ETV Bharat / state

Aaditya Thackeray On CM : मुख्यमंत्री फक्त सुट्टी घालवण्यासाठी विदेश दौऱ्यावर; आदित्य ठाकरेंची टीका

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2023, 4:49 PM IST

Aaditya Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा जर्मनी, इंग्लंड दौरा रद्द केल्यानंतर त्या पाठोपाठ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुद्धा त्यांचा घाणा हा दौरा रद्द केला आहे. एकंदरीत सरकारचे होणारे परदेश दौरे यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. मातोश्री या आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Aaditya Thackeray On CM
Aaditya Thackeray On CM

मुंबई Aaditya Thackeray : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (उबाठा) आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीय. या संदर्भात आमदार आदित्य ठाकरे यांनी 'X' या सोशल मिडिया साईटवर ट्विट केलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, "तुम्ही पाहिलंच असेल, गेल्या आठवड्यात दोन महत्त्वाच्या भेटी झाल्या. त्या महत्त्वाच्या भेटी नव्हत्या, फक्त एक महत्त्वाची व्यक्ती टाईमपाससाठी विदेशात जाणार होती. आमचे बेकायदेशीर मुख्यमंत्री जर्मनी, लंडनला जाणार होते, पण मी ट्विट करून भेटीचं वेळापत्रक विचारलं. त्यानंतर हा दौरा 30 मिनिटातच रद्द करण्यात आलाय. मुख्यमंत्री फक्त सुट्टी घालवण्यासाठी विदेश दौऱ्यावर जात होते, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलाय. सुट्टीसाठी जायचं असेल तर स्वतःच्या पैशावर विदेश दौऱ्यावर जावं असा टोला देखील त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावलाय.

  • Foreign trips are in fashion for illegal regime in Maharashtra.
    Spending public money, no outcomes for state has been the norm for these holidays of ministers & officials in Mindhe-BJP Regime of Maharashtra.

    On asking questions, the illegal cm and the speaker have cancelled…

    — Aaditya Thackeray (@AUThackeray) September 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

परदेश दौऱ्यातून काय साध्य होणार : राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. त्यातच सरकारचे परदेश दौरे मोठ्या प्रमाणात वाढले, असून या दौऱ्यावरून विरोधक त्यांच्यावर सातत्यानं टीका करत आहेत. याप्रसंगी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, सरकारच्या परदेश दौऱ्यातून काय साध्य होणार आहे. जनतेच्या पैशावर सरकारचे विदेश दौरे सुरू असून जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे. वास्तविक हे घटनाबाह्य, संविधान विरोधी सरकार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परदेश दौऱ्यावर जाऊन काय करणार होते? याबाबत मी ट्विट केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा परदेश दौरा रद्द केला, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

देशात लोकशाही आहे का : दुसरीकडं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचा साऊथ आफ्रिकेतील घाणा येथील दौराही रद्द केला आहे. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्रात लोकशाही मारत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतरही आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्यास विलंब करत आहेत. वास्तविक सर्वोच्च न्यायालयानं मे महिन्यात निकाल दिल्यानंतर त्यांनी 4 महिने होऊनही निकाल लांबणीवर ठेवला. अजूनही हा निकाल कधी लागेल याबाबत स्पष्टता नाही. देशात लोकशाही आहे की नाही? असा सवाल देखील ठाकरे यांनी उपस्थित केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या परदेश दौऱ्याला काही महत्त्व नव्हते. त्याला कुठल्याही पद्धतीचा अजेंडा नसल्यानं हे दौरे त्यांना रद्द करावे लागले, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.

उद्योग मंत्र्यांचा दाओस दौरा कशासाठी : आदित्य ठाकरे पुढे म्हणाले आहेत की, येत्या ३ ऑक्टोंबरपासून उद्योग मंत्री उदय सामंत हे दाओसचा दौरा करणार असून तिकडच्या ताजमहल हॉटेलमध्ये त्यांचं वास्तव्य असणार आहे. याप्रसंगी तिथे राऊंड टेबल कॉन्फरन्स होणार आहे. पण ती कशासाठी होणार आहे?, त्याची काहीही माहिती नाही. तिथं कोण भेटणार आहे, काय करणार आहेत याबाबत स्पष्टता नाही. कुठल्या कंपन्यांशी तुम्ही करार करणार याची माहिती जनतेला हवी आहे. काही सामंजस्य करार आहेत का.

सरकार जनतेशी खोटं बोलतय : जी वाघनखे आपण इंग्लंडहून भारतात आणणार आहोत. ती वाघनखं महाराजांनी वापरली आहेत की, नाही याबाबत स्पष्टीकरण नाही. तुम्ही काहीही करा, परंतु ही वाघनखे नक्की भारतात आली पाहिजेत. याबाबत जो शासन आदेश निघाला आहे, यात लिहिलं आहे की, व्हिक्टोरिया अल्बर्ट म्यूझियम भारताला तीन वर्षाच्या करारावर जनतेच्या दर्शनासाठी वाघनखं देणार आहे. परंतु हे लोन आहे की परतावा आहे, याबाबत स्पष्टता नाही. सरकार जनतेशी खोटं बोलत आहे. त्यानंतर 4 तारखेला उद्योगमंत्री आर्टिफिशियल इंटेलिजन्स पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत. तसंच हा दौरा उद्योगमंत्र्यांनी केला, तर मी रत्नागिरीत जाऊन जनतेला उद्योगमंत्र्यांचा हा दौरा योग्य की अयोग्य असा प्रश्न विचारणार आहे, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

10 दिवसांचा परदेश दौरा रद्द : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नियोजित विदेश दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. एकनाथ शिंदे 1 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबरला प्रस्तावित ब्रिटन, जर्मनी दौऱ्यावर जाणार होते. मुख्यमंत्री कार्यालयानं (सीएमओ)च्या अधिकाऱ्यांनी याबाबत मंगळवारी माहिती दिली होती. नवीन तारखा ठरवल्या जात असल्याचंही अधिकाऱ्यानं सांगितलं होतं. यावेळी दौरा पुढे ढकलण्याचं कोणतंही कारण सांगण्यात आलं नाही. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह काही अधिकारीही शिंदे यांच्यासोबत परदेश दौऱ्यावर जाणार होते. पण इंग्लंड, जर्मनीचा 10 दिवसांचा परदेश दौरा रद्द करण्यात आला आहे.

हेही वाचा -

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.