ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष: डॉ. कुबेर यांच्या हॉस्पिटलमध्ये चार महिन्यात तिघांचा मृत्यू; मृतांच्या नातेवाईकांचे गंभीर आरोप

author img

By

Published : Jul 28, 2020, 3:06 PM IST

Dr. Kuber Hospital
डॉ. कुबेर रुग्णालय

चंद्रपूर शहरात डॉ. कुबेर कोतपल्लीवार यांचे श्री साई डिव्हाईन क्युअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये गेल्या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये तीन रुग्णांचा वादग्रस्त मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. अशा घटनांची प्रशासन दखल घेत नसल्याने सामान्य नागरिकांसाठी ही बाब चिंताजनक ठरत आहे.

चंद्रपूर - शहरातील डॉ. कुबेर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील चार महिन्यांत तीन रुग्णांचे संशयास्पदरित्या मृत्यू झाले. या तिन्ही मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील गैरसोय आणि येथील डॉक्टरांवर हलगर्जीपणाचे गंभीर आरोप केले. रुग्णांच्या प्रकृतीकडे लक्ष न देता त्यांची जास्तीत जास्त लूट कशी करता येईल, याकडे रुग्णालयातील व्यवस्थापनाने अधिक लक्ष दिले. यामुळेच आमच्या आप्तजनांचा मृत्यू झाला, असा गंभीर आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. सलग तीन रुग्णांचे वादग्रस्त मृत्यू होऊनही प्रशासन, अशा घटनांची दखल घेत नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांसाठी ही बाब चिंताजनक ठरत आहे.

डॉ. कुबेर यांच्या हॉस्पिटलमध्ये चार महिन्यात तिघांचा वादग्रस्त मृत्यू झाला आहे

23 जुलैला बल्लारपूर येथील नरसुबाई कटेकोला या 70 वर्षीय महिलेला डॉ. कुबेर कोतपल्लीवार यांच्या श्री साई डिव्हाईन क्युअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. महिलेला मागील काही दिवसांपासून चक्कर येणे, मळमळ, उलटी, अशक्तपणा, भोवळ येणे असा त्रास होता. वेकोलीच्या धोपटाळा आरोग्य केंद्रातून या महिलेला डॉ. कुबेर यांच्या रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र, 25 जुलैला अचानक या महिलेचा मृत्यू झाला. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील पुणेकर हे या महिलेवर अँजिओप्लास्टी करत असताना हृदयाची रक्तवाहिनी पूर्णपणे बंद झाल्याने तिचा मृत्यू झाला, असे या हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. कुबेर यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र, रुग्णांच्या नातेवाईकांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आम्हाला रुग्णाची तब्येत आणि उपचाराची कुठलीही माहिती न देता डॉक्टर आपला मनमानी कारभार करत होते, असा आरोप नातेवाईकांचा आहे.

याप्रकरणावरून रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले असता पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक जगताप यांनी हॉस्पिटलची बाजू घेत नातेवाईकांकडे असलेली रुग्णाची फाईल हिसकावून डॉक्टरांना परत देण्याचा प्रयत्न केला. या फाईलमध्ये रुग्णाची सर्व वैद्यकीय माहिती आहे. नातेवाईकांनी तीव्र विरोध केल्यानंतर ही फाईल परत करण्यात आली, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. नातेवाईकांनी केलेले आरोप गंभीर असल्याने तो चौकशीचा भाग आहे. मात्र, फाईलच्या माध्यमातून या रुग्णालयाचा भोंगळ कारभार लक्षात आला आहे. फाईलमध्ये असलेल्या माहितीमध्ये अनेक तांत्रिक तफावत आहे.

माहितीतील तफावत आक्षेपार्ह आणि गंभीर स्वरूपाची आहे. रुग्णाची अँजिओप्लास्टी करताना जो फॉर्म भरला जातो त्यात रुग्णाची, त्याच्या नातेवाईकाची आणि दोन साक्षीदारांची सही लागते. मात्र, मृत महिलेच्या फाईलमध्ये केवळ रुग्णाची सही आहे. विशेष म्हणजे ही महिला अशिक्षित होती. त्यामुळे तिच्याऐवजी तिच्या अल्पवयीन(वय 16) नातीची सही घेण्यात आलेली आहे.

याबाबत डॉ. कुबेर यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी ही अत्यंत क्षुल्लक बाब असल्याचे सांगितले. अनेकदा शस्त्रक्रियेपूर्वीचा फॉर्म वाचून रूग्ण घाबरून जातो. त्यामुळे नातेवाईकांकडून फॉर्मवर सही न करण्याची विनंती केली जाते. म्हणून आम्ही देखील तशी काळजी घेतो. या महिलेचा मृत्यू हा अनपेक्षित घटना आहे, असे डॉ. कुबेर यांनी सांगितले.

डॉ. कुबेर यांनी दिलेले स्पष्टीकरण हे शिक्षित लोकांना लागू पडणारे आहे. ही महिला तर अशिक्षित होती, अशावेळी तिचा अंगठा सुद्धा लावता आला असता मात्र, तसे केले गेले नाही. 24 तारखेला या महिलेच्या हृदयातील रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्याचे समोर येऊनही दुसऱ्या दिवशी रात्री तिच्यावर उपचार करण्यात आले याच दरम्यान तिचा मृत्यू झाला. हा घटनाक्रम डॉ. कुबेर यांच्या हॉस्पिटलमध्ये चालणाऱ्या भोंगळ कारभाराचे पितळ उघडे पाडणारा आहे.

जेव्हा अशा वादग्रस्त घटना घडतात, तेव्हा अशा डॉक्टरांच्या मागे एक भक्कम यंत्रणा उभी असते. त्यामुळे घटना कितीही गंभीर असली तरी पुढे त्यावर कारवाई होत नाही. उलट पीडित रूग्ण किंवा त्याच्या नातेवाईकांना न्याय मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. त्यात नैराश्य आल्याने अनेक जण या संघर्षातून माघारही घेतात. अनेक चुकीच्या गोष्टी नियमांच्या चौकटीत बसवणारी ही पक्षपाती व्यवस्था आपल्या समाजाला लागलेली मोठी कीड तर नाही ना? असा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो.

डॉ. कुबेर यांच्या रुग्णालयात झालेल्या यापूर्वीच्या घटना -

1 एप्रिलला राकेश यादव या 37 वर्षीय रुग्णाचा यकृत खराब झाल्याने मृत्यू झाला होता. संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांनी वेळेत लक्ष दिले नाही असा आरोप करत हॉस्पिटलमध्ये तोडफोड देखील केली होती. त्यानंतर 15 जूनला निर्मला गोंगाले या महिलेला निमोनियाचे निदान होऊनही कोविड सदृश्य लक्षणे असल्याचे सांगून उपचार करण्यास नकार देण्यात आला होता. शेवटी या महिलेला अत्यंत नाजूक अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. याच दिवशी महिलेने अखेरचा श्वास घेतला.

कुठलाही हलगर्जीपणा केला नाही - डॉ. कुबेर

गेल्या चार महिन्यांच्या कालावधीत जे तीन रूग्ण दगावले त्यांची प्रकृती अगोदरच गंभीर होती. त्यांना वाचवण्यासाठी रुग्णालयाच्यावतीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. आम्ही कुठलाही हलगर्जीपणा केला नाही, असे डॉ. कुबेर कोतपल्लीवार यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.