ETV Bharat / state

Chalisgaon Rain : चाळीसगावात पावसामुळे हाहाकार.. शेकडो हेक्टरवरील पिके गेली वाहून; कन्नड घाटात दरड कोसळली

author img

By

Published : Aug 31, 2021, 5:46 PM IST

जळगावातील चाळीसगाव तालुक्यात पावसामुळं हाहाकार माजला आहे. सोमवारी रात्री ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील सुमारे 15 गावांना पुराचा तडाखा बसला आहे. शेकडो हेक्टरवरील पिके तसेच 300 ते 400 जनावरे वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. कन्नड घाटात अनेक ठिकाणी मोठ्या दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे अनेक वाहने घाटात अडकून पडली आहेत.

chalisgaon rain update
चाळीसगावात पावसामुळे हाहाकार..

जळगाव - जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात सोमवारी रात्री ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील सुमारे 15 गावांना पुराचा तडाखा बसला आहे. शेकडो हेक्टरवरील पिके तसेच 300 ते 400 जनावरे वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत एका वृद्धेचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. कलाबाई सुरेश पवार (वय 60, रा. वाकडी, ता. चाळीसगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह देखील वाहून आल्याची माहिती मिळाली आहे. त्याची अद्याप ओळख पटलेली नाही.

चाळीसगावात पावसामुळे हाहाकार..

कन्नड घाटातील वाहतूक नांदगाव मार्गे वळवली -

रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कन्नड घाटात अनेक ठिकाणी मोठ्या दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे अनेक वाहने घाटात अडकून पडली आहेत. घाटात दोन्ही बाजूने तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. त्यामुळे कन्नड घाटातील औरंगाबादकडून चाळीसगावच्या दिशेने येणारी वाहतूक नाशिक जिल्ह्यातील नांदगावमार्गे वळविण्यात आली आहे. चाळीसगावहून औरंगाबादच्या दिशेने जाणारी वाहतूक जळगावमार्गे वळवली आहे, अशी माहिती महामार्ग पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.

चाळीसगाव शहरात भीषण परिस्थिती -

तितूर व डोंगरी नदीला आलेल्या पुरामुळे पाणी थेट शहरात घुसले. नदीकाठच्या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. बाजारपेठेतील दुकानांमध्ये साधारणपणे 5 ते 7 फूट पाणी साचले आहे. नदीकाठी उभी असलेली अनेक वाहने वाहून गेली आहेत. घरांमध्येही मोठ्या प्रमाणावर पाणी घुसल्याने अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे.

chalisgaon rain update
चाळीसगावात पावसामुळे हाहाकार..

चाळीसगाव शहरातील तितूर नदीच्या तिन्ही पुलांवर पुराचे पाणी असल्याने शहराच्या काही भागांचा संपर्क एकमेकांशी तुटला आहे. भाविकांचे श्रद्धास्थान असलेला पीर मुसा कादरी दर्गा परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. येथे दुसऱ्या बाजूला अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम स्थानिक प्रशासनाच्या वतीने सुरू आहे.

chalisgaon rain update
चाळीसगावात पावसामुळे हाहाकार..
'या' गावांना बसला सर्वाधिक तडाखा-
चाळीसगाव शहरासह वाकडी, वाघडू, हिंगोणे, खेर्डे, मुंदखेडे खुर्द, रोकडे, बोरखेडा खुर्द, पातोंडा, ओझर, टाकळी प्र.चा. ही गावे पुरामुळे बाधित झाली आहेत. या सर्व गावांमधील शेकडो गुरे व वाहने पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. वाकडी गावात डोंगरी नदीच्या पुरामुळे गुरे वाहून मरण पावली आहेत. गावामधील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. या गावातील शेकडो हेक्टरवरील पिके वाहून गेली आहेत. या गावातील कलाबाई पवार या 60 वर्षीय वृद्धेचा पुरात बुडून मृत्यू झाला आहे. वाघडू, हिंगोणे, खेर्डे, मुंदखेडे खुर्द, रोकडे, बोरखेडा खुर्द यासह आजूबाजूच्या गावांमध्ये देखील पाणी घुसले आहे.
chalisgaon rain update
चाळीसगावात पावसामुळे हाहाकार..

