ETV Bharat / state

जळगावनंतर मुक्ताईनगर नगरपंचायतीत भाजपला धक्का? 6 नगरसेवक हाती शिवबंधन बांधणार

author img

By

Published : May 26, 2021, 6:56 PM IST

Muktainagar
मुक्ताईनगर

मुक्ताईनगरात सत्ताधारी भाजपचे 6 नगरसेवक लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची समोर येत आहे.

जळगाव - जळगाव महापालिकेच्या पाठोपाठ जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील नगरपंचायतीच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुक्ताईनगरात सत्ताधारी भाजपचे 6 नगरसेवक लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची समोर येत आहे. हा भाजपसाठी दुसरा मोठा धक्का मानला जात आहे.

मुक्ताईनगर नगरपंचायतीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेले आहे. येथील नगराध्यक्षा नजमा तडवी यांच्यासह सत्ताधारी गटातील नगरसेवक हे खडसे गटाचे समर्थक आहेत. मात्र, अलीकडच्या काळात सत्ताधारी गटात कुरबुरी सुरू झाल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या कामांना बहुमताने मंजुरी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. नगराध्यक्षांसह 6 नगरसेवकांनी शिवसेनेला साथ दिल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात होते. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही केले होते.

हेही वाचा - सुपरमुनचे संपूर्ण देशात मनोहारी दर्शन; नेहरू विज्ञान केंद्राच्या ऑनलाईन कार्यक्रमातही दिसणार

आज नगरसेवकांचा शिवसेना प्रवेश?

आज मुक्ताईनगर नगरपंचायतीचे 6 नगरसेवक हे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून मुंबईत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश घेणार असल्याची माहिती मिळत आहे. याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचीही उपस्थिती राहणार आहे. दरम्यान, मुक्ताईनगरात घडणाऱ्या घडामोडींमुळे राजकारणाची सूत्रे पूर्णपणे बदलणार आहेत.

जळगाव महापालिकेतही झाले आहे सत्तांतर-

मार्च महिन्यात जळगाव महापालिकेतही शिवसेनेने भाजपच्या हातून सत्ता आपल्याकडे खेचून घेतली. याठिकाणी 57 नगरसेवकांसह भाजपकडे स्पष्ट बहुमत होते. मात्र, 15 नगरसेवक असलेल्या शिवसेनेने भाजपचे 27 नगरसेवक गळाला लावत महापौर पदावर आपला उमेदवार विराजमान केला. जळगावनंतर आता मुक्ताईनगरातही अशाच हालचाली सुरू आहेत. भाजपच्या नगराध्यक्षांसह काही नगरसेवकांना आपल्या बाजूने वळवत याठिकाणी सत्तांतर घडवण्याचे शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत.

खडसेंच्या गडात पाय रोवतेय शिवसेना-

विशेष म्हणजे, भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले एकनाथ खडसे यांचा गड असलेल्या मुक्ताईनगरात शिवसेना हा सत्तांतराचा प्रयोग करत आहे. शिवसेनेचे स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यात राजकीय हाडवैर आहे. आतापर्यंत ते एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी राहिले आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे दोन्ही नेते एकाच झेंड्याखाली असले तरी त्यांच्यातील वितुष्ट मात्र कायम असल्याची प्रचिती येते. आता पुढे काय घडते, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

हेही वाचा - सीबीआय प्रमुखपदी सुबोध कुमार जैस्वाल, राज्यातील 'हे' नेते येऊ शकतात अडचणीत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.