ETV Bharat / state

जळगावात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ; निर्बिजीकरणाकडे महापालिकेचे दुर्लक्ष

author img

By

Published : Aug 6, 2020, 3:18 PM IST

Updated : Aug 7, 2020, 2:28 PM IST

शहरातील सर्वच भागांमध्ये मोकाट कुत्र्यांच्या टोळक्यांचा धुमाकूळ सुरू आहे. मोकाट कुत्र्यांनी नागरिकांचे लचके तोडल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. शहरात दर आठवड्याला कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे 10 ते 15 नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडत आहेत. यामुळे रेबीजसारख्या गंभीर आजाराची लागण होण्याची देखील भीती निर्माण झाली आहे.

jalgaon-mnc-ignoring-issue-of-street-dogs-sterilization
जळगावात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ; निर्बिजीकरणाकडे महापालिकेचे दुर्लक्ष

जळगाव - शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ वाढला आहे. मोकाट कुत्रे दिवसाढवळ्या नागरिकांवर हल्ले करून लचके तोडत आहेत. असे असताना महापालिका प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना होत नसल्याने जळगावकर नागरिक दहशतीखाली वावरत आहेत. कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाकडे महापालिका प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष झाले आहे. कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणाऱ्या संस्थेने कामाचे बिल थकल्यामुळे कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे बंद केले आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण विषय असताना याबाबत सत्ताधारी आणि प्रशासनाला सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.

शहरातील सर्वच भागांमध्ये मोकाट कुत्र्यांच्या टोळक्यांचा धुमाकूळ सुरू आहे. मोकाट कुत्र्यांनी नागरिकांचे लचके तोडल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. शहरात दर आठवड्याला कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे 10 ते 15 नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडत आहेत. यामुळे रेबीजसारख्या गंभीर आजाराची लागण होण्याची देखील भीती निर्माण झाली आहे. मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढलेला आहे. याबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी केल्या जात आहेत. असे असताना डॉग व्हॅनद्वारे मोकाट कुत्र्यांना पकडून शहराबाहेर सोडून देण्याची कारवाई देखील अ‌‌‌‌ॅनिमल बोर्डच्या आदेशाने थांबविण्यात आली आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे हा एकमेव पर्याय महापालिका प्रशासनासमोर आहे. पण या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे.

बिल थकवल्याने निर्बिजीकरण रखडले-

मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण करून त्यांना अँटी रेबीज लस टोचून पुन्हा पूर्वीच्या ठिकाणी सोडणे, या कामासाठी महापालिका प्रशासनाने 2 वर्षांपूर्वी अंदाजपत्रकात दीड कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवली. परंतु, 2 वर्षांत निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नव्हता. गेल्या वर्षी देखील महापालिकेने 4 वेळा निविदा प्रक्रिया राबवली होती. अखेर अमरावती येथील मे. लक्ष्मी इन्स्टिट्यूट ऑफ अॅनिमल वेल्फेअर ही संस्था पुढे आली. निविदा प्रक्रियेत ही एकमेव संस्था असल्याने महापालिका प्रशासनाने या संस्थेला काम देण्यास सहमती दिली. ऑगस्ट 2019 मध्ये या संस्थेला कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचा ठेका देण्यात आला. त्यात एका कुत्र्यावर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यासाठी 1 हजार 25 रुपये संस्थेला मिळणार होते. ठेका घेतल्यानंतर नोव्हेंबर 2019 पासून संस्थेने कामाला सुरुवात केली. संस्थेने कामाला सुरुवात केली तेव्हा वर्षभरात सुमारे 16 हजार मोकाट कुत्र्यांवर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट संस्थेला देण्यात आले होते. मात्र, नोव्हेंबर 2019 ते मार्च 2020 या 4 महिन्यांच्या काळात या संस्थेने केवळ 2 हजार 200 कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले. त्यानंतर महापालिका प्रशासनाने कामाचे बिल थकवले. म्हणून संस्थेने आपले काम थांबवले. मार्च ते जुलैपर्यंत जळगावात कुत्र्यांचे निर्बिजीकरणाचे काम बंद होते. परंतु, महापालिकेने थकीत असलेल्या रकमेपैकी काही रक्कम अदा केल्याने 21 जुलैपासून पुन्हा काम सुरू केल्याचा दावा महापालिका स्थायी समिती सभापती अॅड. शुचिता हाडा यांनी 'ई- टीव्ही भारत'शी बोलताना केला. हाडा यांनी कुत्र्यांचे निर्बिजीकरणाचे काम सुरू असल्याचा दावा केला असला तरी शहरात कुठेही कुत्रे पकडण्याची कार्यवाही सुरू असल्याचे दिसून येत नाही.

कुत्र्यांचे निर्बिजीकरणात भ्रष्टाचाराचा संशय-

कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा संशय महापालिकेतील विरोधकांना आहे. वर्षभरापूर्वी दीड कोटी रुपयांचा ठेका कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी दिलेला असताना शहरात कुत्र्यांचा उच्छाद सुरू आहे. कामाचे बिल थकवल्याने काम बंद केल्याचे संस्था म्हणते, तर दुसरीकडे सत्ताधारी काम सुरू आहे, असे सांगतात. यात काहीतरी काळेबेरे आहे. या ठेक्याची आणि आतापर्यंत झालेल्या कामाचे लेखापरीक्षण करण्यात यावे, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. जळगावात दररोज कुठेतरी मोकाट कुत्र्यांनी नगरिकांना चावा घेतल्याची घटना घडते. मग खरोखर कुत्र्यांचे निर्बिजीकरणाचे काम सुरू आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. कुत्र्यांचे निर्बिजीकरणाचे काम दाखवून भ्रष्टाचार सुरू आहे, असा आरोप शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांनी 'ई- टीव्ही भारत'शी बोलताना केला.

आम्हाला अनेक अडचणी- संस्था

या विषयासंदर्भात, कुत्र्यांचे निर्बिजीकरणाचे काम करणाऱ्या लक्ष्मी इन्स्टिट्यूट ऑफ अॅनिमल वेल्फेअर या संस्थेशी संपर्क साधला असता संस्थेचे प्रमुख डॉ. उडाके म्हणाले, आम्हाला जळगावात काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मध्यंतरी महापालिका प्रशासनाने कामाचे बिल थकवले होते. मोकाट कुत्रे पकडण्यासाठी आम्ही प्रशिक्षित असलेले आसाम राज्यातील तरूण आणले आहेत. पैसे नसल्याने या तरुणांच्या राहण्या-खाण्याचा प्रश्न निर्माण झाला. आता महापालिकेने काही रक्कम अदा केल्यानंतर काम सुरू केले आहे. मात्र, सध्या कुत्र्यांचा ब्रिडींग सिझन सुरू आहे. या काळात मादी कुत्र्यांना पकडता येत नाही. त्यामुळे देखील कामाची गती मंदावली आहे. दुसरीकडे, कुत्रे पकडत असताना अनेकवेळा प्राणीमित्र असलेले नागरिक आमच्या कर्मचाऱ्यांशी वाद घालतात. कुत्रे पकडू देत नाहीत. अशा वेळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलवावे लागते, असेही डॉ. उडाके यांनी सांगितले.

जळगावात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ; निर्बिजीकरणाकडे महापालिकेचे दुर्लक्ष
Last Updated :Aug 7, 2020, 2:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.