ETV Bharat / state

Gadchiroli District Year Ender 2021 : राजकीय घडामोडी, नक्षल कारवायांसह 'या' घटनांमुळे गडचिरोली जिल्हा वर्षभर चर्चेत राहिला

author img

By

Published : Dec 29, 2021, 5:14 PM IST

2021 या वर्षाला आता गुडबाय करण्याची वेळ आली आहे. या वर्षात जिल्ह्यात अनेक महत्वपूर्ण घडामोडी घडल्या. कुठे संवेदनशीलता तर, कुठे असंवेदनशीलता बघायला मिळाली. एकूणच जिल्ह्यात घडलेल्या घडामोडींचा थोडक्यात हा आढावा.

Gadchiroli District Year Ender 2021
महत्वाच्या घटना गडचिरोली जिल्हा 2021

गडचिरोली - 2021 या वर्षाला आता गुडबाय करण्याची वेळ आली आहे. या वर्षात जिल्ह्यात अनेक महत्वपूर्ण घडामोडी घडल्या. कुठे संवेदनशीलता तर, कुठे असंवेदनशीलता बघायला मिळाली. एकूणच जिल्ह्यात घडलेल्या घडामोडींचा थोडक्यात हा आढावा.

  1. राजकीय : सरत्या 2021 वर्षात गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणात अनेक उलथापालथ घडामोडी घडल्या. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले. तेव्हापासून जिल्ह्यात शिवसेना पक्षाची नव्याने बांधणी झाली. माजी शिवसेना नेते सुरेंद्रसिंह चंदेल यांची घरवापसी झाली आणि त्यांना जिल्हाप्रमुख बनवण्यात आले. तर, दुसरीकडे काँग्रेस पक्षाने माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांची जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी करून नव्या दमाचे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. तर, जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती तसेच, नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. यात अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला. नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची 18 नोव्हेंबर रोजी देसाईगंज (वडसा) येथे सभा झाली. या सभेतून त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.
    Gadchiroli District Year Ender 2021
    पालकमंत्री एकनाथ शिंदे
  2. क्राईम : 2021 हे वर्ष गडचिरोली पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. या वर्षात गडचिरोली पोलिसांनी अनेक मोठ्या नक्षल कारवाया करून 50 हून अधिक नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळवले. गडचिरोली पोलिसांनी जिल्ह्याच्या उत्तर भागातील धानोरा, कोरची, कुरखेडा या तालुक्यांमध्ये अभियान राबवून नक्षलवाद्यांच्या अनेक बड्या नेत्यांना ठार मारले. 12 नोव्हेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील उपविभाग धानोरा अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र ग्यारापत्ती परिसरात पीएलजीए सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर कंपनी ४ चा विस्तार करण्यासाठी नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडे याच्यासह नक्षलवाद्यांचे मोठे शिबीर सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. नक्षलवाद्यांच्या या शिबिराला घेरून मिलिंद तेलतुंबडेसह अनेक मोठ्या कॅडरच्या 28 नक्षलवाद्यांना ठार मारण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले. ही वर्षभरातील सर्वात मोठी कारवाई ठरली.
    Gadchiroli District Year Ender 2021
    नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडे
  3. कोरोना : 18 एप्रिल 2020 रोजी गडचिरोली जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित आढळून आला. सुरुवातीच्या काळात गडचिरोली जिल्हा तब्बल तीन ते चार महिने ग्रीन झोन मध्ये होता. 18 एप्रिल रोजी तब्बल सहा रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आणि येथून कोरोनाचे रुग्ण वाढतच गेले. मात्र, सरत्या 2021 या वर्षात जिल्हा प्रशासनाच्या अचूक नियोजनामुळे कोरोणावर बऱ्यापैकी मात करण्यात यश आले. दररोज दहा ते पंधरा असलेला मृत्युदर शुन्यावर आणण्यात आरोग्य विभागाला यश आले. गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 551 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
    Gadchiroli District Year Ender 2021
