ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष: तलाव अन् भातशेतीमुळे भंडाऱ्यात डासांचा प्रादुर्भाव अधिक...

author img

By

Published : Jul 30, 2020, 3:21 PM IST

जिल्हा प्रशासनाच्या वतीन गावोगावी डासांपासून कशी मुक्तता मिळावी याचा प्रचार केला जातो. ग्रामीण भागात फवारणी केली जाते. मात्र, सध्या शहरी भागात नगरपालिकेचे कर्मचारी पूर्णपणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यस्त आहेत. त्यामुळे या दोन महिन्याच्या कालावधीत औषध फवारणी झालीच नाही.

increased-number-of-mosquitoes-due-to-lake-and-rice-crop-at-bhandara
तलाव अन् भातशेतीमुळे भंडाऱ्यात डासांचा प्रादुर्भाव अधिक...

भंडारा- जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. मोठा भागात जंगल क्षेत्र आहे. तसेच छोटे- मोठे तलावही असल्याने अनेक भागात पाणी साचून राहते. या साचलेल्या पाण्याने मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होते. या डासांमुळे मलेरिया, डेंग्यू, मेंदूज्वर, चंडीपुरा, फायएरिया आणि हत्तीरोग यासारखे आजार पसरण्याचा धोका आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी दरवर्षी जिल्हा हिवताप नियंत्रण विभागातर्फे औषधांची फवारणी केली जाते. मात्र, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डासांसाठी केली जाणारी फवारणी रखडली आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

तलाव अन् भातशेतीमुळे भंडाऱ्यात डासांचा प्रादुर्भाव अधिक...

जिल्हा प्रशासनाच्यावतीने गावोगावी डासांपासून कशी मुक्तता मिळावी याचा प्रचार केला जातो. ग्रामीण भागात फवारणी केली जाते. मात्र, सध्या शहरी भागात नगरपालिकेचे कर्मचारी पूर्णपणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यस्त आहेत. त्यामुळे या दोन महिन्याच्या कालावधीत औषध फवारणी झालीच नाही. त्यामुळे नागरिकांना डासांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. तो अद्यापही कायम असून आरोग्य यंत्रणा कोरोनावर नियंत्रित मिळवण्यासाठी कामाला लागली आहे. मे पर्यंत तापमान जास्त असल्याने डासांचा प्रादुर्भाव पाहायला मिळाला नाही. मात्र जून आणि जुलैमध्ये पावसाळा सुरू झाला. पावसामुळे डासांचे प्रमाण वाढले. दरवर्षी आरोग्य विभाग आणि शासनातर्फे जून महिन्यापासून हिवताप नियंत्रण आणि डेंगूच्या डासांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम राबविले जातात. यावर्षी अशा प्रकारचा कार्यक्रम झाला नाही. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सब सेंटरमध्ये छोटेखानी कार्यक्रम घेऊन लोकांना डासांचा नायनाट करण्यासाठी माहिती दिली जाते आहे.

मागील पाच वर्षांच्या तुलनेत डासांपासून होणाऱ्या आजारांचे प्रमाण जरी कमी झाला असले, तरी दरवर्षी या आजारांचे रुग्ण जिल्ह्यात पहायला मिळतात. मे 2019 मध्ये 46 डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले होते. यापैकी सात रुग्ण पॉझिटिव्ह होते. तर यावर्षी मे 2020 मध्ये 11 संशयित रुग्णांपैकी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. जून 2019 ला 16 संशयित रुग्ण आढळले मात्र एकही पॉझिटिव्ह आढळला नाही. तर जून 2020 मध्ये 18 संशयित रुग्ण आढळले त्यात दोन जण पॉझिटिव्ह आहेत. मे ते जून 2019 या कालावधीत 45, 487 नमुने तपासणीसाठी गोळा करण्यात आले. यापैकी एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेला नाही. तर मे ते जून 2020 या कालावधीत 31, 649 हिवतापाचे नमुने गोळा करण्यात आले यामध्ये जून महिन्यात एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे.

डासांपासून पसरणाऱ्या रोगांवर नियंत्रणासाठी औषध साठा उपलब्ध असल्याचे जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी सांगितले. एखाद्या गावात डेंगू, मलेरिया, चंडीपुराचे रुग्ण आढळल्यास त्या गावाला हायरिक्स म्हणून औषध फवारणी करुन नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाते.

कोरोनाच्या काळात सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व्यस्त होते. मात्र, आता त्यांनी डासांकडेही लक्ष दिले आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना पूर्णपणे सेवा देणे शक्य होत नाही. ग्रामीण भागातील हिवताप विभागामार्फत फॉगिंग, डस्टिंग केली जात आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे नगरपालिकेतील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोरोनाचे नियंत्रण करण्यासाठी लागली आहे. त्यामुळे जून ते जुलै या कालावधीमध्ये फॉगिंग होताना दिसत नाही. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्याचा त्रास नागरिकांना होत आहे.

सायंकाळी सहा वाजले की डासांचा थवा एकत्रित येतो. त्यामुळे नागरिक सायंकाळी 6 नंतर घराचे दार, खिडकी बंद करुन घरात बसतात. डेंगू आणि इतर किटकजन्य रोग होऊ नये म्हणून नगर पालिकेने लवकरात लवकर फॉगिंग, फवारणी करावी अशी मागणी, नागरिकांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.