ETV Bharat / state

Chandrapur Crime : विद्यार्थी-प्राध्यापकाचा गॅंगवार; त्या प्रतिष्ठित महाविद्यालयातील घटनेची सर्वत्र चर्चा

author img

By

Published : Jan 22, 2023, 6:27 PM IST

Chandrapur Crime
विद्यार्थी-प्राध्यापकाचा गॅंगवार

गुरू-शिष्याच्या नात्याला हरताळ फासून विद्यार्थी आणि प्राध्यापकात चक्क गॅंगवार झाला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा सर्व प्रकार महाविद्यालयाच्या परिसरात झाला. चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या महाविद्यालयात हा प्रकार घडल्याची विश्वसनीय माहिती ईटीव्ही भारतच्या हाती लागली आहे. या घटनेची सर्वत्र दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. या घटनेमुळे संस्थाचालकाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.

चंद्रपूर : शुक्रवारी नेहमीप्रमाणे महाविद्यालय सुरू होते. अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना गणवेश सक्तीचा आहे. त्याशिवाय महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही. या दिवशी एक विद्यार्थी गणवेश न घालता साधे कपडे घालून आला होता आणि तो महाविद्यालयाच्या आत प्रवेश करत होता, हा विद्यार्थी महाविद्यालयाचा आहे की नाही हे कळायला मार्ग नव्हता. ही बाब त्या प्राध्यापकाला लक्षात आली आणि त्याने विद्यार्थ्याला हटकले आणि त्याला खडसावत आत जाण्यास रोखले. प्राध्यापक हा शिस्तपालन समितीमध्ये असल्याने त्याने आपले कर्तव्य निभावले. मात्र, ही बाब त्या विद्यार्थ्याला रुचली नाही, शिवाय प्राध्यापक तरुण असल्याने हा आपल्यापैकीच एखादा सामान्य तरुण असावा असा गैरसमज या विद्यार्थ्याचा झाला. त्यामुळे त्यांच्यातली बाचाबाची वाढत गेली आणि यात या विद्यार्थ्याने थेट प्राध्यापकाच्या कानशिलात लगावली. प्राध्यापकासाठी हा मोठा अपमानास्पद धक्का होता त्यामुळे आपले भान विसरून या प्राध्यापकाने देखील या विद्यार्थ्याला थोबाडून काढले. आजूबाजूला असलेल्या प्राध्यापकांना ही बाब माहिती झाली असता त्यांनी देखील या विद्यार्थ्याला बदडून काढले.

वाद शमण्याऐवजी वाढला : हा वाद एवढ्यात शमण्याऐवजी याने आणखी मोठा पेट घेतला. दुर्गापूर वसाहतीत राहणाऱ्या या विद्यार्थ्यांने थेट आपल्या सवंगड्यांना फोन केला आपल्याला महाविद्यालयात मारहाण झाली असून याचा बदला घेण्यासाठी त्याने यांना बोलावून घेतले. आणि बघता बघता महाविद्यालयाच्या परिसरात 15 ते 20 जणांचे टोळके येऊन उभे ठाकले. मारहाण करण्याचे सर्व साहित्य ते घेऊन आले होते. मात्र, प्राध्यापक देखील माघार मानण्यास तयार नव्हता. तो आधीच एका राजकीय पक्षाशी जुळून असून पदाधिकारी देखील आहे. मूळचा घुगूस येथील असलेल्या या प्राध्यापकाचा चांगला जनसंपर्क आहे. त्याने देखील थेट घुगूसला फोन लावत आपल्या पलटणीला बोलावून घेतले. गुन्हेगारी विश्वात घुगूस परिसराची भयंकर दहशत आहे आणि बघता बघता तब्बल 40 ते 50 जणांची गॅंग तिथे पोचली. त्यांना पाहून विद्यार्थ्यांची गॅंग हादरली.

संस्थाचालकाचा प्राध्यापकाला दम : प्राध्यापकाच्या गॅंगने विद्यार्थ्याच्या गॅंगला चांगलाच चोप दिला. विद्यार्थ्याच्या गॅंगची पळता भुई थोडी झाली. मिळेल त्या मार्गाने ते पळत सुटले. या गॅंगवारमध्ये प्राध्यापकाची गॅंग वरचढ ठरली. यामुळे प्राध्यापकाची कॉलर टाईट झाली. मात्र हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. ही बाब संस्थाचालकाच्या कानी गेली महाविद्यालयाच्या परिसरातच या संस्थाचालकाचे कार्यालय असल्याने त्यांनी या प्राध्यापकाला बोलावून घेत चांगलेच धारेवर धरले. "महाविद्यालयात तुला काय गॅंगवार करण्यासाठी ठेवलं आहे का?" असे म्हणत पुन्हा असा प्रकार घडायला नको असा सज्जड दम संस्थाचालकाने दिला. चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील या प्रतिष्ठित आणि सुपरिचित महाविद्यालयात घडलेल्या घटनेची चर्चा महाविद्यालयासह आता सामान्य जनतेत होत आहे.


नेतेगिरीचा संस्थाचालकाच्या डोक्याला ताप : संस्थाचालकाच्या जिल्ह्यात अनेक शाळा, महाविद्यालये आहेत. येथे प्राध्यापक, शिक्षक आणि कर्मचारी आहेत जे राजकीय पक्षाशी जुळलेले आहेत. या नेत्यांची नेतागिरी सध्या संस्थाचालकाच्या डोक्याला ताप ठरली आहे. सध्या एक नेता शाळेत न जाता नेतेगिरी करीत असल्याचा प्रकार समोर आल्याने आधीच याचा ताप संस्थाचालकाला होत आहे. त्याच राजकीय पक्षाच्या दुसऱ्या नेत्याच्या शिक्षिका पत्नीचा मुद्दा देखील चर्चेत आहे. अशातच पुन्हा याच पक्षाशी जुळलेल्या प्राध्यापकाने महाविद्यालयात नवा राडा केला. त्यामुळे या पक्षातील नेत्यांच्या नेतेगिरीमुळे संस्थाचालकाची डोकेदुखी थांबण्याचे नाव घेत नसल्याचे जाणवते.

हेही वाचा : Mumbai Crime : दोन चेन स्नॅचरला सापळा रचून अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.