ETV Bharat / state

Kolhapur Love Story: वयाच्या सत्तरीत जुळले मन, अन् थाटात झालं लग्न; शिरोळ तालुक्यातील प्रेम कहाणी

author img

By

Published : Feb 26, 2023, 9:26 AM IST

प्रेम ही अशी गोष्ट आहे की ते कोणावरही, कधीही आणि कुठेही होऊ शकते. कोल्हापूरात याचाच प्रत्यय आला आहे. येथील शिरोळ तालुक्यातील 70 वर्षांच्या एका वृद्धाने त्याच वयाच्या एका वृद्ध महिलेशी लग्न केले आहे. अगदी थाटात हा विवाहसोहळा पार पडला आहे. संपूर्ण जिल्ह्यात या वृद्धांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. कुठे घडली ही घटना? आणि काय आहे नेमकी यामागची कहानी? जाणून घेण्यासाठी ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट वाचा.

Kolhapur Special News
शिरोळ तालुक्यातील प्रेम कहाणी

शिरोळ तालुक्यातील प्रेम कहाणी

कोल्हापूर : कोल्हापूरात झालेल्या 70 वर्षाच्या वृद्धांच्या विवाहसोहळ्याची चर्चा सर्वत्र आहे. त्याचे झाले असे की, येथील शिरोळ तालुक्यातील घोसरवाड मधील जानकी वृद्धाश्रमात अनुसया शिंदे (वय 70, रा. वाघोली, जि. पुणे) आणि बाबूराव पाटील (वय 75, रा. शिवनाकवाडी, ता. शिरोळ) हे दोघेही राहत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ते या ठिकाणी आपल्या आयुष्यातील उरलेले क्षण आनंदात जगत आहेत. दोघांचेही जोडीदाराचे निधन झाल्यानंतर ते याच वृद्धाश्रमात राहत आहेत. याच दरम्यान, दोघांची एकमेकांच्या नजरेला नजर भिडली, एकमेकांशी ओळख झाली अन् या वयात सुद्धा आपण पुढे जाऊन लग्न करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी अगदी धुमधडाक्यात या दोघांचा विवाह पार पडला आहे.



धुमधडाक्यात लग्न लावून दिले : दरम्यान, वृध्दापकाळात नातेवाईक वाऱ्यावर सोडले की, आपल्या आयुष्यातील साथीदार एकमेकांना धीर देत कसेबसे जीवन जगत असतात. मात्र साथीदारालाही दैवाने हिरावून घेतले तर वृध्दाश्रमाशिवाय पर्याय उरत नाही. घोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रमातील अशाच दोन समदुःखी वृद्ध वयाच्या सत्तरीत विवाह बंधनात अडकले आहेत. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वृध्दाश्रम चालक बाबासाहेब पुजारी यांनी कायदेशीर बाबींची पूर्तता करून धुमधडाक्यात लग्न लावून दिले. या वेगळ्या लग्नाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.

वृध्द जोडप्याचे लग्न : दोघेही स्वावलंबी असले तरी मानसिकदृष्ट्या खचलेले होते. दोघांचेही साथीदारांचे निधन झाले. त्यामुळे या समदुःखी वृध्दांनी एकमेकांच्या आयुष्यातील दुःखाचा पाढा वाचून मन मोकळे करता करता दोन्ही मने जुळली. लग्नाच्या बंधनातून एकत्र येण्याचा निर्णय घेतला. दोघांचीही तयारी असल्याने व कायदेशीर सल्ला घेवून वृध्दाश्रमातच मांडव घातला गेला. ग्रामस्थ व प्रमुख लोकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पद्धतीने थाटात लग्न लावून देत वृद्धांची इच्छा पूर्ण केली. त्यामुळे या वृध्द जोडप्याचे लग्न खूपच चर्चेची ठरली आहे.



फक्त सोबत हवी : या लग्नात जात, धर्म नाही की कुंडली नाही. शरीर सुखाची आस नाही की, कोणत्याही संपत्ती, हुंड्याची आशा नाही. उर्वरित आयुष्यात सुखदुःखात सहभागी होवून एकमेकांना मायेचा आधार असावा इतकीच माफक अपेक्षा या वृध्द जोडप्यानी व्यक्त केली आहे. प्रेमाला कशाचेही बंधने नसतात. ती एक पवित्र भावना आहे. या वृद्ध जोडप्याने लग्न करून तरूण युवकांसमोर आपला एक आगळा वेगळा आदर्श उभा केला आहे. प्रेमाला वयाची सीमा नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

हेही वाचा : Today horoscope : या' राशींचे लोक प्रतिस्पर्ध्यांवर करतील विजय प्राप्त; वाचा आजचे राशीभविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.