ETV Bharat / state

जळगाव जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक अ‍ॅड. रवींद्र पाटलांचा राजीनामा

author img

By

Published : Aug 12, 2021, 9:08 PM IST

ज्येष्ठ संचालक अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे जिल्हा बँक पुन्हा एकदा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. बँकेतील 'राजकारण' तापल्याने नाराज झालेले अ‍ॅड. पाटील यांनी संचालक पदाचा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.

Jalgaon District Bank news
जळगाव जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक अ‍ॅड. रवींद्र पाटलांचा राजीनामा

जळगाव - जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील श्री संत मुक्ताई सहकारी साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाच्या माहितीसाठी ईडीने 'लेटर बॉम्ब' टाकल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत एकच खळबळ उडाली. ईडीच्या पत्राची चर्चा थांबत नाही, तोच बँकेचे ज्येष्ठ संचालक अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे जिल्हा बँक पुन्हा एकदा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. बँकेतील 'राजकारण' तापल्याने नाराज झालेले अ‍ॅड. पाटील यांनी संचालक पदाचा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.

प्रतिक्रिया

'हे' आहे राजीनाम्याचे प्रमुख कारण -

बँकेचे ज्येष्ठ संचालक असलेले अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी काल (बुधवारी) आपल्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षही आहेत. जिल्हा बँकेने मुक्ताईनगर येथील श्री संत मुक्ताई संस्थानला दिलेल्या कर्जाच्या सेटलमेंटच्या विषयाबाबत बँकेकडून कार्यवाही होत नसल्याने अ‍ॅड. पाटील हे नाराज होते. याच नाराजीतून त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. एकीकडे ईडीने जिल्हा बँकेला मुक्ताईनगर साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाच्या विषयाबाबत नोटीस बजावलेली असतानाच दुसरीकडे, ज्येष्ठ संचालक अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी राजीनामा दिल्याने जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मुक्ताई संस्थानच्या कर्जाच्या विषयावरून बिनसले -

अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी आपल्या संचालकपदाचा राजीनामा देण्यामागे मुक्ताईनगर येथील श्री संत मुक्ताई संस्थानला दिलेल्या कर्जाच्या सेटलमेंटचे कारण सांगितले जात आहे. या विषयासंदर्भात माहिती देताना अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले की, जिल्हा बँकेने मुक्ताई संस्थानला 1992 साली 85 लाख रुपयांचे कर्ज दिले होते. या कर्जाची मुक्ताई संस्थानने नियमित फेड केली होती. त्यानंतर 1998 मध्ये वन टाईम सेटलमेंट योजना आली. या योजनेत भाग घेऊनही संस्थानच्या कर्जासंदर्भात कार्यवाही झाली नाही. त्यानंतर 2003 मध्ये जिल्हा बँकेने ओटीएस योजनेत संस्थानच्या कर्जप्रकरणाची दखल घेतली. कर्ज नील झाल्याचा दाखलाही दिला. परंतु, त्यानंतरही 2006 मध्ये मुक्ताई संस्थान हे बँकेचे सभासद नसताना कर्ज संस्थानच्या नावावर टाकले. 2009 मध्ये बँकेने इतर संस्थांचे कर्ज 11 टक्क्यांनी माफ केले. परंतु, मुक्ताई संस्थानचे कर्ज माफ केले नाही. 2014-15 मध्ये काही संस्था निर्लेखित केल्या. पण तेव्हाही मुक्ताई संस्थानला दिलासा मिळाला नाही. ठराव करूनही कर्ज प्रकरणाची नोंद घेतली नाही, असेही अ‍ॅड. पाटील म्हणाले. याच नाराजीतून त्यांनी राजीनामा दिला आहे.

पाटील परिवाराचे बँकेसाठी मोठे योगदान -

अ‍ॅड. रवींद्र पाटील यांच्या परिवाराचे जिल्हा बँकेसाठी मोठे योगदान राहिले आहे. ते स्वतः बँकेचे ज्येष्ठ संचालक आहेत. त्यांचे वडीलही बँकेचे ज्येष्ठ संचालक तसेच अध्यक्ष राहिले आहेत. शेतकरी आणि बँकेच्या हिताच्या दृष्टीने त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या काळात अनेक विधायक निर्णय घेतले. असे असताना आता अ‍ॅड. पाटील यांना संचालक पदाचा राजीनामा द्यावा लागल्याने बँकेच्या राजकारणाविषयी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

हेही वाचा - BREAKING : परमबीर सिंगांची चिंता वाढली, लुक आऊट नोटीस जारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.