    प्रतिकात्मक
  4. आरोग्य : 2021 मध्ये जिल्ह्यातील आरोग्य सुविधांमधे पुर्वीपेक्षा प्रचंड तफावत बघायला मिळाली. कोरोनामुळे गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय हायटेक झाले. विशेष निधीतून गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्याधुनिक असे शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यात आले. तर, कोरोनाबाधितांची रिपोर्ट तपासण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातच मशीन उपलब्ध करून देण्यात आली. तसेच, जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारून त्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. जिल्ह्यातील बारा ग्रामीण रुग्णालयांना अत्याधुनिक रुग्णवाहिका पुरवण्यात आल्या.
    Gadchiroli District Year Ender 2021
    जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली
  5. सोशल : 2021 मध्ये कोरोना बाधितांची संख्या सतत वाढत गेल्याने जिल्ह्यातील जवळपास सर्वच रुग्णालय फुलले होते. जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना बाधितांची संख्या प्रचंड वाढल्याने येथे अनेक नातेवाईक रात्री मुक्कामी असायचे. या नातेवाईकांना रात्री जेवणाची अडचण होऊ नये यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मोफत भोजनदान कार्यक्रम सुरू करण्यात आला. हा कार्यक्रम तब्बल 51 दिवस चालला. काँग्रेसचे अनुकरण करून इतर सामाजिक संस्था व राजकीय पक्षांनीही विविध रुग्णालयांमध्ये भोजनदान कार्यक्रम सुरू केले. त्यामुळे, रुग्णालयात दाखल रुग्णांची हेळसांड थांबली.
    Gadchiroli District Year Ender 2021
    प्रतिकात्मक
  6. न्यायालय : 2021 या वर्षांत गडचिरोली येथील जिल्हा सत्र न्यायालयात अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर सुनावणी झाली. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून कारावास भोगत असलेले हैदराबाद येथील कवी प्रा. वरवरा राव याच्या जामीन अर्जासाठी गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. तर, गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयाने अनेक नक्षलवाद्यांना खून, जाळपोळ अशा घटनांमध्ये कारावासाची शिक्षा 2021 या वर्षामध्ये सुनावली.
    Gadchiroli District Year Ender 2021
    कवी वरवरा राव
  7. मोठा प्रोजेक्ट : 2021 या वर्षामध्ये गडचिरोली जिल्ह्यात कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टची घोषणा झाली नाही. मात्र, जे प्रोजेक्ट सुरू होते त्या कामांसाठी निधीची अडचण निर्माण झाल्याने काही दिवस काम थांबले होते. जिल्ह्यात सध्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून, नव्या वर्षात राष्ट्रीय महामार्ग पूर्णत्वास जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
    Gadchiroli District Year Ender 2021
    प्रतिकात्मक
  8. गडचिरोली शहर विशेष : गडचिरोली शहरात गेल्या दोन वर्षांपासून भूमिगत गटार लाईनचे काम सुरू आहे. 96 कोटी रुपयांची ही योजना असून गेल्या दोन वर्षांपासून गटरलाईनच्या कामामुळे गडचिरोली शहरवासीयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून शासकीय रकमेची उचल केल्याप्रकरणी राज्य सरकारने त्यांना दोन वेळा अपात्र ठरविले. मात्र, दोन्ही वेळा त्यांनी न्यायालयात आव्हान दिल्यानंतर न्यायालयाने त्यांना पदावर कायम ठेवले. नगराध्यक्ष पदाचा जवळपास एक महिन्याचा कार्यकाळ असताना जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी 9 डिसेंबरला नव्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक जाहीर केली होती. मात्र, 9 डिसेंबरलाच न्यायालयाने निर्णय देताना योगिता पिपरे यांना कार्यकाळ पूर्ण करता येणार, असे आदेश दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलेली निवडणूक रद्द करावी लागली.
    Gadchiroli District Year Ender 2021
    गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगिता पिपरे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.