ETV Bharat / state

जळगाव जिल्हा बँकेला 'ईडी'ची नोटीस?, खडसेंच्या साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाची मागितली माहिती

author img

By

Published : Aug 12, 2021, 6:40 AM IST

Updated : Aug 12, 2021, 6:54 AM IST

एकनाथ खडसे यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसे या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा आहेत. दुसरीकडे, त्या घोडसगाव येथील श्री संत मुक्ताई सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षाही आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेने श्री संत मुक्ताई साखर कारखान्याला दिलेले कर्ज नियमानुसार आहे किंवा नाही? याची चौकशी ईडी करत असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या प्रकरणात अॅड. रोहिणी खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्हा बँकेला 'ईडी'ची नोटीस?
जळगाव जिल्हा बँकेला 'ईडी'ची नोटीस?

जळगाव - पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील भूखंड खरेदीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे लागलेले 'ईडी'चे शुक्लकाष्ठ काही केल्या संपत नसल्याचे पाहायला मिळत आहे. भोसरी प्रकरणात खडसे व त्यांच्या कुटुंबीयांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. ही चौकशी सुरू असतानाच ईडीने जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नोटीस बजावल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ईडीने जळगाव जिल्हा बँकेकडून मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथे असलेल्या खडसेंच्या श्री संत मुक्ताई साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाची माहिती मागितली आहे. जिल्हा बँकेने कर्जाची सविस्तर माहिती ईडीला सादर केल्याचेही सांगितले जात आहे.

जळगाव जिल्हा बँकेला 'ईडी'ची नोटीस?,

सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने ही नोटीस जिल्हा बँकेला तीन ते चार दिवसांपूर्वीच बजावल्याची माहिती सूत्रांची माहिती आहे. या नोटिशीच्या अनुषंगाने जिल्हा बँकेने श्री संत मुक्ताई साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाच्या संदर्भातील सविस्तर माहिती ईडीला सादर केल्याचे समजते. याबाबतची माहिती आज, बुधवारी सायंकाळी माध्यमांच्या समोर आली. जिल्हा बँकेच्या प्रशासनाकडून बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र देशमुख यांनी या माहितीला दुजोरा दिला. एकनाथ खडसे यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसे या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा आहेत. दुसरीकडे, त्या घोडसगाव येथील श्री संत मुक्ताई सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षाही आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेने श्री संत मुक्ताई साखर कारखान्याला दिलेले कर्ज नियमानुसार आहे किंवा नाही? याची चौकशी ईडी करत असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या प्रकरणात अॅड. रोहिणी खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाविषयी ईडीकडे तक्रारी?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथील साखर कारखान्यावर जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह शिखर बँकेचे कर्ज होते. हा कारखाना अवसायनात गेल्यानंतर तो शिखर बँकेने विक्रीस काढला. हा कारखाना खडसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विकत घेतला. 2015-16 मध्ये एकनाथ खडसे यांच्या पॅनलची जिल्हा बँकेवर सत्ता आली. त्यानंतर जिल्हा बँकेने श्री संत मुक्ताई साखर कारखान्याला दोन टप्प्यात सुमारे 78 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. पहिल्या टप्प्यात मंजूर झालेल्या कर्जाची परतफेड कारखान्यात वीजनिर्मिती करून केली जाणार होती. दुसऱ्या टप्प्यात कारखान्याला कर्ज मंजूर झाले, तेव्हा जिल्हा बँकेच्या अध्यक्षा म्हणून ऍड. रोहिणी खडसे होत्या. त्या साखर कारखान्याच्या उपाध्यक्षाही आहेत. त्यामुळे कारखान्याला मंजूर केलेले कर्ज हे सहकार कायद्याच्या नियमानुसार नसल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने ईडीने माहिती मागितली असावी, असा अंदाज आहे.

काय म्हणाले जिल्हा बँकेचे एमडी?

या प्रकरणासंदर्भात 'ईटीव्ही भारत'ने जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र देशमुख यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, बँकेला ईडीने एक पत्र देऊन घोडसगावच्या श्री संत मुक्ताई सहकारी साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाची माहिती मागितली होती. त्यात साखर कारखान्याला किती कर्ज दिले आहे, त्यातील किती कर्जाची परतफेड झाली आहे, कर्जाचे हफ्ते नियमित भरले जात आहेत का? अशा स्वरूपाची माहिती विचारली आहे. ती माहिती बॅंकेकडून दिली जाईल. अशा स्वरूपाची माहिती सरकारी यंत्रणांकडून मागितली जाणे ही नियमित रुटीन प्रोसेस असते. जिल्हा बँकेने श्री संत मुक्ताई साखर कारखान्याला 30 कोटी रुपयांचे कर्ज दिले असून, त्याची नियमित परतफेड सुरू असल्याचेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.

Last Updated :Aug 12, 2021, 6:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.