ETV Bharat / state

Ajit Pawar on Shinde Govt : कुरघोडीचे राजकारण करू नका; जनतेच्या प्रश्नांना न्याय द्या, अजित पवारांचे सरकारवर टीकास्त्र

author img

By

Published : Mar 24, 2023, 6:30 PM IST

सरकारने कुरघोडीचे राजकारण न करता जनतेच्या प्रश्नाला न्याय द्यायला पाहिजे. गोळीबार करून दिवसाढवळ्या माणसे मारली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. राज्यात डबल इंजिनचे सरकार आले. विकासाचा वेग डबल होईल, असे आपण सांगता मात्र तसे काहीही झालेले नाही. केवळ सत्ता टिकवण्यासाठी तडजोडी सुरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

Ajit Pawar Critics
Etv Bharat

विरोधी पक्षनेते अजित पवार माध्यमांसोबत संवाद साधताना

मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना अजित पवार यांनी राज्याच्या कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर कडाडून टीका केली आहे. राज्यात जुगार, मटका, डान्सबार हे अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले आहे. तलवारी, कोयते नाचवत रस्त्यावर फिरवून दहशत निर्माण केली जात आहे. दिवसाढवळ्या गुंड गोळ्या घालून लोकांच्या हत्या करत असून व्यावसायिकांच्या हत्या होत आहे. इतकच काय पण सत्तारूढ पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही त्याचा प्रसाद मिळतो आहे. त्यामुळे सरकारने याची दखल घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.

कायदा व सुव्यवस्था बिघडली : राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णतः बिघडली असून कोयता यांची दहशत पुण्यापाठोपाठ आता नाशिक शहरातही वाढली आहे. मुंबईमध्ये देखील दिवसाढवळ्या तलवारी नाचवत गुंड फिरतात हल्ले करतात. सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षितता वाटेल असे कुठलेही वातावरण शिल्लक नाही. केवळ गुंडांना अटक करून चालणार नाही. त्याच्या मुळाशी गेले पाहिजे, असेही अजित पवार यावेळी म्हणाले. तर नागपूर शहराची खुलेआम हफ्ते खोरी सुरू असून दोन गुन्हेगारांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी दीड लाख रुपयांची मागणी केल्याची ध्वनिफीत वायरल झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

राज्यात अवैध धंदे सुरू : राज्यात मटका, जुगार , गुटखा आणि डान्सबार यांना बंदी असूनही राजरोसपणे हे सर्व धंदे सुरू आहेत. राज्यात ऑनलाइन लॉटरी आणि रमीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या जुगारातून ग्रामीण भागातील लोकांची आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. तरुण पिढी या जुगाराकडे वळत आहे. ऑनलाइन रमीची जाहिरात काही अभिनेते करीत आहेत. त्यामुळे तरुण या जाळ्यात अडकत असल्यामुळे त्यावर कारवाई करावी, असे ते म्हणाले. तर महाराष्ट्रात डान्सबार बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात डान्सबार सुरू आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई इतर ठिकाणी ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार सुरू आहेत, यावर कडक कारवाई व्हावी, असे ते म्हणाले.

लव जिहादवरून शांतता बिघडवण्याचा प्रयत्न : उत्तर प्रदेशातील कायद्याच्या धर्तीवर लव जहाज विरोधी कायदा राज्यात केला जाणार असल्याची वक्तव्य काही लोकप्रतिनिधी करत आहेत. मात्र, यामुळे महाराष्ट्रात धार्मिक द्वेष पसरवला जाण्याची शक्यता आहे. राज्यातील जातीय सलोखा आणि शांतता यामुळे धोक्यात येणार आहे. त्यामुळे या संदर्भात सरकारने काळजी घेऊन सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला पाहिजे. सरकारने घटना विरोधी आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती स्थापन केल्याचा आरोपही यावेळी पवार यांनी केला. जनतेचा मूलभूत हक्क डावलण्याचा हा प्रकार असून लोकांच्या खाजगी आयुष्यात सरकारने ढवळाढवळ करू नये, असे स्पष्ट शब्दात त्यांनी सुनावले.

महाराष्ट्रात रोज 38 महिला बेपत्ता : राज्यात दररोज महिला अत्याचारांमध्ये वाढ होत आहे. अत्याचाराच्या घटना अजिबात कमी होताना दिसत नाहीत. उलट त्या वाढत असून मुंबईत महिला अत्याचाराच्या एका वर्षात सहा हजार 133 घटना झाल्या 614 अल्पवयीन मुली आणि 984 महिला विकृत वासनेच्या शिकार झाल्या आहेत. 1598 पैकी 912 गुन्हे केवळ उघडकीस आलेत 686 प्रकरणात तर अद्यापही आरोपी सापडलेले नाहीत. 117 बेपत्ता मुली अद्यापही पोलिसांना सापडलेल्या नाहीत. शाळेतल्या मुलींवर ही अत्याचार होत आहेत. महिलांवर अत्याचार होत आहेत. शक्ति कायद्याला अजूनही केंद्राची मान्यता मिळालेली नाही, ती ताबडतोब मिळवून महिलांचे संरक्षण करावे, अशी त्यांनी मागणी केली.

हेही वाचा : Eknath Shinde on Rahul Gandhi : राहुल गांधींविरोधातील आंदोलनावर मुख्यमंत्री शिंदेंचे मोठे वक्तव्य, म्हणाले, ' पंतप्रधानांचा अपमान हा...'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.