ETV Bharat / state

Beed Water issue : गावाला पाणीदार करण्यासाठी सरसावले गावकरी, नाम फाउंडेशनची साथ घेत नदीची वाढवली खोली अन् रुंदी

author img

By

Published : Jun 19, 2023, 12:49 PM IST

नदीचे खोलीकरण
नदीचे खोलीकरण

पावसाचे पाणी हे जमिनीत मुरवायचे आणि याच पाण्याचा वापर भविष्यात करायचा याची कल्पना लोकांना असून सुद्धा त्याकडे अनेक लोक कानाडोळा करताना पाहायला मिळतात. मात्र ज्यावेळेस पाण्यासाठी अडचणी येतात त्यावेळेस मात्र एक व्यक्तीच नव्हे तर सर्व गावची गाव जागे होतात आणि पाण्याच्या टँकरसाठी संबंधित विभागाकडे टँकरची मागणी करतात मात्र ही गावे टँकर मुक्त व्हावी, त्याच्यासाठी नाम फाउंडेशन व गावातील लोकांचा लोकसहभाग याच्यातून अनेक गावांनी एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे. बीड जिल्ह्यात अनेक गावांमध्ये नदी खोलीकरण रुंदीकरण झाल्यामुळे अनेक गावे टँकर मुक्त होतील अशी अपेक्षा देखील गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे याविषयीचा ईटीव्ही भारत चा एक स्पेशल रिपोर्ट.

गावाने केला कायापालट

बीड : जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात कधी अतिवृष्टी तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करावा लागतो. बीडच्या जवळच असलेल्या कुमशी या गावाने शिवारात पडलेले पाणी बाहेर न जाऊ देता ते गावातीलच नदीमध्ये वाड्यामध्ये अडवायचे ते मुरवायचे आणि भविष्यात या पाण्याचा वापर करायचा यासाठी सर्व गावकऱ्यांनी एक सक्तीचा निर्णय घेतला आहे. गावकऱ्यांनी सर्वांच्या मदतीने नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण केले आहे. यामुळे गाव परत पाणीदार होईल अशी आशा आहे.

नदीचे खोलीकरण

काय म्हणतात नागरिक : आमच्या गावाचा पाण्याचा प्रश्न फार बिकट होत चालला होता. यासाठी काही ठोस उपाय म्हणून आम्ही योजना राबवाचे ठरवले तात्पुरत्या स्वरूपात टँकरने पाणी आणणे हे योग्य होते मात्र याच्यावर ठोस उपाय म्हणून काहीतरी केले पाहिजे, हा आम्ही सर्व गावकऱ्यांनी विचार केला. आमच्या मदतीला नाम फाउंडेशन यांनी आम्हाला मदत केली आणि आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून लोकवर्गणीतून हे काम केले. गावाची मुख्य नदी म्हणून ओळखली जाणाऱ्या नदीचे आम्ही तब्बल तीन किलोमीटरपर्यंत रुंदीकरण आणि खोलीकरण केले आहे. याचा फायदा दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांना येणे जाण्यासाठी रस्ताही तयार झाला आहे. याच्या माध्यमातून आम्ही एक जलक्रांतीच केली आहे. नदी खोलीकरण आणि रुंदीकरण तर झालंच पण याच्यामधून गावकऱ्यांचा शेतीसाठी लागणारे पाणी व पिण्यासाठी लागणारे पाणी हा कायमचा प्रश्न सुटणार आहे. आमचे गाव पाणीदार होण्यासाठी आम्हाला या कामाची फार मदत होणार आहे.

टँकर मागायला गेल्यावर अडचणी येतात : जिल्ह्यात पाण्याच तुटवडा निर्माण झाला का गावातील नागरिक शासनाकडे पाण्याचे टँकरची मागणी करत. परंतु शासनाकडून टँकर देण्यासाठी आडकाठी केली जात असायची. शिवाय टँकरच्या पाण्यातून एक ते दोन महिन्याची पूर्तंता होते. परंतु कायम स्वरुपी या समस्येवर उपाय नव्हता यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येत नदीचे रुंदीकरण केले आहे.

