कोरोना काळात 14 महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा? - भाजप नेते बावनकुळे

author img

By

Published : Aug 23, 2021, 9:13 PM IST

Bawankule comment Sindkhedraja visit

कोरोना काळात 14 महिने मुख्यमंत्री हे मंत्रालयात आले नाहीत आणि उत्कृष्ट मुख्यमंत्री कसे म्हणता? असा सवाल करत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सोमवारी बुलडाण्याच्या सिंदखेडराजा येथे पत्रकार परिषदेत निशाणा साधला.

बुलडाणा - कोरोना काळात 14 महिने मुख्यमंत्री हे मंत्रालयात आले नाहीत आणि उत्कृष्ट मुख्यमंत्री कसे म्हणता? असा सवाल करत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सोमवारी बुलडाण्याच्या सिंदखेडराजा येथे पत्रकार परिषदेत निशाणा साधला.

माहिती देताना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे

हेही वाचा - येणाऱ्या विधानसभा निवडणुका सोबत लढणार - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

पंचम या संस्थेने सर्व्हेमध्ये उत्कृष्ठ मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना पसंती दिली असल्याचे विचारल्यावर बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. तर राज्यातल्या 12 कोटी जनतेला विचारा, उत्कृष्ठ मुख्यमंत्री कोण आहे म्हणून, मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी विकासाची कामे केली आहे, असा टोलाही बावनकुळे यांनी यावेळी लगावला.

बावनकुळे हे आज सोमवारी पश्चिम विदर्भातील राष्ट्रमाता मा जिजाऊंचे जन्मस्थळ बुलडाण्यातील सिंदखेडराजा येथे युवा वॉरियर संपर्क अभियानाच्या शुभारंभासाठी आले होते. यावेळी त्यांनी स्थानिक विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, राज्य प्रवक्ता विनोद वाघ, जिल्हाध्यक्ष आ.एड. आकाश फुंडकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

बुलडाण्यातून सुरू झाली युवा वॉरियर प्रवास यात्रा

18 ते 25 वयोगटातील युवकांचे युवा वॉरियरच्या माध्यमातून संघटन मजबूत करून त्यांना आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शंभर कोटी रुपयांची योजना दिली आहे. त्या योजनेचा फायदा देण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यामध्ये संवाद यात्रा काढल्या जात आहेत. युवा वारियर्सना त्यांचे स्किल डेव्हलपमेंट करून आत्मनिर्भर भारत योजनेचा फायदा करून देण्याच्या दृष्टिकोनातून या अभियानाची आखणी करण्यात आली आहे. युवा मोर्चाच्या वतीने 23 ते 26 ऑगस्ट दरम्यान पश्चिम विदर्भ युवा वॉरियर प्रवास यात्रा काढण्यात येणार आहे. यात्रेची सुरुवात आज सोमवारी 23 ऑगस्टला बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्म स्थळापासून झाली. महाराष्ट्रातील 25 लाख युवकांची नोंदणी या संवाद यात्रेच्या माध्यमातून करण्याचा संकल्प आहे. या संवाद यात्रेच्या माध्यमातून जोडलेल्या युवकांचा वापर राजकीय फायद्यासाठी न करता त्यांचे स्किल डेव्हलपमेंट करून त्यांना आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत प्लॅटफॉर्म निर्माण करून देणे व सशक्त भारत निर्माण करण्यात येत आहे, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली

चंद्रशेखर बावनकुळे यांची शिवसेनेवर टीका

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणे यांनी शिवाजी पार्कमधील स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले, मात्र शिवसेनेने या स्मृतिस्थळाचे शुद्धीकरण केले. हे संकुचित लोकांची लक्षणे असून कोणालाही त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेता येऊ शकते. कारण बाळासाहेब ठाकरे हे राज्याचे रक्षणकर्ते होते आणि त्यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन किंवा आदरांजली देने हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, त्यामुळे राणे यांनी ते केले. मात्र, शुद्धीकरण करून संकुचित बुद्धीवाला माणूस कधीही मोठा होत नाही, जनता त्यांना कधीही माफ करणार नाही, अशी टीका बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत केली.

हेही वाचा - बुलडाणा : समृद्धी महामार्गच्या कामासाठी मजुरांना घेऊन जाणाऱ्या टिप्परचा अपघात; 13 मजूरांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.