ETV Bharat / state

मलकापूर येथे गावकऱ्यांनी रोखले राखेचे ट्रक; घटनास्थळी पोलिसांची भेट

author img

By

Published : Jul 2, 2021, 12:25 AM IST

गावकऱ्यांनी रोखले राखेचे ट्रक
गावकऱ्यांनी रोखले राखेचे ट्रक

गुरुवारी रात्री मलकापूर येथे अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या हायवा टिप्पर मधून राख पडल्याने गावातील एक दुचाकीस्वार जखमी झाला. गावकऱ्यांचा संताप अनावर झाल्याने गावकऱ्यांनी एकत्र येवून या मार्गावरून वाहतूक करणारे जवळपास 25 ते 30 हायवा टिप्पर अडवून ठेवले.

परळी वैजनाथ (बीड) - औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेच्या अवैध वाहतूकीसंदर्भात पुन्हा एकदा गावकऱ्यांचा रोष दिसून आला. तालुक्यातील मलकापूर येथील गावकऱ्यांनी गुरुवारी रात्री 9 वाजतााच्या सुमारास 25 ते 30 गाड्या अडवून ठेवल्या. राखेची अवैध वाहतूकीपासून नागरिक त्रस्त असताना प्रशासन मात्र कुंभकर्ण झोपेत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गावकऱ्यांनी रोखले राखेचे ट्रक
गावकऱ्यांनी रोखले राखेचे ट्रक

मलकापूर येथे कोळशावर चालणारे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहेत. २५० मेगावँटचे तीन विद्युत निर्मिती केंद्र असून या तीन संचातून ७५० मेगावँट विद्युत निर्मिती केली जाते. या विद्युत निर्मिती संचातून मोठ्या प्रमाणावर राख बाहेर पडते. यातील काही राख बंद गाड्यातून सिमेंट फँक्टरीसाठी पाठवली जाते तर काही राख संचाच्या जवळ असलेल्या तळ्यात सोडली जाते. तळ्यातील राख हायवा गाड्यातून विटभट्ट्यांसाठी अवैधरित्या, उघडी वाहतूक केली जाते. ही राख वाहतूक करत असताना हायवा टिप्परच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात वाहतूक होत असल्याने औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रापासून २० ते २५ किलोमीटर रस्त्यावर इथून तिथून, गतीरोधकाजवळ, रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर सांडली जाते. पडलेली राख सुसाट वेगाने जाणाऱ्या गाड्यामुळे हवेत पसरते व मोठ्या प्रमाणावर हवेने उडते. यामुळे रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो.

गुरुवारी रात्री मलकापूर येथे अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या हायवा टिप्पर मधून राख पडल्याने गावातील एक दुचाकीस्वार जखमी झाला. गावकऱ्यांचा संताप अनावर झाल्याने गावकऱ्यांनी एकत्र येवून या मार्गावरून वाहतूक करणारे जवळपास 25 ते 30 हायवा टिप्पर अडवून ठेवले. मागच्याच आठवड्यात पांगरी येथे महिलांनी अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परमधून राख पडून हवेचे प्रदूषण होत असल्याने १०० हायवा अडवून या महिलांनी हायवा टिप्परच्या ड्रायव्हरला पडलेली राख साफसफाई करण्यास भाग पाडले होते. तर दादाहरी वडगाव येथील ग्रामस्थ राखेच्या प्रदूषणाला त्रस्त होवून गेल्या अनेक वर्षांपासून सहपरिवार रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. एवढे सर्व नागरिक त्रस्त असताना औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचे व स्थानिक प्रशासन मात्र कुंभकर्ण झोपेचे सोंग घेत असल्याने सातत्याने नागरिकांचा राग अनावर होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आंदोलनाचा भडका होण्याची शक्यता आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलने करण्याचा इशारा दिला आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.