जिल्हा प्रशासनाला टँकर मागण्यासाठी गेले असता प्रथम आमच्या पदरी निराशाच पडायची. म्हणून आम्ही सर्व गावकऱ्यांनी विचार केला की ही योजना आपल्या गावात आपण राबवूया ही आमच्या गावची मुख्य नदी आहे आणि या नदीच्या माध्यमातून आमच्या शिवारातील विहीर आणि बोअरवेल याचे पुनर्भरण झाल्याशिवाय राहणार नाही. या माध्यमातून आमच्या शेती उत्पादनात भरपूर वाढ होणार आहे. -शरद निकम ग्रामस्थ

पाणी अडवले जात नव्हते : पाणी अडविण्यासाठी कोणतीच उपाययोजना केली नसल्याने पावसाचे पाणी वाहून जात होते. या भागात पाऊसही कमी पडत असतो. शेतकऱ्यांच्या मते या जिल्ह्यातील काही भागात पाऊस मोडून फक्त दोन महिने पडत असतो. तोही मुसळधार पडत असतो. परंतु पाणी अडविले जात नसल्याने नदीतील पाणी गावातील शेतकऱ्यांच्या उपयोगी येत नव्हते. आता यावळे गावकऱ्यांनी नदीवर ठिक-ठिकाणी बांध टाकले आहेत. यामुळे बऱ्याच प्रमाणात पाणी अडवले जाईल.

आमच्या गावासाठीची ही मुख्य नदी होती पाऊस पडायचा आणि पाणी खाली निघून शिंदफण्याला मिळायचं नेमकं आमची पीक जोमात याच्या टायमालाच आम्हाला पाणी कमी पडायचं, शेवटच्या दोन महिन्यांमध्ये तर आमच्या पिकालाच नव्हे तर प्यायला सुद्धा पाणी आम्हाला राहत नाही. हे काम केल्यामुळे आम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. पाऊस जोराचा यायचा आणि वाहून जातो, आम्ही आमच्या डोळ्यांना पूर आलेला पाहायचो. पाणी सिंदफणेला जाऊन मिळायचे मात्र या कामामुळे प्रत्येक जागोजाग टप्पे केलेले आहेत. त्यामुळे पाणी वाहून न जाता या ठिकाणीच पाणी साचून राहणार आह, त्यामुळे आमच्या शिवारातील पाणी बाहेर जाणार नाही. पाणी अडकवल्या गेल्यामुळे पाणी जमिनीत मुरणार आहे आणि याचा फायदा आम्हा सर्व गावकऱ्यांना होणार आहे. याच अडवलेल्या पाण्यामुळे आमचं गाव नंदनवन होणार आहे. -बाळु करपे शेतकरी

जास्ती-जास्त पाणी जमिनीत जाणार : या नदीतील झाडाझुडपामुळे शेताकडे जायला रस्ता नव्हता. या नदी खोलीकरण आणि रुंदीकरणामुळे याचा फायदा आम्हाला झाला आहे. रस्ता तयार झाला आहे. ठिक-ठिकाणी बांध घातल्यामुळे वाहून जाणारे पाणी अडवले जाणार आहे. नाम फाउंडेशन व आमच्या गावकऱ्यांनी सर्वांना विचारात घेऊन हे काम केले आहे.

आधी पाणी वाहून जायचे आता 90% पाणी हे जमिनीत मुरणार आहे. या मुरलेल्या पाण्याचा आम्हाला नक्कीच फायदा होणार आहे, आजही आम्हाला दोन दोन तीन किलोमीटर पाणी आणण्यासाठी जावे लागत आहे. पाण्यासाठी वण-वण करावी लागत आहे, दूरपर्यंत आम्हाला पाणी आणण्यासाठी जावं लागायचं जनावरांसाठी व पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी आम्हाला अजूनही भटकंती करावी लागते. मात्र येणाऱ्या काळामध्ये या कामामुळे पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब आम्ही गावकऱ्यांनी विचार करून जमिनीत मुरवण्याचा विचार आम्ही सर्वांनी केला आहे. -सतिश गायकवाड शेतकरी

हेही वाचा -

  1. Koyna Dam : कोयना धरणात उरला केवळ ६ टीएमसी पाणीसाठा; वीजनिर्मिती ठप्प होण्याच्या मार्गावर
  2. Shahapur Water Issue : मुंबईपासून हाकेच्या अंतरावरील आदिवासींची पाण्यासाठी वणवण, 10 गावांसाठी आहे एकच विहीर!
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.