ETV Bharat / state

Chandrapur Flood : चंद्रपूर जिल्ह्यात पुराचे थैमान; जिल्हास्तरावर बचावकार्य सुरू

author img

By

Published : Jul 28, 2023, 5:46 PM IST

Chandrapur Flood
चंद्रपूर जिल्ह्यात पूरस्थिती

मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील वैनगंगा, इराई आणि वर्धा नद्याही ओसंडून वाहत आहेत. तसेच काही ठिकाणी पुराचे पाणी शहरात घुसले आहे. नागरिकांना बाहेर काढण्यासाठी चंद्रपूर जिल्हास्तरावर बचावकार्य सुरू आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात पुरस्थिती

चंद्रपूर : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुराचा चंद्रपूर शहरालाही मोठा फटका बसला आहे. चंद्रपूर शहरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या इरेई धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले.

नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू : मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीला पूर आला आहे. नदीचे पाणी चंद्रपूर शहरात शिरले आहे. त्यामुळे चंद्रपूर शहराजवळील वरवट, आरवट, पठाणपुरा, रहमत नगर, सिस्टर कॉलनी येथील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. सध्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, महापालिका आणि चंद्रपूर पोलिसांची तीन पथके कार्यरत आहेत.

तेलंगाणा महाराष्ट्र वाहतूक ठप्प : पुलावरून पाणी वाहत असल्याने तेलंगणा-महाराष्ट्र राज्य महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. शुक्रवारी पहाटे अडीच वाजल्यापासून शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. शेकडो नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील सामानाची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.


राजुरा उपविभागाला सर्वात मोठा फटका : राजुरा उपविभागात येणाऱ्या राजुरा, कोरपना, गडचांदूर या परिसराला मोठा फटका बसला आहे. या उपविभागातील महत्वाचे रस्ते ठप्प झाले आहेत. यामध्ये राजुरा-बल्लारपूर, राजूरा-सास्ती, धानोरा-भोयगाव, गौवरी कॉलनी-पोवणी, तोहोगाव, कोरपना-कोडशी, रूपापेठ-मांडवा, जांभूळधरा-उमरहिरा, पिपरी-शेरज, पारडी-रुपापेठ, पिपरी, कोरपना-हातलोणी, कातलाबोडी-कोरपना, शेरज-हेटी, वनसडी-भोयगाव, विरूर स्टेशन-वरूर रोड़, विरूर स्टेशन-सिंधी, विरूर स्टेशन -लाठी, धानोरा -सिंधी, विरूर-सिरपूर, चिंचोली -अंतरगाव सिरपूर, सुबई - चिंचोली हे मार्ग पूर्णपणे बंद झाले आहेत.

चंद्रपूर शहरात 312 लोकांना हलवले : पुराच्या पाण्याने बाधित झालेल्यांना शाळांमध्ये स्थलांतरीत होण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले. विस्थापित नागरिकांसाठी 12 महापालिका शाळांमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, आतापर्यंत 312 लोकांना सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र, पाण्याची पातळी सतत वाढत असल्याने विस्थापितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

शिवमंदिरातील तेवणारा आश्चर्यकारक दिवा : जिल्ह्यातील धानोरा गावात नदीपात्रावर एक शिवमंदिर आहे. या मंदिरात पाणी शिरले आहे. शिवमूर्ती अर्ध्याच्यावर बुडाली आहे. मात्र या मंदिरात लावलेला दिवा तेवत असताना दिसत आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सगळा परिसर पुराच्या पाण्याने वेढलेला असताना कोनाड्यात लावलेला दिवा तसाच राहिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा - Hingoli Monsoon : वसमत तालुक्यात मुसळधार पावसाने तलावाची फुटली भिंत; अनेकांच्या घरात शिरले पाणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.