ETV Bharat / state

नवरात्रोत्सव पाचवा दिवस : ललित पंचमीनिमित्त अंबाबाईची आज 'गजारूढ' स्वरुपात पूजा

author img

By

Published : Oct 21, 2020, 6:26 PM IST

अंबाबाई
अंबाबाई

आज नवरात्रोत्सवाचा पाचवा दिवस. या ललित पंचमीनिमीत्त करवीर निवासिनी अंबाबाईची गजारूढ स्वरुपात पूजा बांधण्यात आली आहे.

कोल्हापूर - शारदीय नवरात्रोत्सवाच्या आजच्या पाचव्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईची गजारूढ स्वरुपात पूजा बांधण्यात आली. ललित पंचमीनिमित्त अंबाबाई तिची प्रिय सखी त्र्यंबोली देवीला भेटायला जाते, अशी आख्यायिका आहे. याच पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी आई अंबाबाईची हत्तीवर अंबारीमध्ये बसलेल्या स्वरुपातील विशेष पूजा बांधण्यात येते.

अंबाबाईची 'गजारूढ' स्वरुपात पूजा

या परंपरेबाबत अधिक माहिती अशी की, आज अश्विन शुद्ध पंचमी म्हणजेच करवीर निवासिनी अंबाबाईने कोल्हासुराचा वध केला ती ही तिथी. कोल्हासुराने मरताना वर मागितला की, त्याच्या वधाची स्मृती म्हणून दरवर्षी कोहळा फोडला जावा. त्याला दिलेल्या वराप्रमाणे अंबाबाई दरवर्षी कोहळ्याचा बळी आपल्या मंदिरात देत असे. कोल्हासुराचा नातू कामाक्ष याने तप करून कपिलमुनींकडून योगदंड मिळवला होता. त्याच्या प्रभावाने त्याने हा सोहळा करण्यासाठी जमलेल्या सर्व देवांचे बकरीमध्ये रुपांतर केले. त्र्यंबुलीन स्वचातुर्यान कामाक्षाचा वध केला, देवांची मुक्तता केली. पण या आनंदात देव त्र्यंबोलीला विसरले. तेव्हा महालक्ष्मी तिची समजूत घालायला तिच्या दारी गेली आणि प्रेमाने तिची समजूत घातली. शिवाय कोहळा बळीचा मान दिला. त्या वराप्रमाणे अंबाबाई हत्तीवर बसून त्र्यंबोलीच्या भेटीला जाते. याच आख्यायिकेप्रमाणे आजची अंबाबाईची 'गजारूढ' स्वरुपात पूजा बांधण्यात आली आहे.

दरवर्षी संपूर्ण देशभरातील भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी आणि नवरात्रोत्सव काळात विविध रुपांमधील पूजा पाहण्यासाठी येत असतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरांमध्ये भक्तांना प्रवेश नाही. त्यामुळे, भाविकांना ऑनलाइन माध्यमातूनच देवीचे हे देखणे रूप आपल्या डोळ्यात साठवावे लागत आहे.

हेही वाचा - नवरात्रौत्सवाच्या चौथ्या दिवशी अंबाबाईची 'ओमकाररुपिणी' स्वरुपात पूजा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.