ETV Bharat / state

खडसेंना राजकारण चांगले समजते, ते योग्य निर्णय घेतील - देवेंद्र फडणवीस

author img

By

Published : Oct 13, 2020, 7:47 PM IST

Updated : Oct 13, 2020, 8:25 PM IST

bjp leader devendra fadanvis on eknath khadse ncp entry possibility
देवेंद्र फडणवीस

एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. आमच्या सर्वांची इच्छा देखील आहे, की त्यांनी आमच्या सोबतच राहिले पाहिजे. त्यांना राजकारण देखील नीट समजते. मला विश्वास आहे की, ते योग्य निर्णय घेतील. माझी खडसेंशी आज कुठलीही चर्चा झालेली नाही. पण, योग्यवेळी मी चर्चा करेल. मला असे वाटते ते योग्य निर्णय घेतील, असेही फडणवीसांनी सांगितले.

जळगाव - आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती आरोप करणाऱ्या एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराची जोरदार चर्चा सुरू आहे. या विषयावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच आपली प्रतिक्रिया दिली. 'एकनाथ खडसे यांना राजकारण चांगले समजते. ते योग्य निर्णय घेतील, असा आम्हाला विश्वास आहे', अशा शब्दांत फडणवीस यांनी उत्तर दिले.

खडसेंना राजकारण चांगले समजते, ते योग्य निर्णय घेतील

जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे भाजपचे माजीमंत्री गिरीश महाजन यांच्या पाठपुराव्यामुळे उभारण्यात आलेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या लोकार्पणासाठी मंगळवारी दुपारी देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर आलेले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराच्या विषयावर आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी मदिरालय सुरू करणाऱ्या राज्य सरकारला मंदिरे खुली करण्याचे वावडे कशासाठी ? असा प्रश्न उपस्थित करत सरकारवर टीकास्त्र डागले.

खडसेंशी चर्चा करु -

यावेळी फडणवीस यांनी पुढे सांगितले की, एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. आमच्या सर्वांची इच्छा देखील आहे, की त्यांनी आमच्या सोबतच राहिले पाहिजे. त्यांना राजकारण देखील नीट समजते. मला विश्वास आहे की, ते योग्य निर्णय घेतील. माझी खडसेंशी आज कुठलीही चर्चा झालेली नाही. पण, योग्यवेळी मी चर्चा करेल. मला असे वाटते ते योग्य निर्णय घेतील, असेही फडणवीसांनी सांगितले.

मंदिरांवर एवढा अन्याय का?

राज्य सरकारने मदिरालये व बार सुरू केले. इतकेच नव्हे तर पर्यटन विभागाच्या पत्राचा आधार घेत वेळ देखील वाढवून दिला. तर मग मंदिरांचे एवढे वावडे का? अशा शब्दात फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. खरे म्हणजे देशातील सर्व राज्यानी मंदिरे उघडली. कुठल्याही राज्यात मंदिरे खुली केल्याने कोरोना पसरल्याचे उदाहरण नाही. राज्यपालांना प्राप्त होणारी निवेदने राज्यपाल मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवत असतात. त्याचप्रमाणे मंदिरे उघडण्यासाठीचे निवेदन देखील त्यांनी पाठवले होते. मात्र, त्यावर मुख्यमंत्री यांनी राज्यपालांना दिलेले उत्तर दुर्दैवी असल्याचेही फडणवीस म्हणाले. या तीन पक्षांच्या सरकारमध्ये स्वत:ला हिंदुत्ववादी समजणारी शिवसेना देखील आहे. त्यांच्या राज्यात मंदिरांवर इतका मोठा अन्याय का? असा प्रश्नही फडणवीस यांनी यावेळी शेवटी उपस्थित केला.

Last Updated :Oct 13, 2020, 8:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.