ETV Bharat / state

भंडारा: तणसाच्या ढिगाऱ्यात आढळले बाळ

author img

By

Published : Jan 1, 2021, 8:23 PM IST

Bhandara District Crime News
तणसाच्या ढिगाऱ्यात आढळले बाळ

भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील केसलवाडा वाघ येथे गुरुवारी सांयकाळी तणसाच्या ढिगार्‍यात तीन दिवसांचे बाळ आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. बाळ जिवंत असून, परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी बालकाला पुढील उपचारासाठी लाखनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

भंडारा- भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील केसलवाडा वाघ येथे गुरुवारी सांयकाळी तणसाच्या ढिगार्‍यात तीन दिवसांचे बाळ आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. बाळ जिवंत असून, परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी बालकाला पुढील उपचारासाठी लाखनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. हे बाळ अनैतिक संबंधातून जन्माला आल्याची चर्चा सध्या गावात सुरू आहे.

रडण्याचा आवाज आला

गुरुवारी सायंकाळी आठ वाजेच्या दरम्यान घटनास्थळावरून संदीप बोरकर यांना बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने या बाळाचा शोध घेतला असता, तणसाच्या ढिगाऱ्यामध्ये कापडात गुंडाळलेल्या अवस्थेमध्ये हे बाळ आढळून आले आहे. बाळ पाहाण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

बाळाची प्रकृती स्थिर

या बाळाला स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर एम. टी. भूते यांनी या बाळाची तपासणी केली. हे बाळ तीन दिवसांचे असून, दीड किलो वजनाचे असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान या बाळावर उपचार करण्यात येत असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

सध्या जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीमुळे नागरिक सायंकाळच्या सुमारास आपल्या घरीच राहाणे पसंत करतात. मात्र अशा थंडीमध्ये देखील या मातेने बाळाला सोडून दिल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची लाखानी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक मनोज वाडीवे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळाच्या आईचा शोध घेण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.