ETV Bharat / state

भामरागड लगतच्या पर्लकोटा नदीवरील पुलाच्या बांधकामाला सुरुवात

author img

By

Published : Jan 5, 2021, 7:47 PM IST

construction-of-bridge-over-pearlkota-river-near-bhamragad-start-today
भामरागड लगतच्या पर्लकोटा नदीवरील पुलाच्या बांधकामाला सुरुवात

पावसाळ्यामध्ये पर्लकोटा नदीच्या पुरामुळे भामरागड तालुक्यातील नागरिक तब्बल दहा ते पंधरा दिवस संपर्कहीन असतात. त्यामुळे पर्लकोटा नदीवर नव्या पुलाचे बांधकाम करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून रेंगाळत होती. अखेर आज या नव्या पूलाचे उद्घाटन पार पडले.

गडचिरोली - नववर्षाच्या सुरुवातीलाच भामरागड तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाळ्यामध्ये पर्लकोटा नदीच्या पुरामुळे भामरागड तालुक्यातील नागरिक तब्बल दहा ते पंधरा दिवस संपर्कहीन असतात. त्यामुळे पर्लकोटा नदीवर नव्या पुलाचे बांधकाम करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून रेंगाळत होती. अखेर शासनाला यासाठी मुहूर्त सापडला असून 5 जानेवारी रोजी पर्लकोटा नदीवर नव्या पूलाचे उद्घाटन पार पडले. त्यामुळे लवकरच या नदीवर नवीन पूल उभा राहणार आहे.

पर्लकोटा नदीवरील पुलाच्या बांधकामाला सुरुवात

दरवर्षी तुटतो संपर्क -

पावसाळ्याच्या दिवसांत दहा ते पंधरा दिवस भामरागड तालुक्याचा संपर्क तुटलेला असतो. भामरागड शहरालगत पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती या तीन नद्या आहेत. या नद्यांचे पाणी अनेकदा भामरागड शहरात शिरत असते. परिणामी पावसाळ्यापूर्वीच येथील अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले जाते. तसेच धान्याची कोणतीही टंचाई भासू नये म्हणून तालुक्यातील नागरीकांसाठी तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी पुरवठा केले जातो. 2020 मध्ये तब्बल 8 वेळा भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला होता.

नव्या पुलाची मागणी होती रेंगाळली -

पर्लकोटा नदीवर अतिशय ठेंगणा पूल असल्याने कमी पावसातही पुलावर पाणी यायचे. परिणामी दिवसातून अनेकदा भामरागड-आल्लापल्ली मार्ग बंद व्हायचा. त्यामुळे येथे नव्या उंच पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून रेंगाळत होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भामरागड तालुक्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी नव्या पूल बांधकामासाठी 82 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. मात्र, दीड वर्षे उलटूनही बांधकामाला मुहूर्त सापडलेला नव्हता. अखेर आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.

पुलाचे बांधकाम झाल्यावरही धोका कायम राहणार -

पर्लकोटा नदीवर नवीन उंच पुलाचे बांधकाम झाल्यानंतर मार्ग बंद होणार नाही. मात्र, मोठा पूर आल्यास भामरागडमध्ये दरवर्षी पाणी शिरत असते. त्यामुळे येथील शंभरहून अधिक दुकान पाण्याखाली जातात. नव्या पुलाचे बांधकाम झाल्यानंतरही पुराचे पाणी गावात शिरणारच असल्याने पुराचा धोका कायम राहणार आहे.

हेही वाचा - 'औरंगाबादचे नाव बदलून उद्धव ठाकरेंनी योगी आदित्यनाथांप्रमाणे हिंदू-मुस्लिम वाद लावू नये'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.