ETV Bharat / state

बहुळा नदीच्या पुरात 4 घरे गेली वाहून; चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या साठवण बंधाऱ्यामुळे घडला प्रकार

author img

By

Published : Sep 19, 2020, 12:21 PM IST

बहुळा नदीवर चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या साठवण बंधाऱ्यामुळे पाचोरा तालुक्यातील चिंचपुरे गावातील चार घरे वाहून गेल्याची घटना घडली आहे. बांधकामातील चूक निदर्शानास आल्यावर लाखो रुपये खर्चून बांधलेला बंधारा फोडण्यात आला आहे. आता या पुराच्या पाण्यात घरे वाहून गेलेल्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच संबधित अधिकाऱ्यांवर कारवाईही करून गुन्हे दाखल करण्याचीही मागणी करण्यात येत आहे.

bahula river flood
बहुळा नदीच्या पुरात 4 घरे गेली वाहून

जळगाव - बहुळा नदीला आलेल्या पुरात 4 घरे वाहून गेल्याची घटना नुकतीच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात असलेल्या चिंचपुरे या गावात घडली आहे. जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नदीत चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या साठवण बंधाऱ्यामुळे हा सारा प्रकार घडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही दुर्घटना घडल्यानंतर खबरदारी म्हणून दुसऱ्याच दिवशी 50 लाख रुपये खर्चून बांधलेला बंधारा फोडण्यात आला. त्यामुळे शासनाचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे या साऱ्या प्रकारची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, नुकसानग्रस्तांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

bahula river flood
बहुळा नदीच्या पुरात 4 घरे गेली वाहून

जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक बाबी लक्षात न घेता बंधारा बांधल्याने नदीचा नैसर्गिक प्रवाह बदलला. त्यामुळेच पुराचे पाणी थेट घरांमध्ये घुसून नुकसान झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेत राजेंद्र जयराम पाटील, समाधान उत्तम पवार, गोविंदा तुळशीराम पाटील आणि प्रकाश तुळशीराम पाटील यांची घरे संसारोपयोगी साहित्यासह वाहून गेली आहेत. डोक्यावरील छत हिरावले गेल्याने मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारी ही चारही कुटुंब उघड्यावर आले आहेत. आज हे कुटुंब गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत आश्रयाला आहेत. ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना मदतीचा हात दिल्याने कशीबशी गुजराण करत आहेत. डोळ्यादेखत घर पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. शासनाने आमचे पुनर्वसन करावे, या प्रकरणी दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी नुकसानग्रस्त कुटुंबांनी केली आहे. दरम्यान, या घटनेसंदर्भात जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. चौकशी सुरू आहे, असे उत्तर देऊन त्यांनी वेळ मारून नेली.

बहुळा नदीच्या पुरात 4 घरे गेली वाहून
काय आहे नेमका प्रकार?चिंचपुरे गावाच्या शेजारून बहुळा नदी वाहते. या नदीवर काही वर्षांपूर्वी एक साठवण बंधारा होता. तो जीर्ण झाल्याने नदीवर नव्याने साठवण बंधारा मंजूर झालेला होता. मात्र, जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नवा बंधारा हा नियोजित ठिकाणी न बांधता मूळ जागेपासून सुमारे 100 मीटर अंतरावर म्हणजेच गावाच्या अगदी जवळ बांधला. धक्कादायक बाब म्हणजे, हा बंधारा बांधताना सिंचन विभागाच्या अभियंत्यांनी कोणत्याही प्रकारची भौगोलिक परिस्थिती, स्थान तसेच तांत्रिक बाबी लक्षात घेतल्या नाहीत. सुमारे 50 लाख रुपये खर्चून नवा बंधारा बांधण्यात आला. मात्र, यावर्षी दमदार पाऊस झाल्याने बहुळा नदीला मोठा पूर आला. या बंधाऱ्यामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह बदलल्याने पुराचे पाणी गावाच्या दिशेने वळले. त्यामुळे नदीच्या काठावरील घरे पुराच्या पाण्यात वाहून गेली.
bahula river flood
बहुळा नदीच्या पुरात 4 घरे गेली वाहून

राजेंद्र पाटील, समाधान पवार, गोविंदा पाटील आणि प्रकाश पाटील यांच्या घरांचे या घटनेत सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यांच्या घरातील संसारोपयोगी सामानही पुराच्या पाण्यात वाहून गेला. ही घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेसह लोकप्रतिनिधींकडे तक्रारी केल्या. पुराचे पाणी ओसरत नसल्याने अजून नुकसान होण्याची भीती होती. त्यामुळे लागलीच तांत्रिक बाबी लक्षात न घेता बांधलेला बंधारा फोडण्यात आला. त्यानंतर पूर काही प्रमाणात कमी झाला आणि इतर घरांचे संभाव्य नुकसान टळले. जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंधाऱ्याची मूळ जागाच बदलल्याने ही दुर्घटना घडून 4 कुटुंब उघड्यावर आले आहेत. शिवाय बंधारा फोडावा लागल्याने शासनाचे 50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत काँग्रेसचे जळगावातील पदाधिकारी संजय वराडे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना तत्काळ निलंबित केले पाहिजे, अशी मागणी वराडे यांनी केली आहे.

महिनाभरापूर्वी घटना घडूनही शासनाकडून दखल नाही-

ही गंभीर घटना सुमारे महिनाभरापूर्वी घडली आहे. मात्र, त्यानंतर अजूनही शासनाच्या वतीने त्याची दखल घेण्यात आलेली नाही. स्थानिक आमदार किशोर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन दिले आहे. परंतु, अजून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. सद्यस्थितीत चारही कुटुंब उघड्यावर वास्तव्याला आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाने प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.Conclusion:भिंत खचली, चूल विझली, लग्नही मोडले-

या दुर्दैवी घटनेमुळे राजेंद्र पाटील यांच्या कुटुंबावर तर दुसरेही संकट उभे राहिले आहे. त्यांचा मुलगा राहुल याचे दोन महिन्यांपूर्वी लग्न जमले होते. परंतु, लग्नापूर्वीच पुराच्या पाण्यात त्यांचे घर, संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. अशा परिस्थितीत मुलीकडच्या लोकांनी मुलगी देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. तुमच्याकडे काहीही शिल्लक राहिले नाही. मुलगी कशी द्यायची? असे मुलीकडच्या लोकांनी सांगितले. त्यामुळे पाटील कुटुंबीय काहीही करू शकले नाहीत. आपल्यावर ओढवलेल्या संकटाची आपबिती सांगताना राहुल पाटील याला गहिवरून आले होते. आम्हाला काहीही नको फक्त आमचे घर परत द्या, अशी भावनिक मागणी त्याने 'ई- टीव्ही भारत'शी बोलताना केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.