ETV Bharat / state

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत 'बंद'चा परिणाम नाही; भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी गर्दी

author img

By

Published : Oct 11, 2021, 9:27 AM IST

Updated : Oct 11, 2021, 9:54 AM IST

Jalgaon maharashtra band news
Jalgaon maharashtra band news

लखीमपूर खेरीमध्ये आंदोलक शेतकर्‍यांवरील अत्याचाराचा निषेध म्हणून महाविकास आघाडी सरकारने आज (सोमवारी) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. भाजप वगळता काही संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. जळगावात मात्र, सकाळच्या सत्रात बंदचा कोणत्याही प्रकारचा परिणाम नसल्याचे पाहायला मिळत आहे.

जळगाव - उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीमध्ये आंदोलक शेतकर्‍यांवरील अत्याचाराचा निषेध म्हणून महाविकास आघाडी सरकारने आज (सोमवारी) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. भाजप वगळता काही संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. जळगावात मात्र, सकाळच्या सत्रात बंदचा कोणत्याही प्रकारचा परिणाम नसल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला खरेदी व विक्रीचे व्यवहार सुरळीतपणे सुरू आहेत. जिल्ह्यातील शेतकरी व व्यापाऱ्यांनी भाजीपाल्याच्या खरेदी-विक्रीसाठी मोठी गर्दी केली आहे.

व्यापारी महामंडळाचा बंदला विरोध -

जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाने महाविकास आघाडी सरकारच्यावतीने पुकारण्यात आलेल्या बंदला विरोध दर्शवला आहे. उत्तरप्रदेशात लखीमपूर खेरीमध्ये घडलेली आंदोलक शेतकर्‍यांवरील अत्याचाराची घटना निषेधार्थ आहे. व्यापारीवर्ग या घटनेचा निषेध करत आहे. पण अशा प्रकारे बंद करून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणे चुकीचे आहे. कोरोनामुळे आधीच व्यापारीवर्ग संकटात सापडला आहे. आता कुठे हळूहळू व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे एक दिवस जरी बाजारपेठ बंद राहिली तर व्यवहारांची साखळी विस्कळीत होते. त्यामुळे जे व्यापारी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होतील, त्यांनी सहभागी व्हावे. पण ज्यांचा बंदमध्ये सहभागी होण्यास नकार असेल, त्यांना नाहक त्रास देऊ नये, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांचाही बंदला विरोध -

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने आज पुकारलेल्या बंदला शेतकरीवर्गाचा विरोध असल्याचे पाहायला मिळाले. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला विक्री करण्यासाठी आलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी बंदला विरोध दर्शविणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या. आधीच शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात सापडला आहे. खरीप हंगाम हातून गेला आहे. अशा परिस्थितीत शेतात जो भाजीपाला आहे, तो विकून दोन पैसे आमच्या हाती येत आहेत. असा बंद करून पुन्हा आमच्या पोटावर का मारता? असा सवालही काही शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

'कृउबास'तील धान्य बाजार राहणार बंद -

शेतकरीवर्गाची गैरसोय होऊ नये, म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी भाजीपाला खरेदी-विक्री सुरू ठेवण्यात आलेली आहे. मात्र, दिवसभर सुरू राहणारा धान्य बाजार व तेथील संपूर्ण व्यवहार आजच्या बंदमुळे बंद ठेवण्यात येणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने सांगितले.

हेही वाचा - मोदीजी जगभर फिरतात, मात्र शेतकऱ्यांसाठी दिल्ली बॉर्डरपर्यंतही जात नाहीत; प्रियंका वाराणसीत गरजल्या

Last Updated :Oct 11, 2021, 9:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.