांचा केंद्राला इशारा

Last Updated : May 1, 2023, 10:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.