ETV Bharat / state

Gadchiroli Encounter : नक्षलवाद्यांचा देशातील सर्वात मोठा नेता मिलिंद तेलतुंबडे ठार

author img

By

Published : Nov 14, 2021, 10:24 AM IST

Updated : Nov 14, 2021, 11:33 AM IST

गडचिरोलीमध्ये शनिवारी सकाळी पोलीस आणि नलक्षलींमध्ये मोठी चकमक झाली. या चकमकीत तब्बल 26 नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातलं आहे. यात मिलिंद तेलतुंबडेचाही (Maoist leader Milind Teltumbde) मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. यावेळी काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाल्याचं समोर आलं आहे.

नक्षलवाद्यांचा देशातील सर्वात मोठा नेता मिलिंद तेलतुंबडेचा खात्मा
Top Maoist leader Milind Teltumbde among 26 rebels killed in Gadchiroli encounter

गडचिरोली - जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील ग्यारापत्ती पोलिस मदत केंद्रांतर्गत बोटेझरी-मरदिनटोला परिसरातील जंगलात शनिवारी सकाळी पोलीस-नक्षल चकमक (Gadchiroli Encounter) झाली. यात 26 नक्षलवाद्यांना ठार करण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश आले. चकमकीत 3 पोलीस किरकोळ जखमी झाले. या चकमकीत नक्षलवाद्यांचा देशातील सर्वात मोठा नेता मिलिंद तेलतुंबडेचाही खात्मा झाला आहे. या वृत्ताला पोलीस दलाने दुजोरा दिला आहे. नक्षलवाद्याच्या मोठ्या कंमाडर पैकी एक म्हणून मिलिंद तेलतुंबडे ( Maoist leader Milind Teltumbde)याची ओळख होती. त्याच्यावर ५० लाखांच बक्षीस होत.

  • Maharashtra Home Minister Dilip Walse Patil confirms that Naxal leader Milind Teltumde was shot dead in the encounter (in the jungles of Gyarapatti in Gadchiroli district yesterday). A total of 26 bodies recovered. 3 police personal received minor injuries & are hospitalised. pic.twitter.com/TkYLL19Z4Q

    — ANI (@ANI) November 14, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पहाटे उडाली चकमक-


सी-६० पथक व केंद्रीय राखीव दलाचे जवान शनिवारी संयुक्तपणे छत्तीसगड सीमावर्ती भागातील बोटेझरी जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना साडेपाच वाजताच्या सुमारास नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही जोरदार प्रत्युतर दिले. त्यानंतर नक्षलवादी घटनास्थळावरुन पसार झाले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नक्षल्यांचे पिट्टू, शस्त्रे व अन्य साहित्य सापडले आहे. नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिस मुख्यालयात आणण्यात आले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू आहे.

मिलिंद तेलतुंबडे आहे तरी कोण?


मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील राजूर येथील रहिवासी असलेला मिलिंद तेलतुंबडे हा सह्याद्री, दीपक इत्यादी टोपणनावांनी नक्षल चळवळीत ओळखला जात होता. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला मिलिंद तेलतुंबडे हा मागील 30 वर्षांपासून नक्षल चळवळीत सक्रिय होता. प्रतिबंधित माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा राज्य सचिवही होता. त्याच्यावर राज्य पोलिसांनी 50 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

तीन राज्याचा प्रमुख -


तीन-चार वर्षांपूवी महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगड (एमएमसी) झोन स्थापन करण्यात मिलिंदने महत्वाची भूमिका पार पाडली. या झोनचा तो सर्वोच्च नेता होता. चालू आठवड्यात राज्याचे आपत्ती निवारण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात सुरजागड खाणी विरोधातील आंदोलनासंदर्भात टीका करणारे एक पत्र जारी झाले होते. त्यावर नक्षल्यांच्या दक्षिण झोनचा प्रवक्ता श्रीनिवास याची स्वाक्षरी होती. मात्र, पत्रातील भाषेवरुन ते पत्र सह्याद्री यानेच लिहिल्याचे स्पष्ट झाले होते.

3 वर्षातील सर्वात मोठी कारवाई -

शनिवारी पोलिसांनी 26 नक्षल्यांना ठार केले. मागील तीन वर्षातील ही सर्वांत मोठी कारवाई आहे. 22 एप्रिल 2018 ला भामरागड तालुक्यातील कसनासूर व दामरंचा परिसरात झालेल्या चकमकीत तब्बल 40 नक्षल्यांना पोलिसांनी ठार केले होते. त्यात साईनाथ, शिनू हे मोठे नक्षल कॅडर ठार झाले होते. त्यानंतर यंदा 21 मे रोजी एटापल्ली तालुक्यातील पयडी जंगलात पोलिसांनी 13 नक्षल्यांचा खात्मा केला होता. शनिवारच्या चकमकीतही नक्षवाद्यांचा मोठा नेता मिलिंद तेलतुंबडे याच्यासह आणखी काही मोठे नेते ठार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ही मोठी कारवाई ठरली आहे.

Last Updated :Nov 14, 2021, 11:33 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.