पुरामुळे बाधित झालेल्या सर्वच गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. घरात पाणी शिरलेल्या नागरिकांना मंगल कार्यालये, मंदिर, शाळा याठिकाणी आसरा देण्यात आला आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले जात आहे. वाकडी वगळता इतर गावात जीवितहानी झाल्याची नोंद नाही. स्थलांतरित केलेल्या नागरिकांना स्थानिक प्रशासनाकडून मदत केली जात आहे.

chalisgaon rain update
चाळीसगावात पावसामुळे हाहाकार..
रोकडे गावातून 125 ते 150 जनावरे गेली वाहून-
चाळीसगाव तालुक्यातील रोकडे गावात अतिवृष्टीमुळे शेती व जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या गावातून 125 ते 150 जनावरे वाहून गेल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. शेतीचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिके पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. काही ठिकाणी घरांच्या भिंतींची पडझड देखील झाली आहे.
chalisgaon rain update
चाळीसगावात पावसामुळे हाहाकार..
यंत्रणा ठाण मांडून -
चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी सकाळीच पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्यासह भाजपनेते गिरीश महाजन, स्थानिक खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, तहसीलदार अमोल मोरे आदींनी चाळीसगावकडे धाव घेतली.

chalisgaon rain update
चाळीसगावात पावसामुळे हाहाकार..

शासकीय यंत्रणा ठाण मांडून असून, मदतकार्य केले जात आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मदतीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

chalisgaon rain update
चाळीसगावात पावसामुळे हाहाकार..
मदतकार्यासाठी पथके गठीत-
चाळीसगाव शहरासह कन्नड घाटात मदतकार्य करण्यासाठी वन्यजीव संरक्षण संस्थेची दोन पथके राखीव ठेवण्यात आली आहेत. यातील नांदगाव (जि. नाशिक) येथील संस्थेचे तालुकाध्यक्ष प्रभाकर निकुंभ व मंगेश आहेर यांनी कन्नड घाटाच्या दुसऱ्या बाजुने दरड कोसळलेल्या भागात जाऊन अडकलेल्या वाहनचालकांना मदत केली. बिस्कीट व पाण्याच्या बाटल्या दिल्या. यानंतर तेथे पोहाेचलेल्या एसडीआरफ, पोलिसांच्या पथकाने इतर संस्थांचे सदस्य, नागरिकांना बाहेर काढून स्वत: रेस्क्यू ऑपरेशन राबवले. तसेच जळगावातील मानद वन्यजीव सरक्ष रवींद्र फालक, बाळकृष्ण देवरे, योगेश गालफाडे, बबलु शिंदे, जगदीश बैरागी, शीतल शिरसाठ, राजेश सोनवणे व दिनेश सपकाळे यांचे पथक जिल्हाधिकारी कार्यालयात थांबून होते. चाळीसगाव येथून मदतकार्यासाठी बोलावणे येताच पथक रवाना होणार होते. तत्पूर्वी त्यांना राखीव म्हणून जळगावात थांबवले होते.
पोलीस दलाने जाहीर केला प्राथमिक अहवाल-
अतिवृष्टीनंतर चाळीसगाव शहर व तालुक्यात आलेल्या आपत्तीसंदर्भात मंगळवारी दुपारी जिल्हा पोलीस दलाने बंदोबस्त वाढवला. तसेच प्राथमिक आढावा सादर केला आहे. यात चाळीसगाव शहरातील तितूर व डोंगरी नदीच्या पुरामुळे मुसा कादरी दर्गा परिसरात पुराचे पाणी शिरले. नदीच्या पुलावर पाणी असल्यामुळे संपर्क तुटला. नदीकाठावरील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. गुरे व वाहने पाण्यात वाहून गेली आहेत. घाटरोड व चाळीसगाव शहराचा संपर्क तुटला असून वीजपुरवठा बंद आहे. चाळीसगाव शहरात हॉटेल सदानंद चौक, दयानंद चौक, दर्गा परिसर, सिग्नल पॉईंट व तिरंगा पुल परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.
chalisgaon rain update
चाळीसगावात पावसामुळे हाहाकार..

हिंगोणे गावात दोन पानटपरी वाहून गेल्या. शाळेची भिंत तुटली. ग्रामपंचायत कार्यालयासह शाळेतही पाणी शिरले. काही गुरे वाहुन गेल्याने मृत झाली आहेत. नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.