ETV Bharat / state

भंडाऱ्यात 5 रुग्णालयात होणार कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार

author img

By

Published : Sep 17, 2020, 1:53 PM IST

भंडारा जिल्ह्यात चाचणी संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. जिल्ह्यामध्ये फक्त एकाच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याने मोठा ताण पडत होता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी चार नवीन खाजगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांचे उपचार करण्यासाठी परवानगी दिली आहे. आता पाच रुग्णालयामध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जातील.

संदीप कदम
संदीप कदम

भंडारा - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली असून मृतांच्या आकड्यातही वाढ होत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी नवीन योजना आखल्या असून त्यामुळे वाढत्या रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळवता येईल. तसेच रुग्णांना योग्य उपचार मिळतील, असे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी संदीप कदम

कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी चार नवीन खाजगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांचे उपचार करण्यासाठी परवानगी दिली आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये फक्त एकाच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार होत होते. त्यामुळे या रुग्णालयावर मोठा ताण पडत होता. आता पाच रुग्णालयामध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जातील. या रुग्णालयांमध्ये चौधरी रुग्णालय, डॉक्टर नान्हे यांचे श्री कृपा रुग्णालय, डॉक्टर प्रशांत पडोळे यांचे यादवरावजी पडोळे मेडिकल केअर तर डॉक्टर व्यास हे अशोका हॉटेलमध्ये रुग्णांना उपचार देणार आहेत. तर डॉक्टर धुर्वे हे रजत प्लाझामध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणार आहेत.

जिल्ह्यात चाचणी संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेच्या माध्यमातून पुढच्या महिन्याभर लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला योग्य वेळेत योग्य तो उपचार देता येईल. कोरोनाची रोकथाम करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा म्हणजे मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करावे, यासाठी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जनजागृती मोहीम हातात घेतली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा करून, त्यांच्या समस्या समजून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मॉनिटरवरची आणि व्हेंटिलेटर संख्या वाढविली आहे. औषधांची संख्या सुद्धा वाढविली असून ऑक्सिजनचे प्रमाणसुद्धा गरजेनुसार वाढविले जात आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत होता. तो कमी करण्यासाठी नवीन 36 परिचारिकांना कामावर रुजू करण्यात आले आहे. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना उपचार करता येईल. तसेच यंत्रणेमध्ये अजून काही बदल करून, यंत्रणा अजून किती सुरळीत करता येईल, यासाठी दररोज नवनवीन उपाय योजना केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉक्टरांनी रुग्णावर जास्त लक्ष द्यावे, यासाठी प्रत्येक सेंटर आणि रुग्णालयांमध्ये प्रशासकीय अधिकारी नेमून दिला आहे. मी स्वतः जेवण, पाणी, स्वच्छता योग्य प्रकारे आहे की नाही, याकडे लक्ष देत आहे. तसेच आता प्रत्येक ठिकाणी रुग्णांसाठी गरम पाण्याची सुद्धा सोय करण्यात आली आहे. भंडारा येथील आयसीयूमध्ये सुरवातीला 30 बेड होते. त्यामध्ये वाढ करीत अजून 25 आयसीयू बेड तयार करण्यात आले आहेत. सुरुवातीला आपल्याकडे फक्त बारा व्हेंटिलेटर होते. यांची संख्या वाढून आता 35 पर्यंत नेली आहे. पुढील काळात ती 55 च्या पुढेही नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.

आज आपल्याकडे 425 बेड उपलब्ध असून भविष्यात आणखी बेडची गरज पडल्यास त्यानुसार व्यवस्था करून ठेवण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी नागपूर येथे हलविण्यात येत होते. मात्र पुढच्या आठवड्याभरात भंडाऱयामध्येच एक वेगळे ऑपरेशन थिएटर तयार करून बाधित झालेल्या महिलांचीही प्रसूती केली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

मृतकांच्या नातेवाईकांना मृतकाचे अंतिम दर्शन घेता यावी यासाठी चेहरा दिसेल. एवढा पारदर्शक किटची मागणी करण्यात आली आहे. मृतांना अग्नी देतांना अडचणी निर्माण होऊ नये, म्हणून स्मशान भूमीत अधिक जागांची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच लवकरच तिथे लाईट आणि इतर गोष्टींची व्यवस्था केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता भविष्याचा विचार करून शासकीय दवाखाना आणि पाच खाजगी रुग्णालय आणि इतर खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांची सेवा घेतली जात आहेत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होणार नाही, याकडे लक्ष दिले जात आहे. कोरोनाचा सामूहिक संसर्ग थांबविण्यासाठी नागरिकांनी अत्यावश्यक असल्यास घराच्या बाहेर निघावे, प्रत्येक वेळेस मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावे आणि सतत सॅनिटाझर वापरावे, या तीन गोष्टी गांभीर्याने केल्यास कोरोनाचा संसर्ग नक्की थांबवता येऊ शकेल, असेही ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.