ETV Bharat / state

राधानगरी धरणावर थाटात शाहू जयंती साजरी; समरजितसिंह घाटगे म्हणाले....

author img

By

Published : Jun 26, 2021, 7:54 PM IST

Shahu descendant Samarjit Singh Ghatge
राधानगरी धरणावर शाहू जयंती बातमी

आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती आज देशभरात उत्साहात साजरी झाली. मात्र, यावर्षी पहिल्यांदाच शाहूंच्या कार्याचे जिवंत स्मारक समजल्या जाणाऱ्या राधानगरी धरणावर शाहू जयंती साजरी झाली.

कोल्हापूर - आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती आज देशभरात उत्साहात साजरी झाली. मात्र, यावर्षी पहिल्यांदाच शाहूंच्या कार्याचे जिवंत स्मारक समजल्या जाणाऱ्या राधानगरी धरणावर शाहू जयंती साजरी झाली. यावेळी राधानगरी धरणातील पाण्याचे जलपूजन आणि याच पाण्याने शाहूंच्या पुतळ्याला जलाभिषेक करण्यात आला. यावेळी अठरापगड जातीचे नागरिकसुद्धा उपस्थित होते. यावेळी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने शाहू जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे यांच्याशी चर्चा केली.

समरजितसिंह घाटगे यांच्याशी चर्चा करताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हेही वाचा - परवानगी नाकारली तरी राधानगरी धरणावर शाहू जयंती साजरी करणार - समरजित घाटगे

राधानगरी धरणावर शाहू जयंती साजरी करण्यासाठी ऐनवेळी परवानगी नाकारण्यात आली होती. शिवाय गुन्हे दाखल करू, अशाप्रकारे नोटीस सुद्धा देण्यात आली होती. याबाबत बोलताना शाहू जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे यांनी, शाहू जयंती होऊ नये आणि बहुजन समाज एकत्र येऊ नये, यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांना भविष्यात बहुजन समाजच उत्तर देईल, असे म्हंटले.

राधानगरी धरणावर विधिवत पद्धतीने साजरी झाली शाहू जयंती

राधानगरी धरण बांधून तब्बल 100 वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न ज्यांनी मार्गी लावला, त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती जिल्ह्यातच नाही तर देशभरात साजरी होते. मात्र, शाहू महाराज यांना ज्या कागलमधील घाटगे घरण्यातून दत्तक घेतले गेले त्या घाटगे घराण्याचे वारसदार समरजितसिंह घाटगे यांची राजर्षी शाहूंची जयंती राधानगरी धरणावरच साजरी व्हावी, अशी इच्छा होती. याबाबत त्यांना एका धनगर समाजातील व्यक्तीने सुद्धा बोलून दाखवले होते. खरंतर राधानगरी धरण म्हणजे शाहू महाराजांचे जिवंत स्मारक समजले जाते. शाहू महाराजांनी हे धरण बांधून कोल्हापूर जिल्ह्याचा पाणीप्रश्न मिटवला. शिवाय बहुजन समाजासाठी त्यांनी अनेक कार्य केले. त्यामुळे, शाहू महाराजांचे स्मरण करण्यासाठी त्यांचे कार्य सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी समरजितसिंह घाटगे यांनी इथून पुढे शाहू महाराजांची जयंती राधानगरी धरणावर साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज राधानगरी धरणावर विधिवत पद्धतीने, धरणातील जलपूजन आणि धरणामधील पाण्याने शाहूंच्या पुतळ्याला जलाभिषेक करून हा जन्मोत्सव सोहळा पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला असून यापुढे या सोहळ्याला अधिक व्यापक रूप प्राप्त होईल आणि सर्वजण यामध्ये सहभागी होतील, असेही घाटगे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हंटले.

शाहू जयंती होऊ नये यासाठी प्रयत्न करणे म्हणजे घातकी विषय

राजकारण होत राहील, ते राजकारणाच्या ठिकाणी योग्य आहे. मात्र, राजर्षी शाहू महाराजांचे नाव घेऊन आपण राजकारण करतो त्याच शाहूंच्या राधानगरी धरणावर जयंती साजरी होऊ नये, इथे बहुजन समाज एकत्र येऊ नये यासाठी प्रयत्न करणे हे म्हणजे खूपच घातक असल्याचे समरजितसिंह घाटगे यांनी म्हंटले. शिवाय ज्यांनी कोणी शाहू जयंती साजरी होऊ नये यासाठी प्रयत्न केले त्यांना हाच बहुजन समाज भविष्यात उत्तर देईल, असेही त्यांनी म्हंटले.

राधानगरी धरण येथे शाहू जयंती साजरी करण्यासाठी ऐनवेळी परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, कोणत्याही परिस्थितीत आम्ही शाहूंची जयंती साजरी करू या निर्णयावर समरजितसिंह घाटगे ठाम होते. शिवाय ज्यांना कोणाला आडवायचे आहे त्यांनी अडवून दाखवा, असे आव्हान दिले होते. त्यानुसार त्यांनी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत राधानगरी धरणावर जयंती साजरी केली.

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते शाहूंच्या प्रतिमेचे पूजन

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची 147 वी जयंती आज मोठ्या उत्साहात पार पडली. कसबा बावडा येथील शाहू जन्म स्थळ येथे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी खासदार संभाजी राजे छत्रपति यांची उपस्थिती होती. राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. राज्य सरकारच्या हातात ज्या गोष्टी आहेत त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता मराठा आरक्षणाबाबत केंद्राने पावले उचलावीत, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

आरक्षणाबाबत राज्य सरकार सकारात्मक

पालकमंत्री सतेज पाटील यांनी शाहू जयंतीच्या शुभेच्छा देत मराठा आरक्षणाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. मराठा आरक्षणाचा चेंडू आता केंद्राच्या हातात आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. राज्यसरकारच्या हातात ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी मार्गी लावण्याचे काम राज्य सरकार करत आहे. आता केंद्र सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

हेही वाचा - कोरोनाचे नियम पायदळी तुडवत भाजपाचे आंदोलन, चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारवर घणाघात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.