Hingloi: अर्धातास रोखली तिरूपती-अमरावती एक्सप्रेस, १७ जणांवर गुन्हे दाखल

author img

By

Published : Nov 23, 2022, 7:32 PM IST

Hingloi

हिंगोली जिल्हा रेल्वे संघर्ष समितीतर्फे (Railway Committee) रेल्वे संदर्भात विविध मागण्यांसाठी २३ नोव्हेंबर रोजी केल्या गेलेल्या आंदोलनाला जनतेतून मोठा प्रतिसाद मिळाला. यशस्वी ठरलेल्या हिंगोली शहर बंद नंतर आंदोलनकर्त्यांनी तिरुपती - अमरावती ही रेल्वे अडविली. (Tirupathi Amravati Express stopped) याप्रकरणी १७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हिंगोली: हिंगोली जिल्हा रेल्वे संघर्ष समितीतर्फे (Railway Committee) ७ नोव्हेंबर रोजी प्रशासनाला एक निवेदन देऊन रेल्वे संदर्भात काही मागण्या करण्यात आल्या होत्या. या आंदोलनाची ठिणगी जालना-छपरा एक्सप्रेसमुळे पडली होती. जालना येथून बिहार राज्यातील छपरा स्टेशन करिता पूर्णा-अकोला मार्गे जाहीर करण्यात आलेली ‘छपरा एक्सप्रेस’ ऐन वेळेवर जालना, औरंगाबाद, मनमाड मार्गे सुरू करण्यात आली. या रेल्वेच्या शुभारंभ प्रसंगी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाषणातून सांगितले की, ही रेल्वे अकोला मार्गे जाणार होती. परंतु खूप प्रयत्न करून ही रेल्वे मनमाड मार्गे वळविण्यात आली आहे. ना. रावसाहेब दानवे यांच्या भाषणाची चित्रफित व्हायरल होताच मराठवाड्यातील परभणी, हिंगोली व विदर्भातील वाशिम, अकोला या जिल्ह्यांमध्ये मोठा रोष पसरला.

संघर्ष समितीची बैठक : रेल्वे प्रशासनाने छपरा गाडी वळविल्याने संतप्त झालेल्या हिंगोलीकरांनी हिंगोली जिल्हा रेल्वे संघर्ष समितीची तातडीची बैठक बोलावली व पंधरा दिवसात ही रेल्वे जाहीर झाल्याप्रमाणे परभणी, पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला मार्गे न सुरू केल्यास हिंगोली जिल्हा बंद व रेल्वे रोको करण्याचा इशारा दिला होता. शेवटपर्यंत दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले. इतकेच नव्हे तर आंदोलनाच्या दिवशी हिंगोली स्थानकावरून अकोला येथे एका उद्घाटन कार्यक्रमासाठी गेलेल्या विभागीय रेल्वे प्रबंधकांनी हिंगोलीतील आंदोलकांशी चर्चा करणे सुद्धा पसंत केले नाही.

दुकाने बंद ठेऊन प्रतिसाद : आंदोलकांमध्ये अधिकच रोष होता. सकाळी ८ वाजेपासून हिंगोली शहरातील गांधी चौकात हळूहळू आंदोलकांची गर्दी जमू लागली. यावेळी व्यापार्‍यांनीही आपली दुकाने बंद ठेवून आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला. आंदोलनकर्त्यांनी वाजत गाजत शहरातून एक मोठी फेरी काढून शेवटी एका रॅलीच्या स्वरूपात रेल्वे स्थानक गाठले. हिंगोली रेल्वे स्थानकावर जीआरपी व रेल्वे सुरक्षा बलाचा मोठा ताफा जमला गेला होता. रेल्वे स्थानकात प्रवेश करू इच्छिणार्‍या आंदोलकांना रेल्वे पोलिसांनी प्रवेशद्वारावरच अडविले.

पोलीस अधिकारी गेले भांबावून : यावेळी रेल्वे पोलीसचे वरिष्ठ अधिकारी आंदोलकांशी चर्चा करीत होते, इतक्यात अनेक आंदोलकांनी रेल्वे स्थानका बाहेरून रेल्वे पुलाकडे जाऊन रेल्वे रुळावर ठिय्या आंदोलन सुरू केले. यामुळे भांबावलेल्या पोलिसांना बंदोबस्त नेमका कुठे करावा हेच समजेनासे झाले. शेवटी आंदोलकांना रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवेश देण्यात आला व सर्व आंदोलकांनी एकत्रित येऊन एकाच ठिकाणी रेल्वे रोको आंदोलन करावे अशी विनंती रेल्वे पोलिसांच्या अधिकार्‍यांनी केली. सव्वा अकराच्या सुमारास तिरुपती - अमरावती रेल्वे हिंगोली स्थानकात दाखल झाली. या रेल्वेच्या इंजिनावर चढून आंदोलकांनी घोषणांनी अवघा परिसर दणावून सोडला.


१७ जणांवर गुन्हे :
जवळपास अर्धा तास ही रेल्वे स्थानकातच अडविण्यात (Tirupathi Amravati Express stopped) आली. शेवटी रेल्वेच्या अधिकार्‍यांनी विनंती केल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी रेल्वेच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली. यावेळी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी नांदेड येथील सहाय्यक सुरक्षा आयुक्त बी. दासगुप्ता यांनी पुढाकार घेतला. संघर्ष समितीतर्फे दिलेले निवेदन स्वीकारून तातडीने ही माहिती रेल्वे बोर्ड व रेल्वे मंत्रालयाला कळविण्याचे आश्वासन दासगुप्ता यांनी दिले. या आंदोलनाबाबत रेल्वे पोलिसांनी एकूण १७ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

मंत्री दानवेंनी घेतली दखल : छपरा रेल्वे वळविल्यामुळे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर मागील दोन दिवसांपासून हिंगोलीकरांचा मोठा राग व्यक्त होत होता. संघर्ष समितीतर्फे आजच्या आंदोलनाची बातमी व्टिटरवर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री रावसाहेब दानवे व मुख्य प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे यांना ‘टॅग’ करण्यात आली होती. याची दखल घेऊन आंदोलन सुरू होण्यापूर्वी ना. दानवे यांनी माजी. आ. गजानन घुगे यांच्या मार्फत आंदोलनकांची मने वळविण्याचा प्रयत्न केला. तसेच याबाबत लवकर निर्णय घेणार असल्याचे सांगितले. असे असले तरी आंदोलनकर्ते मात्र ‘रेल्वे रोको करणारच’ या भूमिकेवर ठाम होते. येत्या १५ दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन राज्यमंत्र्यांनी दिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.