ETV Bharat / state

स्वाभिमानीची ऊस परिषद आज, राजू शेट्टींचा आवाज ऑनलाइन घुमणार

author img

By

Published : Nov 2, 2020, 11:50 AM IST

Updated : Nov 2, 2020, 12:34 PM IST

raju shetty
ऑनलाईन ऊस परिषद

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज ऊस परिषद होत आहे. दुपारी दोन वाजता जयसिंगपूर येथील कल्पवृक्ष गार्डन येथून ही ऊस परिषद ऑनलाइन पार पडणार आहे. राज्यातील अनेक करखान्यांनी थकीत एफआरपी शेतकऱ्यांना दिली नाही. त्यामुळे जे कारखाने थकीत एफआरपी देणार नाहीत ते कारखानेसुद्धा सुरू होऊ देणार नसल्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज ऊस परिषद होत आहे. जयसिंगपूर येथील कल्पवृक्ष गार्डन येथून ही ऊस परिषद ऑनलाइन पार पडणार आहे. राज्यातील सर्वच प्रमुख पदाधिकारी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. राजू शेट्टी परिषदेत नेमकी काय भूमिका घेतात याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.
पहिल्यांदाच ऑनलाईन ऊस परिषद
गेल्या 18 वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद जयसिंगपूर येथील भव्य पटांगणावर होत आली आहे. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने स्वाभिमानीला ही परिषद घ्यावी लागत आहे. दरवर्षी एकरकमी एफआरपीसाठी शेतकऱ्यांना भांडावे लागते. त्या पद्धतीचा कायदा असून देखील अनेक कारखानदार एफआरपीचे तुकडे करून शेतकऱ्यांना देतात. मात्र यंदा कोल्हापुरातील सर्वच कारखानादार आणि स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक पार पडली. यामध्ये कारखानदार एकरकमी एफआरपीसाठी तयार झाले आहेत. त्यामुळे यंदाच्या ऊस परिषदेत हा मुद्दा जास्त गाजणार नाही.
कोणत्या मागणीवर स्वाभिमानी ठाम असेल ?
दरवर्षी राजू शेट्टी परिषदेत काय मागणी करतात याकडे सर्वांचे लक्ष असते. यावर्षी सुद्धा परिषदेत नेमकी काय मागणी होते याकडे सर्वांचे लक्ष असून भविष्यात साखरेच्या दरावर अंतिम दर राहणार आहे. मात्र यंदा ऊसतोड मजुरीत 14 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्याला स्वाभिमानीने विरोध केला नाही. मात्र ही 14 टक्के रक्कम एफआरपीमधून न घेता साखर कारखान्यांनी द्यावी अशी स्वाभिमानीची भूमिका आहे. हाच यंदाच्या ऊस परिषदेचा मुख्य मुद्दा असणार आहे. शिवाय ऊस दराबाबतची पुढील दिशा सुद्धा या परिषदेत जाहीर केली जाणार आहे. जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत एकाही कारखान्याचे धुराडे पेटू देणार नसल्याचा इशारा सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
थकीत एफआरपी आधी द्या मगच कारखान्याचे धुराडे पेटवा-
राज्यातील अनेक करखान्यांनी अद्याप थकीत एफआरपी शेतकऱ्यांना दिली नाही. त्यामुळे जे कारखाने थकीत एफआरपी देणार नाहीत ते कारखाने सुद्धा सुरू होऊ देणार नसल्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
परिषदेची जोरदार तयारी -
यावर्षी पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने ऊस परिषद होत आहे. गेल्या 18 वर्षांपासून ही ऊस परिषद होत आहे. मात्र यंदा ऑनलाईन असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून याची जोरदार तयारी सुरू आहे. राज्यातील सर्वच प्रमुख पदाधिकारी या परिषदेला उपस्थित असणार आहेत.

Last Updated :Nov 2, 2020, 12:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.