ETV Bharat / state

Ambabai Temple Kolhapur : श्री अंबाबाई मंदिरातील दानपेट्या उघडल्या; कोरोना काळातही भक्तांनी दिलं भरभरून दान

author img

By

Published : Jan 15, 2022, 9:29 AM IST

Updated : Jan 15, 2022, 12:44 PM IST

Ambabai Temple Kolhapur
Ambabai Temple Kolhapur

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील दानपेट्या भरल्यामुळे उघडण्यात आल्या. 4 दिवसानंतर काल संध्याकाळी 9 पेट्यांमधील देणगीचे मोजकाम पूर्ण झाले. त्यातून तब्बल 1 कोटी 60 लाख 64 हजार 643 रुपये गोळा झाले असल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडी यांनी सांगितले आहे.

कोल्हापूर - शहरासह राज्यातील अनेक भाविक कोल्हापुरात दररोज येत असतात. त्यांच्याकडून श्रध्देने आणि सेवेकरिता अशा विविध कारणासाठी मंदिरातील दक्षिणा पेटीत भरभरून दान ( Donation in Ambabai Temple ) करण्यात येते. गेल्या मंगळवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील ( Shree Ambabai Temple Kolhapur ) दानपेट्या भरल्यामुळे उघडण्यात आल्या होत्या. या दानपेट्यातील रोख रक्कम आणि सोने, चांदी मोजण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र 4 दिवसानंतर काल संध्याकाळी 9 पेट्यांमधील देणगीचे मोजकाम पूर्ण झाले. त्यातून तब्बल 1 कोटी 60 लाख 64 हजार 643 रुपये गोळा झाले असल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडी यांनी सांगितले आहे. या दान पेटीमध्ये दहा, वीस, पन्नास आणि शंभर रुपयाच्या नोटांचे प्रमाण जास्त होते. तसेच 1 रुपये, 2 रुपये व 5 रुपयांची नाणी देखील भरपूर प्रमाणात सापडल्या आहेत. मंदिर प्रशासनाचे 40 कर्मचारी आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 3 कर्मचाऱ्यांनी या नोटा मोजून बंडल करून ठेवले. अंबाबाई मंदिर आणि परिसरात एकूण 12 ते 15 दानपेट्या आहेत. यातील दर्शन रांगेतील दानपेट्या उघडण्यात आल्या होत्या.

श्री अंबाबाई मंदिरातील दानपेट्या उघडल्या

निर्बंध कडक; मात्र दान पेटी फुल्ल -

कोरोना संसर्गात काही महिने मंदिर बंद होते. मात्र संसर्ग कमी झाल्यानंतर शासनाने काही निर्बंध घालत राज्यातील मंदिराची दारे पुन्हा भक्तांसाठी उघडली. त्याप्रमाणे कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी ई पास द्वारे दर्शनासह नियमावलीनुसार भक्तास दर्शनासाठी सोडण्यात येत आहे. मात्र भक्तांना आई अंबाबाईच्या दर्शनाला मंदिरात जाताना ओटी, साडी, नारळ अश्या अनेक वस्तू मंदिरात घेऊन जाण्यावर बंदी घालण्यात आली. यामुळे भक्त दर्शन घेत असताना भक्ती म्हणून दान पेटीमध्ये पैसे टाकू लागले. दिवाळीच्या अगोदरच उघडण्यात आलेले दक्षिण पेटी ही दिवाळी आणि ख्रिसमसच्या काळात आलेल्या पर्यटक आणि भाविकांनी भरभरून देणगी टाकत सर्व पेट्या नोटांनी भरून टाकल्या. काही पेटीमधून नोटा बाहेर येऊ लागल्याने त्यावर चिकटपट्टी लावून झाकले असल्याचे नाईकवडी यांनी सांगितले.

9 पेट्यांमधून 1 कोटी 60 लाख रुपये जमा -

पेट्या भरल्याने दर्शन रांगेतील या सर्व पेट्या उघडून पैसे वेगवेगळे करून मोजण्याचे काम मंगळवारी हाती घेण्यात आले. ११ जानेवारी ते १४ जानेवारी पर्यंत ९ पेट्यांमधून मिळालेली रक्कम ही अंदाजे 1 कोटी 60 लाख 64 हजार 643 रुपये इतकी आहे. ही सर्व रक्कम सीसीटीव्हीच्या निगराणीखाली मंदिरातील गरुड मंडपात मोजण्यात आली. देवस्थान समितीतील 40 कर्मचारी, मंदिरातील सुरक्षा रक्षक, स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) 3 कर्मचाऱ्यांकडून नोटांची छाननी करून मशीनद्वारे मोजणी करण्यात आली. यामध्ये काही परदेशी चलन देखील मिळाले आहे. तर काही भक्तांनी दान पेटीत सोने चांदी देखील टाकले आहेत. हे सर्व सोनं-चांदी वेगवेगळे करून त्याची शुद्धता तपासून त्याची देखील वजन आणि आकडेवारी काढण्याचे काम सुरू असल्याचे शिवराज नाईकवाडी यांनी सांगितले आहे.

कोल्हापूरकडे पर्यटकांचा वाढता कल -

गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर जिल्हा पर्यटनाच्यादृष्टीने वाटचाल सुरू आहे. कारण कोल्हापूर जिल्ह्यात अनेक पर्यटन क्षेत्र आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने श्री अंबाबाई मंदिर, ज्योतिबा मंदिर, रंकाळा, न्यू पॅलेस, खिद्रापूर, नृसिंहवाडीचे दत्त मंदिर, किल्ले भुदरगड, किल्ले पन्हाळा, किल्ले पारगड, दाजीपूर अभयारण्य, राधानगरी अभयारण्य यासारख्या ठिकाणी पर्यटक भेट देण्यासाठी आणि सुट्टी एन्जॉय करण्यासाठी येत आहेत. यामुळे येथील स्थानिक लोकांना रोजगार देखील मिळत आहे आणि मंदिरांमध्ये देणगी देखील वाढले आहे. अनेक पर्यटक सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी गणपतीपुळे आणि गोवा राज्यात जाण्यासाठी कोल्हापूर मार्गेजाणे पसंत करतात. यामुळे कोल्हापुरात आले की श्री अंबाबाई मंदिरात थांबून दर्शन घेऊनच पुढे जाणे पसंत करत आहेत.

Last Updated :Jan 15, 2022, 12:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.