ETV Bharat / state

Covid Scam : मुंबई कोविड घोटाळा ४ हजार ९०० कोटींच्या घरात - किरीट सोमय्या

author img

By

Published : Jul 13, 2023, 10:54 PM IST

Covid Scam
Covid Scam

मुंबई महानगरपालिकेतील कोविड घोटाळा आता ४ हजार ९०० कोटींच्या घरात गेला आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर यांच्या लाईफ लाईन कंपनीचा तपास सध्या सुरू आहे. या प्रकरणी आज पोलिसांना ४५० पानांची अतिरिक्त कागदपत्रे दिली, अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. ते आज मुंबईत बोलत होते.

किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया

मुंबई : कोविड काळात मुंबई महापालिकेतील मोठा घोटाळा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उघड केल्यानंतर ते सतत पाठपुरावा करत आहेत. आज त्यांनी मुंबईतील आझाद मैदान पोलीस स्टेशनला भेट देऊन घोटाळ्याशी संबंधित 450 पानांची कागदपत्रे सादर केली. हा घोटाळा आता ४ हजार ९०० कोटींच्या घरात गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुख्य म्हणजे मुंबई महापालिकेच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प घोटाळ्याची चौकशी तत्कालीन मंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांनी पुरावे पुढे आणल्यानंतरही झालेली नाही. याचे आपल्याला आश्चर्य वाटत असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.

महागड्या किमतीत औषधे खरेदी : कोविड सेंटर बांधण्यासाठी ४०० कोटींचे कंत्राट देण्यात आले. त्यानंतर कोविड सेंटर भाडे दरमहा भरावे लागले. बॉडी बॅगपासून ते क्वारंटाइन सेंटर, आरटीपीसीआर चाचण्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीत प्रचंड भ्रष्टाचार आहे. मनपा अधिकारी आणि पक्षाच्या काही नेत्यांनी स्वतःच्या कंपन्या काढून त्याच कंपन्यांना कोविड सेंटरचे कंत्राट दिले. त्यासोबतच कोरोनाच्या काळात महागड्या किमतीत औषधे खरेदी करण्यात आली. त्या सर्व गोष्टींची चौकशी करून दोषींवर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा अद्याप कारवाई का करत नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

नेत्यांच्या चौकशा थांबतील का? : महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे भ्रष्टाचार उघड करणारे किरीट सोमय्या अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. किरीट सोमय्या यांनी अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. मात्र आता राष्ट्रवादीचे नेते सत्तेस सहभागी झाल्याने किरीट सोमय्या शांत झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

चौकशीवर प्रश्नचिन्ह : याबाबत किरीट सोमय्या यांना विचारले असता, ते म्हणाले की, सर्व आरोप न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालय त्यांच्यावर कारवाई करणार आहे.मात्र, भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नेते भाजपमध्ये गेल्यावर त्यांच्यावरील भ्रष्टाचाराचा डाग दूर होतो, असा आरोप अजित पवारांनी यापूर्वीही अनेकदा केला आहे. आता अजित पवारच भाजपमध्ये गेल्याने ईडी, सीबीआय, आयकर मार्फत त्यांची चौकशी बंद होणार? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा - Maharashtra Cabinet Expansion : खातेवाटपासाठी जोर; विस्तार रखडणार?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.