कोल्हापूर : एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे सामसूम झाले आहे, शिवाय उन्हाचा तडाखा सुद्धा वाढल्याने याचा फटका वन्यप्राण्यांनाही बसत असून ते नागरी वस्तीत प्रवेश करीत आहेत. हातकणलंगले तालुक्यातील भादोलेमधील जय शिवराय किसान संघटनेच्या शिवाजीराव माने यांच्या घरामध्ये सुद्धा रखरखत्या उन्हामधून 10 ते 12 माकडं खाण्याच्या शोधात आली होती. विशेष म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा माने यांच्या घरामध्ये हीच माकडं आली होती. आपल्या घरामध्ये खाण्याच्या शोधात आलेल्या माकडांना खायला देण्याचा आनंद वेगळाच असतो, असे म्हणत त्यांनी सर्वांना भुईमुगाच्या शेंगा खायला दिल्या. शिवाय माकडांसोबत 'ही दोस्ती तुटायची नाही' म्हणत व्हिडिओ सुद्धा बनवला.
गेल्या वर्षीसुद्धा माने यांच्या घराच्या गच्चीमध्ये 7 ते 8 माकडं अचानक खाण्याच्या शोधात आली होती. शिवाजी माने यांनी लगेचच आपल्या हातातील शेंगांचे ताट त्या माकडांसमोर ठेवले. बघता बघता त्यांनी त्या शेंगा संपवल्या. जिल्ह्यात अनेक ठिकाणी माकडं खाण्याच्या आणि पाण्याच्या शोधात लोकवस्तीत प्रवेश करताना आढळली आहेत. मात्र 'याच' घरात आपल्याला खायला मिळू शकेल हा विचार करून यावर्षी सुद्धा मोठ्या संख्येने माकडं माने यांच्या घराच्या दारात आली. माने यांनी तत्काळ घरातील शिजवलेले अन्न न देता भुईमुगाच्या शेंगा आणून त्यांना खायला घातल्या. शिवाय त्यांच्यासोबत व्हिडिओसुद्धा बनवला.
पशु, पक्षांना पाण्याची खायची सोय करावी
उन्हाळ्यात पशु-पक्षी पाण्याच्या खाण्याच्या शोधत सर्वत्र भटकत असतात. त्यामुळे सर्वांनीच शक्य त्या पद्धतीने त्यांना खाण्याची आणि पाण्याची सोय करायला हवी. अनेक निसर्गप्रेमी तसेच प्राणीमित्र विविध उपक्रमांतुन शक्य ते प्रयत्न करत असतात. त्यामुळे प्रत्येकाने आपली सुद्धा एक नैतिक जबाबदारी समजून पशु पक्षांच्या खाण्याची सोय करणे गरजेचे आहे.